सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून शहरातील विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या  गटाविषयी..

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर  ही समाजमाध्यमे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली असून त्यांच्याशिवाय युवकांचे पान हलेनासे झाले आहे. या समाजमाध्यमांची ताकद ओळखून त्यांचा डोळसपणे वापर केला तर अनेक चांगली कामे उभी करता येऊ शकतात. समाजमाध्यमांचा वापर करून अनेक विधायक उपक्रम राबविल्याची उदाहरणे आपण आतापर्यंत पाहिली. दहावीच्या परीक्षेनंतर शहरातील विविध प्रश्न सोडविण्याच्या हेतूने आकाश शहा या विद्यार्थ्यांने ‘अ‍ॅक्शन फॉर पुणे डेव्हलपमेंट’ (एपीडी) या गटाची सुरुवात केली.  शहराला नवीन रूप देण्यासाठी तयार केलेल्या या गटाला बघता बघता समाजमाध्यमावर मोठा प्रतिसाद मिळाला आणि या गटातील कामाची दखल लिम्का बुक ऑफ  रेकार्डने देखील घेतली.

संस्थेच्या स्थापनेविषयी आकाश म्हणाला, दहावीच्या परीक्षेनंतर चार महिने काय करायचे हा मोठा प्रश्न होता. या सुटीचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हावा, असे वाटत होते. त्यातून समाजासाठी काहीतरी उपक्रम राबविण्याचे ठरवले. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आम्ही वृक्षारोपणाचा पहिला उपक्रम हाती घेतला. सुरुवातीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही समाजमाध्यमांची मदत घेतली. समाजमाध्यमांतून शाळेतील मित्र, त्यांचे मित्र यांना उपक्रमाविषयी माहिती दिली. या उपक्रमाला  चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर शहरातील अनेक प्रश्नांवर काम करण्यास सुरुवात केली.

अ‍ॅक्शन फॉर पुणे डेव्हलपमेंटतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. त्यात रस्ते सुरक्षा मोहीम, हेल्मेटविषयी जनजागृती, गरजूंना कपडय़ांचे वाटप, रक्तदान शिबिर, पेटीएम कसे वापरावे या विषयी व्यावसायिकांना माहिती देणे, वंचितांसाठी थंडीच्या दिवसात उबदार कपडय़ांचे वाटप, विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये मुलांना कौशल्य विकासाचे धडे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

एपीडीचा प्रचार आणि प्रसार मुळातच समाजमाध्यमांमुळे झाला असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात समाजमाध्यमांचा महत्त्वाचा वाटा आहे. समाजमाध्यमांमुळे निरनिराळे उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचले असून अनेकजण या गटाशी जोडले गेले आहेत. आकाश म्हणाला, शहरात अनेक संस्थांतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. लोकांच्या नेमक्या समस्या कोणत्या आहेत हे समजून घेण्यासाठी एपीडीतर्फे ‘व्हॉईस ऑफ पुणे’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाशी समाजमाध्यमांद्वारे पंचवीस हजार नागरिक जोडले गेले आणि त्यांनी समस्या मांडल्या. नागरिकांनी सुचविल्याप्रमाणे सध्या संस्था काम करत आहे.

एपीडीच्या सगळ्याच उपक्रमाचे विविध स्तरांतून नेहमी कौतुक होत असते. या कामासाठी आकाशला विविध पुरस्कारांनी गौरविण्यातही आले आहे. समाजात काही बदल हवा असेल तर फक्त सुरुवात करून चालणार नाही याची जाणीव आकाशला आहे. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनादेखील या उपक्रमात सहभागी करून घेतले जाते. त्या अंतर्गत शाळांमध्ये जुन्या कागदांचा वापर करून पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्या पिशव्यांचे वाटप शहरातील दुकांनामध्ये केले जाते. आगामी उपक्रमांविषयी आकाश म्हणाला, नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीचे महत्त्व आणि त्याविषयीची जागृती करण्यात येणार आहे. तसेच लावण्यात येणाऱ्या रोपांच्या संगोपनाची आणि देखभालीचीही व्यवस्था केली जाणार आहे. संस्थेचे फेसबुक पेज व संकेतस्थळ असून इच्छुकांना या माध्यमातून संस्थेच्या उपक्रमात सहभागी होता येईल.