चार दशकांपूर्वीच्या जॉर्जचे रूप आजही हृदयात ठसलेले
आणीबाणीनंतर आम्ही तुरुंगातून सुटून बाहेर आलो. कामगारदिन आणि महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून मार्केट यार्ड-गुलटेकडी येथे उभारण्यात आलेल्या हमाल भवनाचे उद्घाटन १ मे १९७७ रोजी ठरले होते. त्या उद्घाटन कार्यक्रमाला कुर्ता-पाजयमा आणि काळय़ा काडय़ांचा चष्मा परिधान करून आलेला जॉर्ज चक्क खाली जमिनीवर मांडी घालून बसला आणि हमालांबरोबर त्याने झुणका-भाकरचे जेवण घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आपल्या कष्टकऱ्यांचा नेता किती साधा आहे आणि आपल्यामध्ये मिसळून तो आपल्यातील एक झाला आहे, या भावनेने हमालांना आनंद झाला होता. चार दशकांपूर्वीचे जॉर्जचे हे रूप आजही माझ्या हृदयात वसलेले आहे.
ही भावना आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जॉर्ज फर्नाडिस यांचे निकटचे सहकारी डॉ. बाबा आढाव यांची. किसान, कामगार, हमाल, रेल्वे कामगार, टॅक्सीवाले, माथाडी आणि देवदासी अशा सर्व वंचित घटकांपर्यंत समाजवादी चळवळ पोहोचविणाऱ्या जॉर्जच्या सामाजिक परिवर्तनाचा आशय व्यापक होता, अशा शब्दांत आढाव यांनी फर्नाडिस यांच्या कार्याचा गौरव करीत आठवणी जागवल्या.
पुढे त्याच्या भूमिकेत बदल झाला आणि भाजपसमवेत गेल्यामुळे आमच्यामध्ये मतभेद झाले. पण, शेवटच्या माणसासाठी काही करण्याची त्याची तळमळ हा आमच्यातील समान धागा असल्यामुळे आमच्यामध्ये मनभेद झाले नाहीत. रेल्वे स्थानकावरील हमाल म्हणजे लाल डगलेवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या संघटनेचा जॉर्ज अध्यक्ष होता आणि मी उपाध्यक्ष होतो, असेही त्यांनी सांगितले.