उतारवयात सांध्यांची झीज झाल्यामुळे सुरू होणारे गुडघा आणि मणक्याचे दुखणे आता चाळिशीतच सुरू होत आहे. या प्रकारच्या आजाराचे रुग्ण सामान्यत: ५५ ते ६० वर्षे वयोगटात दिसत असले तरी आता हे वय कमी झाले असून चाळिशीपासूनच हा आजार पाहायला मिळतो आहे.
संधीवाताचे विविध प्रकार असून नैसर्गिक रीत्या वयानुसार सांध्यांची झीज झाल्यामुळे प्रामुख्याने गुडघा आणि मणक्याशी संबंधित दुखणे उद्भवते, त्याला ‘ऑस्टिओ आथ्र्रायटिस’ म्हणतात. तर कोणत्याही वयात उद्भवू शकणाऱ्या हातापायाची बोटे, मनगट, घोटय़ाच्या दुखण्याला ‘ऱ्हूमॅटॉईड आथ्र्रायटिस’ अशी संज्ञा सर्वसाधारणपणे वापरली जाते. यातील ऑस्टिओ आथ्र्रायटिसचे वय कमी झाल्याचे निरीक्षण ‘जागतिक संधीवात दिना’च्या निमित्ताने विविध अस्थिरोगतज्ज्ञांनी नोंदवले.
वार्धक्यात शरीराच्या होणाऱ्या झिजेशी संबंधित असलेले आजार कमी वयात होताना दिसत असून ‘ऑस्टिओ आथ्र्रायटिस’ त्यातील एक असल्याचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘यात गुडघ्यांबरोबर मान, कमरेच्या मणक्यांचीही झीज होते. ऑस्टिओ आथ्र्रायटिस ४० ते ५० या वयोगटात प्रकर्षांने दिसू लागला आहे. त्यातही गुडघा व मणक्याचे दुखणे जवळपास समप्रमाणात दिसते आहे. अगदी ११ व १८ वर्षे वयाची मुलेही ‘स्लिप डिस्क’साठी उपचाराला आलेली मी पाहिली आहेत. पण हे सर्रास आढळत नाही.’
डॉ. पराग संचेती म्हणाले,‘ऑस्टिओ आथ्र्रायटिस सामान्यत: ५० वर्षे वयानंतरच्या रुग्णांमध्ये बघायला मिळतो, पण त्याचे वय दहा वर्षांनी कमी झाले आहे. लहान वयात धडपडल्यामुळे गुडघ्याला होणाऱ्या इजेमुळेही नंतर संधीवात लवकर झाल्याचेही काही रुग्णांमध्ये दिसून येते. ‘ऱ्हूमॅटॉईड आथ्र्रायटिस’ (आमवात) हा प्रकार मात्र २५ ते ३० या वयात दिसतो. यात आणखी लहान वयात होणारा ‘ज्युवेनाईल ऱ्हूमॅटॉईड आथ्र्रायटिस’ १० ते १५ वर्षे वयातही दिसतो, मात्र त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.’
चाळिशीत ऑस्टिओ आथ्र्रायटिस दिसून येण्यात वजन नियंत्रणात नसणे, चुकीची जीवनशैली आणि चुकीचे अन्नसेवन यांचा मोठा संबंध आहे, असे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘या प्रकारच्या संधीवातात चालल्यावर गुडघे दुखणे, गुडघ्यांना बाक येणे अशी प्रमुख लक्षणे दिसतात. ज्या रुग्णांना मधुमेहासारखे इतर आजार असतात त्यांच्यात त्रास वाढलेला दिसू शकतो.’

Story img Loader