श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्तदानामुळे अनेक जीवांचा प्राण वाचू शकतोच, पण त्याबरोबरच रक्तदान करणाऱ्यालाही त्याचे अनेक फायदे होतात. स्वार्थीवृत्ती बाळगत समाजासाठी नाही, तर स्वत:साठी तरी रक्तदान करणे उपयुक्तच. रक्तदान, शिबिर आयोजन याची सुयोग्य माहिती देण्यासाठी रक्तपेढीचे कार्यकर्ते कायमच उत्सुक असतात. वयाची तमा न बाळगता कार्यरत असणाऱ्या दौलतराव मराठे आणि रवींद्र कुलकर्णी यांच्या कार्याबद्दल जाणून घेताना नवी ऊर्जा मिळते.

आपल्यापैकी अनेकांनाच देण्याने समाधान मिळते. काही वेळा काय द्यावे आणि किती द्यावे असेही होऊन जाते. घेणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता यावा म्हणून अनेक मंडळी काही ना काही सतत देत असतात. अर्थातच यातील स्वार्थी वृत्ती काहीशी घातकच. पण दरवेळी पैसा, वस्तू यांच्या दानापेक्षा आपल्यापाशी जे मुबलक आहे आणि जे दिल्याने वाढते असे दान केल्यास त्याचा कितीतरी फायदा होऊ शकतो. आपल्यापाशी असलेल्या या गोष्टीबाबत आपण अनभिज्ञ असतो आणि जे आपल्याला सहजतेने देता येऊ शकते आणि ज्यामुळे एखाद्याचा जीव वाचतो ते म्हणजे रक्त. या रक्तदानाचे महत्त्व सांगण्याबरोबरच रक्तदान शिबिरांचे संयोजन करणारे दौलतराव गजानन मराठे.

चिंचवडसारख्या औद्योगिक संस्थेत नोकरी करणाऱ्या दौलतराव यांनी १९ एप्रिल ८३ रोजी जनकल्याण रक्तपेढीची स्थापना झाल्यापासून या रक्तपेढीला वाहून घेतले. १९९६ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते आपला पूर्णवेळ रक्तपेढीसाठीच कार्यरत राहण्याचा घेतलेला वसा न उतता, न मातता पूर्णत्वास नेत आहेत. पूर्वीचीच तन्मयता असणाऱ्या दौलतराव यांचे वय फक्त ८४ वर्ष, तरीही तरुणाईला लाजवेल इतका उत्साह, चपळता इतकेच नाही तर विचारांमध्ये स्पष्टता आणि मृदुभाषिक ही त्याची स्वभाववैशिष्टय़े त्यांच्या कार्यात आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडत आहेत. त्यांच्या पत्नी कुसुमताई यांची साथ आणि त्यांच्या स्वत:च्या आजारपणातही पतीने आपले सामाजिक कार्य थांबवू नये ही सदिच्छा, यातच दौलतराव यांच्या सामाजिक कार्याचे गमक दडले आहे. सध्या मराठे यांच्याकडे महाविद्यालये आणि इतर संस्थांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन, नियोजन, संयोजन करण्याची जबाबदारी आहे. हे सर्व यथासांग पार पाडेपर्यंत त्यांना शांतपणा नसतो. त्यांनी पाच हजारहून अधिक रक्तदान शिबिरांमध्ये सहभाग घेतला असून साठ हजारहून अधिक रक्तदात्यांना रक्तदानाची प्रेरणा दिली आहे. जनकल्याण रक्तपेढी केवळ स्थापनेपासून नाही, तर शनिवार पेठेतून स्वारगेटसारख्या मोक्याच्या ठिकाणी पाच मजली भव्य वास्तू उभारण्यातही मराठे यांचा सिंहाचा वाटा आहे.

रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्याच्या दौलतराव मराठे यांच्या कार्यात त्यांच्याबरोबरच रक्तदान प्रबोधक म्हणून रवींद्र कुलकर्णीदेखील मराठे यांच्याइतक्याच उत्साहाने कार्यरत आहेत. टाटा मोटर्समधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. दिवसभरातील चार ते सात तास आठवडय़ाचे सातही दिवस ते कार्यरत असतात. रक्तपेढीमध्ये सुरुवातीला व्यवस्थापन आणि रक्तदान शिबिरांना जायला सुरुवात करून कुलकर्णी यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. सध्या ते पुण्यात तसेच पुण्याच्या बाहेर शिबिरांना जाण्यापासून रक्तदानासाठी जनजागृती करण्याच्या कार्यात आहेत.

कुलकर्णी सध्या आयटी क्षेत्रात रक्तदानाविषयी जनजागृती करणे, रक्तदान शिबिरांचे नियोजन, आयोजन करणे या जबाबदारीबरोबरच रक्तपेढीसाठी देगणीदार आणणे, त्यांच्या देणग्यांचा सुयोग्य विनियोग करण्यासाठीचे नियोजन करणे आदी जबाबदाऱ्या व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले कुलकर्णी समर्थपणे सांभाळत आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या त्यांच्या पत्नी स्नेहल या निवृत्तीपूर्वी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. आता मुलांना शिकवण्यापासून विविध प्रकारचे सामाजिक कार्य त्या करतात.

रक्तदानापूर्वी सुयोग्य हिमोग्लोबीन, वजन आदी गोष्टी कशा आवश्यक आहेत, हे रक्तदात्यांना समजावून सांगण्याबरोबरच त्यांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे, रक्दानाचे महत्त्व विषद करणे, रक्तदान शिबिर आयोजनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती आयोजकांना देणे आदी बाबी सांभाळत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे, तेही वयाच्या बहात्तराव्या वर्षी. रक्तदान शिबिर घेताना, रक्तदात्यांशी संवाद साधताना त्यांना कोणतीही चुकीची माहिती दिली जाणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच रक्तदाता-आयोजक आणि रक्तपेढी यांच्यामध्ये पारदर्शकता, सौहार्दपूर्ण वातावरण कसे असेल याविषयी कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी, डॉक्टर्स जागरुक असतात. त्यांच्या या सगळ्या कार्यकुशलतेमुळे जनकल्याणसाठी वर्षभरात होणाऱ्या रक्तदानामध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. ईमेलद्वारे विविध कंपन्यांशी संवाद साधण्यावर भर देत असतानाच जनजागृतीसाठी विविध भित्तिपत्रके तयार करून घेण्यात कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा आहे.

तुम्हाला रक्तदान शिबिर आयोजित करायचे असेल किंवा रक्तदानासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल, जनकल्याण रक्तपेढीचे कार्य जाणून घ्यायचे असेल तर रवींद्र कुलकर्णी यांच्याशी ९८२२६६८३८१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

आपल्या वेळेचा सदुपयोग व्हावा, गरजू रुग्णांना योग्य प्रक्रिया केलेले रक्त मिळावे, अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे, रक्तदान करताना दानकर्त्यांना आणि रक्त घेणाऱ्या दात्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून सदैव तत्पर असणारे दौलतराव मराठे आणि रवींद्र कुलकर्णी या दोघांबरोबरच्या संवादातून, त्यांचे कार्य जाणून घेतानाही वेगळीच अनुभूती मिळते. मनाची दौलत लुटणारे दौलतराव आणि आपल्या प्रकाशात इतरांनाही प्रकाशमान करण्यासाठी प्रेरित करणारे रवींद्र यांच्यासारखी मंडळी नव्या तसेच जुन्या पिढीसाठी केवळ प्रेरणादायीच नाहीत तर आदर्श वाटावीत अशीच आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about daulatrao marathe and ravindra kulkarni work
Show comments