अभिजित बेल्हेकर
दरवर्षी ठरवून एखादा विषय घ्यायचा आणि मग तो रंगांमधून कागदावर उतरविण्यासाठी बाहेर पडायचे. अगदी वर्षभर. मग तो विषय, त्या विषयातील तो सारा प्रांत चित्रांमधून साठवून झाला, की पुन्हा शहरात येत त्यावर प्रदर्शने भरवून साऱ्या जगाला ही दडलेली दुनिया दाखविण्याचा आनंद घ्यायचा. पुण्यातील वेगळय़ा वाटेवरचे कलाकार भास्कर सगर यांच्या या कलाध्यासाची यंदा पंचविशी साजरी होत आहे.
पुणे ही कलाकारांची पंढरी. या पंढरीत अनेक सर्जन चित्रकारही आहेत. त्या प्रत्येकाची धाटणी, शैली, वैशिष्टय़े निराळी आहेत. माध्यम एकच असले तरी त्याची हाताळणी, रंगयोजना, वापरलेले तंत्र आणि मुख्य म्हणजे त्या मागचा प्रत्येकाचा विचार स्वतंत्र आहे. अशाच स्वतंत्र विचारांचे, वेगळी वाट जपणारे कलाकार म्हणून भास्कर सगर यांची आज सर्वत्र ओळख आहे.
दरवर्षी ठरवून एखादा विषय घ्यायचा आणि तो रंगांमधून कागदावर उतरवण्यासाठी बाहेर पडायचे. अगदी वर्षभर, मग तो विषय, त्या विषयातील तो संपूर्ण प्रांत चित्रांमधून साठवून झाला, की पुन्हा शहरात येत त्यावर प्रदर्शने भरवून साऱ्या जगाला ही दडलेली दुनिया दाखविण्याचा आनंद घ्यायचा. सगर यांचा गेल्या अनेक वर्षांचा हा निदिध्यास यंदा पंचवीस वर्षांचा होत आहे. अगदी सुरुवातीला ‘पुण्यातील वाडे’ या विषयापासून सुरू झालेला त्यांचा हा चित्रप्रवास पुढे महाराष्ट्रातील गड-किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, समुद्रकिनारे, जंगले, हम्पी, दक्षिण भारत, उत्तर भारत, हिमालय, अंदमान बेट, मुंबई, गुजरात, नद्यांचे घाट असे करत यंदा पंचविशीत विविध जलधारा म्हणजेच धबधब्यांवर येऊन स्थिरावला आहे.
एक विशिष्ट कला. त्यातीलही केवळ जलरंगांची हाताळणी आणि त्यातही ते संपूर्ण वर्ष केवळ या एका विषयाला वाहून घ्यायचे. हे सूत्र जपत गेली २५ वर्षे सगर यांचा हा प्रवास सुरू आहे. ठरलेल्या विषयासाठी त्या प्रांतात जायचे. अगोदर तिथल्या परिसराचा ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक असा अभ्यास करायचा. या एकूण विषयावरील चित्रविषय ठरवायचे. त्यांची छायाचित्रे काढायची, रेखांकने तयार करायची आणि मग शेवटी या कलाकृती तयार करू लागायचे.
या निर्मितीसाठी मग पुन्हा त्या विषयातील प्रांतात कित्येकदा पायपीट करायची, भटकायचे, लोकांशी चर्चा करायची, परवानग्या मिळवायच्या, ऊन-वारा-पाऊस-थंडी यांचा अंदाज घ्यायचा, त्याच्यापासून काळजी घेत मग एकेक दृश्य कागदावर उतरवू लागायचे. गेली २५ वर्षे सगर मोठय़ा जिद्दीने हा चित्रध्यास आणि हव्यास पुरा करत आहेत. यंदा त्यांनी यासाठी हिरव्या निसर्गावर नाचत उधळणाऱ्या प्रपातांची निवड केली आहे. धबधबा म्हटले, की हिरवाईला सौंदर्य बहाल करणाऱ्या त्या शुभ्रधवल जलधारा डोळय़ांपुढे उभ्या राहतात. ठोसेघर, नाणेमाची, सहस्रकुंड, देवकुंड, धारेश्वर, दाभोसा, कालू, कपिलधार, लिंगमळा, अंबोली अशा अनेक जलधारा आणि त्यांच्या सळसळत्या रूपांना सगर यांनी त्यांच्या या रंगांमधून वाहते केले आहे.
सगर यांनी आजवर त्यांच्या या संकल्पनेतून असेच निसर्गाचे विविध आविष्कार आणि त्यांचे सौंदर्य या कलेतून फुलवले आहे. भूगोलाला आकार दिला आहे, पुरातत्त्वीय ते ऐतिहासिक स्थळांमधील विविध कला आणि स्थापत्याला चित्रात बांधले आहे. आमच्या भवतालापासून ते हरवत चाललेल्या इतिहासापर्यंत साऱ्यांचा वेध घेणे ही मानवाची सहजवृत्ती. यातूनच आमच्याकडे या वारसास्थळांच्या दस्तऐवजीकरणाची परंपरा जन्माला आली. सगर यांचा हा उपक्रमदेखील चित्रांच्या माध्यमातून होत असलेले एकप्रकारचे दस्तऐवजीकरण आहे. भास्कर यांनी या सर्व दृश्यांना त्याच्या भाव-भावनांसह चित्रांमध्ये बांधले आहे. त्यांना जिवंत केले आहे. व्यक्तिमत्त्व बहाल केले आहे. ही चित्रमालिका म्हणजे केवळ आकृती आणि रंगांचे आविष्कार नाहीत. तर ते छाया आणि प्रकाशाचे मनोहारी खेळ आहेत. हा मेळ या सर्व चित्रांमध्ये त्रिमितीबरोबर सत्याचा भास निर्माण करतात. या साऱ्यांमुळे रंग-रेषांसारख्या कृत्रिम साधनांचाही काही काळ विसर पडतो आणि आपणही त्या जिवंत देखाव्यांचा एक भाग बनत जातो. त्यांच्या या प्रत्येक चित्रांमधून त्या स्थळाचा भूगोल, इतिहास डोकावतो, सौंदर्याचे दर्शन घडते आणि त्यामागचा विचारही प्रकट होतो. ही सारी चित्रे पाहताना त्या स्थळाच्याच पुढय़ात असल्याचा भास होतो. चित्राशी एकरूप झालेल्या या दृश्यात हरवायला होते. हे असे वाटणे हेच भास्कर सगर यांच्या कलाकृतींचे यश आहे. हा चित्रसोहळा पुण्यातील गोखलेनगर परिसरातील पत्रकारनगरमधील दर्पण कला दालनात येत्या १८ ते २४ जानेवारीपर्यंत रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे.