दिवसातील ठराविक तास काम असलेली नोकरी करताना त्या नोकरीत सर्जनशीलतेला वाव मिळेलच याबाबत शाश्वती नाही, असा विचार महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विश्वराज देशपांडे यांच्या मनात आला आणि असाच विचार करणाऱ्या अन्य तरुण-तरुणींना घेऊन कला विषयाला वाहून घेणाऱ्या तरुणांना एकत्र करत  त्यांनी आर्ट स्टुडिओची स्थापना केली. खिशाला परवडणाऱ्या दरांमध्ये थ्रीडी, व्हीएफएक्स इफेक्ट तसेच पेंटिंगच्या माध्यमातून अंतर्गत आरेखन व सजावट, जाहिरात मोहीम, ग्राफिक डिझाइन अशी विविध कामे या स्टुडिओच्या माध्यमातून केली जातात. कला विषयाला वाहून घेतल्याने ठराविक पैशांची मागणी न करता ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कामे करून देणे हे या स्टुडिओचे वैशिष्टय़ आहे.

जुगाडूपंटर आर्ट स्टुडिओ या नावाने २०१६ मध्ये या स्टुडिओची नोंद करण्यात आली. नोंद २०१६ मध्ये करण्यात आली असली, तरी त्याआधीच तीन-चार वर्षे स्टुडिओसंबंधातील काम सुरू करण्यात आले होते. अभिनव महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विश्वराज देशपांडे या तरुणाची ही कल्पना. या स्टुडिओच्या माध्यमातून कला क्षेत्रातील विविध कामे सुरू आहेत.

विश्वराज यांना सध्या गौरी आपटे, सुजय अष्टेकर, विनायक लांडगे, अमर कररे हे सहकारी मदत करतात.

विश्वराज यांनी अभिनव महाविद्यालयात कला विषयक शिक्षण घेतले आहे. शिकत असताना तासिकांपेक्षाही बाहेर काम करत असताना जास्त शिकायला मिळते, हे तेथील अनुभवाने त्यांना शिकायला मिळाले. इतर अभ्यासक्रमांप्रमाणेच कला विषयातही अनेक वर्षांपासून अभ्यासक्रम बदललेला नाही. त्यामुळे विश्वराज यांनी बाहेरील कामे करत करत शिक्षण घेतले. याबरोबरच चित्रपट, नाटक, माहितीपट, लघुपट यामधून आणि या क्षेत्रासाठीही त्यांनी अनेक कामे केली आहेत. अभिनव महाविद्यालयाकडून दोन वेळा त्यांनी ‘पुरुषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धेत सहभाग घेतला. नाटक बसवताना नकळत आपण या आणि अशाप्रकारे कलाविषयातही काम करू शकतो, ही जाणीव त्यांना झाली आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच व्यवसाय करायची बीजे रोवली गेली. छोटी-मोठी कामे मिळतच होती, ती करत-करत २०१६ मध्ये स्टुडिओची स्थापना करण्यात आली.

महाविद्यालयात माझी धडपड पाहून माझे मित्र मला काहीही करून काम जुळवून आणणारा म्हणजेच जुगाड करणारा असे मला गमतीने म्हणायचे.  नाटक, लघुपट करताना पैसे नसतानाही अनेक गोष्टी जुळवून आणल्या होत्या. त्याला ‘जुगाड’ करणे असे आम्ही महाविद्यालयात म्हणायचो. त्यामुळे स्टुडिओचे नाव जुगाडूपंटर असे ठेवले, असे विश्वराज सांगतात.

या स्टुडिओने क्रेझी चीझी दुकानासाठी गेली दोन वर्षे काम केले आहे. त्याबरोबरच कुमठेकर रस्त्यावरील राधिका भेळ यांचेही काम याच फर्मकडे आहे. या दोन्ही ठिकाणी दुकानांमधील अंतर्गत सजावट, फलक, मेन्यूकार्ड असे विविधांगी बदल त्यांनी करून दाखविले आहेत. आहे त्या जागेत, कमी पैशात अधिकाधिक आकर्षक सजावट करून तसेच भारतीय संगीताचा वापर करून दुकानाचे वातावरण एकदम बदलून टाकण्यात आले आहे. इतर व्यवसायांसाठी ग्राफिक डिझाईन, इलस्ट्रेशनचीही कामे करण्यात आली आहेत. याबरोबरच फेसबुक पेज, दुकानांचे बोधचिन्हही करून देण्यात आले आहे. तसेच भांडारकर रस्त्यावरील एका घरामध्येही अशाचप्रकारचे काम स्टुडिओकडून सध्या सुरू आहे. महाविद्यालयात असताना फ्रीलान्स काम करायचो. अभिनव कला महाविद्यालयात शिकत असताना नोकरीमध्ये मजा नाही. आपल्यातील सर्जनशीलता नोकरी करताना वापरण्यापेक्षा स्वत:ला आवडणाऱ्या कामात वापरली तर त्याचा आनंद वेगळाच असतो, अशा अनेक गोष्टी माझ्याबरोबर शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सीनिअर यांच्याबरोबर बोलताना ऐकले होते. त्याचा नकळत परिणाम होऊन नोकरी करायची नाही, कला विषयाशी निगडितच काम करायचे हे महाविद्यालयीन जीवनातच ठरविले होते. माझ्यासारखाच विचार करणारे माझे मित्र, मैत्रिणी यांना घेऊन कामाला सुरुवात केली आहे. ग्राहकाला सांगितलेल्या निर्धारित वेळेच्या आधी काम करून देण्याचे भान ठेवून माझे सहकारी त्यांचे काम करतात. काम करताना कोणत्याही प्रकारचे ओझे वाटणार नाही, अशा पद्धतीने आम्ही मिळून काम करतो, असे विश्वराज सांगतात. सध्या गौरी आपटे, सुजय अष्टेकर, विनायक लांडगे, अमर कररे हे विश्वराज यांना त्यांच्या कामात मदत करतात. गौरी या व्यंगचित्रकार आहेत, सुजय थ्रीडी व व्हीएफएक्स इफेक्ट ही कामे पाहतात. विनायक पेंटिंगच्या क्षेत्रातील कामे करतात आणि अमर हे वास्तुविशारद आहेत. या सर्वाना विश्वराज मार्गदर्शन करतात. फर्मकडून जाहिरात मोहीम, ग्राफिक डिझाईन, कला मार्गदर्शन, इंटिरेअर डिझाइन, बोधचिन्ह तयार करणे, चित्रपट व नाटकांसाठी कला दिग्दर्शन अशी विविध कलाविषयक कामे केली जातात.   आगामी काळात मोठय़ा प्रमाणात कामे करण्याचा मानस आहे. आता करत आहोत त्यापेक्षा अधिक कालबद्ध पद्धतीने काम करण्याची इच्छा आहे. माझ्याबरोबर काम करणारे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करत आहेत. त्यामुळे आगामी काळात आता सुरू असलेले काम आणखी चांगल्या पद्धतीने सुरू राहील. फर्म म्हणून स्वत:चे कार्यालय करायचे आहे. दैनंदिन जीवनात अधिक चांगले आणि वेगळे काही तरी ग्राहकांना देण्याचा प्रयत्न येत्या काही वर्षांत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही विश्वराज  सांगतात.

Story img Loader