मानवाचे कल्याण करणाऱ्या बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये माणसाला मुक्ती देण्याचे सामथ्र्य आहे. त्यामुळे लेखन आणि व्याख्यान याबरोबरच कला, काव्य आणि चित्रपट ही माध्यमे बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी उपयुक्त आहेत, असे मत नागपूर येथील नागार्जुन इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष धम्मचारी लोकमित्र यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे नेटवर्क फॉर प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा (नेटपॅक) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सहकार्याने आयोजित ‘इनर पाथ’ या तीन दिवसांच्या बौद्ध चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन धम्मचारी लोकमित्र यांच्या हस्ते झाले. ‘नेटपॅक’च्या अध्यक्षा अरुणा वासुदेव, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रशांत पाठराबे, सेंटरच्या लतिका पाडगावकर आणि प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते. दक्षिण कोरिया आणि जर्मनी यांची संयुक्त निर्मिती असलेला किम की-डय़ूक दिग्दर्शित ‘स्प्रिंग समर फॉल िवटर.. अँड स्प्रिंग’ या चित्रपटाने या महोत्सवाची सुरूवात झाली.
धम्मचारी लोकमित्र म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ७०० ते ८०० वर्षांपूर्वी बौद्ध धर्म अस्तित्वात आला. ज्येष्ठ अभ्यासक डॉ. धर्मानंद कोसंबी यांनी पाली भाषेतील बौद्ध तत्त्वज्ञान मराठी आणि गुजरातीमध्ये अनुवादित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लेखन, धम्मप्रवचन आणि व्याख्यान या माध्यमातून बौद्ध धर्माच्या प्रचाराचे काम सुरू आहे. पुणे विद्यापीठाने बौद्ध तत्त्वज्ञानाचे नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मात्र, या पारंपरिक माध्यमांना कला, काव्य आणि चित्रपट या माध्यमांची जोड दिली तर, बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार जलद गतीने होऊ शकेल.
अरुणा वासुदेव म्हणाल्या, जपान, हाँगकाँग, लंडन, मेक्सिको आणि लॉसएंजेलिस येथे बौद्ध चित्रपट महोत्सव साजरा होतो. मात्र, बौद्ध धर्माचा उदय झालेल्या भारतामध्ये गेल्या दोन वर्षांपासून या महोत्सवाच्या आयोजनाद्वारे ही उणीव दूर करण्यात आली आहे. दिल्ली येथेही हा महोत्सव घेण्यात आला असून लडाख येथेही महोत्सवाच्या आयोजनाचा मानस आहे.
प्रशांत पाठराबे यांनी मनोगत व्यक्त केले. लतिका पाडगावकर यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत गिरबने यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा