प्रथमेश गोडबोले
लहान मुला-मुलींपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत आणि नोकरी करणाऱ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वानाच आपले छंद, आवड जोपासण्याची संधी दैनंदिन जीवनातून वेळ काढून मिळतेच असे नाही. एकापेक्षा अधिक छंद असल्यास ते जोपासण्याची संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी कामानिमित्त ओळख झालेल्या चार तरूण-तरूणींनी एकत्र येत ‘बिइंग आर्टिस्ट’ या नावाने एका इन्स्टिटय़ूटची स्थापना केली आहे. या माध्यमातून नृत्य, संगीत, अभिनय, सूत्रसंचालन, योग, छायाचित्रण, दिग्दर्शन, फिल्म मेकिंग असे विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. तसेच शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट ऑफिसेसमधून कार्यशाळा आयोजित केल्या जातात. संस्थेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांद्वारे अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना विरंगुळा म्हणून नाटक, गाणी, नृत्य असे विविध कार्यक्रम सामाजिक दायित्व म्हणून केले जातात.
अजिंक्य भावे, प्रियांका सोनवणे, पूजा वैद्य आणि अमृता कुबेर या चौघांनी एकत्र येत ‘बिइंग आर्टिस्ट’ या फर्मची स्थापना केली आहे. फर्मकडून अभिनय, छायाचित्रण, फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शन, नृत्य (शास्त्रीय आणि पाश्चात्त्य), व्यावसायिक मेकअप, गाणे (शास्त्रीय आणि सुगम संगीत), सूत्रसंचालन, गिटार वादन, तबला वादन, पोलीस किंवा लष्कर भरतीसाठी आवश्यक वाद्यवादन, सॅक्सोफोन, स्वरसंवादिनी, बासरी, पियानो, कीबोर्ड, व्हायोलिन वादन, योग आणि झुंबा यांचे शिक्षण दिले जाते. शिकण्यासाठी वय आणि शिक्षणाची अट नाही. तसेच सकाळी साडेआठ ते रात्री साडे नऊ या वेळेत आठवडय़ातील सातही दिवस वर्ग चालवले जातात.
व्यवसाय सुरू करण्याआधी चौघांनीही व्यावसायिक स्पर्धा लक्षात घेऊन बाजारपेठेचा अभ्यास केला. समाजमाध्यमे, यू टय़ुब चॅनेल, मित्रमैत्रिणी आणि परिचयाच्या मंडळींना कल्पना देत व्यवसायाचा प्रचार, प्रसार केला. तसेच शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन कार्यशाळा घेतल्या. या माध्यमातून फर्मबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचत गेली आणि प्रतिसाद, मागणी येत गेली.
‘आम्हा चौघांची कामाच्या निमित्ताने ओळख झाली. अजिंक्यच्या डोक्यात व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. त्याने त्याच्या मित्र-मैत्रिणींकडे ही कल्पना बोलून दाखवली. त्यानंतर चौघांनी विचार करून मनोरंजन आणि कला यासंबंधी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. लहान मुलं-मुली, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, नोकरी करणारे किंवा सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक यांना दैनंदिन कामकाजातून किंवा अन्य कारणांनी आपले छंद जोपासता येत नाहीत. त्यांच्यासाठी फर्मची स्थापना करण्यात आली आहे. व्यवसाय सुरू केल्यानंतर अशा प्रकारच्या व्यवसायात स्पर्धा खूप आहे. पण जेवढय़ा गोष्टी आम्ही देतो, तेवढय़ा बाकीचे इन्स्टिटय़ूट देत नाहीत. तसेच एकापेक्षा अधिक छंद जोपासण्याची संधी केवळ आमच्या फर्मच्या माध्यमातूनच दिली जाते’, असे पूजा सांगतात.
पूजाने बीबीए, एमएस्सी इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदवी घेतली आहे. प्रियांका हिने सिव्हिल इंजिनिअरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट या पदव्या घेतल्या असून ती एका खासगी कंपनीमध्ये कार्यरत आहे. अजिंक्यने वाणिज्य शाखेची पदवी, डिजिटल ग्राफिक्स अॅण्ड अॅनिमेशनची पदविका प्राप्त केली असून ते स्वत: दिशा कॉम्प्युटर इन्स्टिटय़ुट लोहगाव शाखेचे संचालक आहेत. तर, अमृता हिने कला शाखेची पदवी घेतली असून गांधर्व इन्स्टिटय़ूट येथून संगीताच्या चार परीक्षा दिल्या आहेत. इन्स्टिटय़ूटमध्ये पूजा आणि अमृता या अॅडमिन, कौन्सिलिंगचे काम पाहतात, अजिंक्य विपणन, कोर्स डिझाइन करणे अशी कामे , तर प्रियांका ही इव्हेंटशी संबंधित कामकाज पाहते. या सर्वानी आपापल्या आवडीनुसार कामांची वाटणी केली आहे. फर्मचे कार्यालय कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप येथे आहे. बिइंग आर्टिस्टचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर पेजही आहे. त्याद्वारे फर्मचा प्रचार, प्रसार केला जातो.
फर्मकडून फोटोग्राफी, अभिनय, सिनेमोटोग्राफी, चित्रपट तयार करणे, दिग्दर्शन, नृत्य (शास्त्रीय आणि पाश्चात्य), व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट, गाणे (शास्त्रीय आणि सूगम संगीत), सूत्रसंचालन, गिटार, तबला, ट्रम्पेट (पोलीस किंवा लष्कर भरतीसाठी उपयोगी पडणारी वाद्ये), सॅक्सोफोन, स्वरसंवादिनी, बासरी, पियानो, कीबोर्ड, व्हायोलिन, योगा, झुंबा अशा विविध प्रकारांचे प्रशिक्षण उपलब्ध आहेत. मागणी असल्यास घरी जाऊनही प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह उर्वरित जिल्ह्य़ातील महाविद्यालये, कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये इव्हेंट आयोजित केले जातात आणि कार्यशाळाही घेतल्या जातात. सध्या पुण्यातील हिंजवडी, नळस्टॉप, शनिवार पेठ, वडगावशेरी भागातील पाच महाविद्यालये, तीन शाळा, पाच कॉर्पोरेट कार्यालये येथे कार्यशाळा सुरू आहेत.
‘सध्या फर्ममध्ये गाणे, अभिनय, योग यांसाठी ज्येष्ठ नागरिक आणि इतर वर्गामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फोटोग्राफी, अभिनय, चित्रपट बनवणे, ट्रम्पेट यांकडे तरूणाईचा अधिक कल आहे. आम्ही चौघे काही प्रशिक्षण वर्ग घेतो, काही वर्गासाठी बाहेरून शिक्षकांना पाचारण केले जाते. आगामी काळात व्यवसाय अधिक विस्तारण्याचा आणि आमच्या प्रशिक्षण वर्गामधील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेब सिरीज तयार करण्याचाही मानस आहे,’ असे अजिंक्य सांगतात.
अमृता, अजिंक्य, प्रियांका आणि पूजा