crime incident in pune city पुण्यात कधीही काहीही घडू शकते. अचानक रस्त्यावर भांडणे सुरू होतात. भांडणामुळे वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागतात. किरकोळ कारणावरून वाहनचालकांमध्ये वाद होतात आणि प्रकरण थेट पिस्तूल रोखून जीवे मारण्यापर्यंत पोहोचते. रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीपर्यंत होते. शहरात गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्या असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे पुण्याच्या लौकिकाला गालबोट लागत असून, किरकोळ वादातून थेट खुनाचा प्रयत्न, मारामारी, खून अशा प्रकारच्या घटनांमुळे एकंदर समाजजीवनात वावरणे तितकेसे सोपे नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. शहराचा वाढता विस्तार, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते अशा अनेक समस्या आहेत. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचे संख्याबळ अपुरे आहे. प्रत्येक चौकात पोलीस नेमणे परवडणारे नाही. वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील. वाहतूक कोंडी हा वेगळा विषय आहे. शहरात विकासकामे सुरू आहेत. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालणे देखील अवघड झाले आहे. वाहतूक कोंडी, समस्या हा वेगळा प्रश्न आहे. मात्र, रस्त्यावर वाहनचालकांमध्ये वाद झाल्यास प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचते, हे बिघडलेल्या समाजस्वास्थ्याचे लक्षण आहे, असे म्हणणे गैर ठरणार नाही.
हेही वाचा >>> पुणे: धरणांच्या परिसरात रात्रभर संततधार, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
पुणे शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना विचारात घेतल्यास ‘वाटेवरती काचा गं’, अशी परिस्थिती आहे. कामाच्या व्यापात, धावपळीत असलेले वाहनचालक कधी हमरीतुमरीवर येतील, याचा नेम नाही. विश्रांतवाडी भागात नातेवाइकांच्या विवाहासाठी गेलेल्या मोटारचालक तरुणावर हाॅर्न वाजविण्याच्या वादातून पिस्तूल रोखण्याची घटना नुकतीच एका मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घडली. मोटारचालक तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करण्यात आला. दैव बलवत्तर होते म्हणून तरुण बचावला. अशाच प्रकारची घटना पाषाण-बाणेर रस्त्यावर घडली. एका तारांकित हाॅटेलमध्ये व्यवस्थापक असलेली तरुणी दुचाकीवरून निघाली होती. भरधाव वेगाने तेथून मोटारचालक गेला. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले होते. चिखल उडाल्याने पुढे जाऊन तरुणीने मोटारचालकाला मोटार हळू चालविण्यास सांगितले. ‘पावसाळ्याचे दिवस आहेत. खड्ड्यातून मोटार नेल्यास चिखल उडतो’, असे तरुणीने मोटारचालकाला सांगितले. त्यानंतर मोटारचालक भडकला आणि त्याने थेट दुचाकीस्वार तरुणीचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर दुचाकीला मोटार आडवी घालून मोटारचालकाने तरुणीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने थेट तरुणीच्या नाकावर ठोसा मारला आणि काही क्षणात तरुणी रक्तबंबाळ झाली. हे सगळे सुरू असताना मोटारचालकाच्या पत्नीने तरुणीला शिवीगाळ केली. या घटनेनंतर नागरिकांनी पकडून मोटारचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. चतु:शृंगी पोलिसांनी मोटारचालक आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हे प्रकरण ताजे असतानाच कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पुणे पोलीस दलातील पोलीस शिपायाला कर्तव्याचा विसर पडला. बंडगार्डन रस्त्यावर पीएमपी बस शेजारून गेल्याने चिडलेल्या पोलीस शिपायाने पीएमपी बसला दुचाकी आडवी घातली. भरस्त्यात पीएमपी थांबल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ‘बस जोरात का नेली?’अशी विचारणा करून पोलीस शिपाई थेट बसचालकाच्या केबिनमध्ये शिरला. पीएमपी चालकाला पोलीस शिपायाने थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पीएमपी चालकाने मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला ‘माझी काय चूक झाली?’ अशी विचारणा केली. पोलीस शिपायाने पीएमपी चालकाची बाजू ऐकून न घेता त्याला मारहाण सुरूच ठेवली. पीएमपी बसमधील एका प्रवाशाने मोबाइलवर चित्रफीत काढून ती समाज माध्यमात प्रसारित केली. पोलीस शिपायाची मुजोरी पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहाेचले. मात्र, पोलीस ठाण्यातील वरिष्ठांनी हे प्रकरण शांत केले. दोघेही शासकीय कर्मचारी असल्याने त्यांच्यातील वाद सामोपचाराने मिटला. पोलीस शिपायाने पीएमपी चालक आणि वाहकाची माफी मागितली. मात्र, समाज माध्यमात प्रसारित झालेली चित्रफीत पाहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलीस शिपायाचे कृत्य पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पोलीस शिपायाला निलंबित केले.
हेही वाचा >>> महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून अजित पवारांवर कुरघोडी? पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांच्या अचानक तपासणीचा आदेश
चार महिन्यांपूर्वी लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केट परिसरातील अरुंद गल्लीत दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरून दुचाकीस्वार तरुणी आणि तिच्या आईला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दुचाकीस्वार आणि त्याच्याबरोबर असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी थरकाप उडवणारी घटना हडपसर-सासवड रस्त्यावर घडली होती. एका मोटारचालक तरुणाचा किरकोळ वादातून कोयत्याने वार करून टोळक्याने खून केला होता. मोटार खड्ड्यातून नेल्याने अंगावर चिखल उडाल्याने टोळक्याने तरुणावर हल्ला केला. पंचविशीत असलेल्या मोटारचालक तरुणाचा रस्त्यावर झालेल्या वादातून खून झाल्याने खळबळ उडाली होती. धकाधकीच्या जीवनात किरकोळ वाद होत असतात. एकेकाळी शांत शहर अशी ओळख असलेले पुणे आता महानगर झाले आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे पुण्याच्या नावलौकिलाला गालबोट लागते. पुण्यात शिक्षण, व्यवसाय, नोकरीसाठी स्थायिक होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असून, अनेकजण पुण्यात वास्तव्य करण्यास प्राधान्य देतात. मात्र, किरकोळ वाद जीवघेणे ठरू लागल्याने पुण्याच्या नावलौकिकाला बट्टा लागत आहे.
rahul.khaladkar@expressindia.com