दैनंदिन व्यवहारात वापरता येण्याजोग्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पनेतून मलय पाटील यांनी साबणाचे उत्पादन करण्याचे निश्चित केले. त्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अभ्यास केला. इतर कंपन्यांची उत्पादने अभ्यासली. विविध अंगांनी अभ्यास करून मलय सोप प्रा. लि. या कंपनीची स्थापना त्यांनी केली. अल्पावधीत संपूर्ण महाराष्ट्र आणि चैन्नई, कोलकाता, आग्रा, कानपूर अशा मोठय़ा शहरांसह परदेशातही कंपनीची उत्पादने पोहोचली आहेत.
मलय सोप प्रोप्रायटरशिप फर्म या नावाने मलय पाटील यांनी या उत्पादनाला प्रारंभ केला. त्यानंतर मलय प्रा. लि. या नावाने कंपनी १ ऑगस्ट २०१६ मध्ये स्थापना केली. ते मूळचे रायगडचे. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात आले. मलय यांनी बीएस्सी आयटी आणि वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली आहे. पदवीनंतर अनुभव घेण्यासाठी काही वर्षे त्यांनी खासगी कंपनीत नोकरी केली. व्यवसाय सुरू करण्याआधी दैनंदिन व्यवहारामध्ये सामान्य लोकांना वापरता येईल आणि वस्तू सहज वापरता येईल, असे उत्पादन करण्याच्या विचारातून साबण तयार करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्या दृष्टीने मलय यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारातील साबण उत्पादनात समानता काय आहे, त्यासंबंधीची पुस्तके, कोणत्या ढाचा/साच्यात आतापर्यंत उत्पादन तयार झालेले नाही, अशा विविध अंगांनी एक वर्ष अभ्यास केला. त्यामुळे वेगळे उत्पादन कसे तयार करायचे, याबाबत निश्चित स्वरूपात त्यांना दिशा मिळाली. आपले उत्पादन तयार करताना भारतीय परंपरा अनुसरण्याकडे त्यांचा कल होता. इंटरनेटवरून व्यापार कंपन्यांची माहिती घेतल्यानंतर हिमाचल प्रदेश आणि खालापूर येथील दोन कंपन्या निश्चित करून अखेर तेथे मलय सोपचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली.
उत्पादन तयार झाल्यानंतर ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम होते. पुणे आणि रायगडमधील मित्र, नातेवाईक, ओळखीच्या लोकांपर्यंत उत्पादन पोहोचवण्यास मलय यांनी सुरुवात केली. हे करत असताना आपले उत्पादन स्थानिक न वाटता, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रॅण्ड वाटावे यासाठी त्याच्या डिझाइनसाठी मलय यांनी प्रयत्न केले. दुकाने, मॉल, सुपर मार्केट अशा ठिकाणी उत्पादन विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू मागणी वाढत गेली. उत्पादनाची किंमत सुरुवातीला ४५ रुपये होती.
‘अभ्यासाच्या सुरुवातीलाच पहिल्या पंधरा दिवसांत आपले उत्पादन कसे असेल, हे मी निश्चित केले होते आणि त्या दृष्टीनेच पुढील तीन महिने अभ्यास केला. त्यानंतर सात महिने उत्पादनातील वैशिष्टय़े, बाजारातील इतर उत्पादनांपेक्षा वेगळेपण यासाठी प्रयत्न केले. उत्पादनाची कल्पना निश्चित झाल्यानंतर मी ज्या घटकांपासून उत्पादन तयार करणार होतो, त्यामध्ये साबण तयार करणाऱ्या कंपन्या उत्पादन घेण्यास तयार नव्हत्या. या व्यवसायात सर्वसाधारणपणे करारपद्धतीने उत्पादन तयार केले जाते. तुम्ही ठरावीक साचा/सूत्र घ्या, बाहेरच्या कंपन्या त्यांचा कच्चा माल वापरून अंतिम उत्पादन घेऊन तुमच्याकडे देतात. मला हे मान्य नव्हते. कच्चा माल स्वत: निवडून मी त्याचा पुरवठा करणार आणि माझ्या निगराणीखाली अंतिम उत्पादन होईल, अशी माझी अट होती. त्याला अनेक कंपन्या तयार नव्हत्या. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्य़ातील एक आणि खालापूर येथील एक अशा दोनच कंपन्या तयार झाल्याने तेथेच उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला,’ असे मलय सांगतात.
मलय यांचे साबण हे एकच उत्पादन आणि एकाच फॉम्र्युलेशनमध्ये तयार होत असल्याने त्यांनी स्वत:चा कारखाना सुरू करण्याऐवजी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग हा पर्याय निवडला आहे. उत्पादनाचे सूत्र, ढाचा चुकल्यास एक पूर्ण बॅच खराब होत असल्याने एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेता येत नाही. मलय सोपमध्ये उटणे (नागरमोथा, अॅलोवेरा, हळद, वाळा, नीम, सरीवा, त्रिफळा, मंजिष्ठा) ग्लिसरीन, मिल्क पावडर, मुलतानी माती असा कच्चा माल वापरला जातो. ग्राहकांकडून मागणी आल्यास उत्पादन तयार करताना वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचीही विक्री केली जाते. तसेच ज्या ग्राहकांना आयुर्वेदिक प्रकारात उत्पादन हवे असल्यास त्यांच्यासाठी पावडर स्वरूपात विक्री केली जाते.
‘चेन्नई, कोलकाता, जयपूर, जबलपूर, आग्रा, कानपूर अशा शहरांसह गोवा, दिल्ली राज्यांमध्ये मलय सोप पोहोचला आहे. तर, संपूर्ण महाराष्ट्रातूनही उत्पादनाला मागणी आहे. परदेशात इटली, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका आणि घाना अशा देशांमध्येही उत्पादन पोहोचले आहे. परदेशातील कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणात उत्पादनाला मागणी आहे. ऑनलाइन भाजी विक्री आणि टॉयलेट क्लीनर, हॅण्डवॉश, कार वॉश अशी घरगुती वापरासाठीची उत्पादने विक्रीला नुकतीच सुरुवात केली आहे. ही उत्पादने आणि मलय सोप संपूर्ण देशभरात पोहोचवण्याचा मानस आहे,’ असेही मलय सांगतात.
prathamesh.godbole@expressindia.com