श्रीराम ओक
समाजातील एखादा प्रश्न किंवा विषय हाती घेऊन तो सोडवण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था पुण्यात आहेत. या संस्थांनी सेवाध्यासाचा आदर्श उभा केला आहे. विविध सामाजिक प्रश्न-समस्या सोडविण्यासाठी कार्य करणाऱ्या अशा संस्थांची ओळख ‘सेवाध्यास’ या सदरातून होईल. ज्या योगे एखादी समस्या उद्भवली, तर संबंधित सामाजिक संस्थेची जशी मदत घेता येईल, तसेच विशिष्ट सेवाकार्यासाठी आर्थिक योगदानापासून ते संस्थेसाठी काही वेळ देण्याची इच्छा असणाऱ्यांपर्यंत सर्वाना उपयुक्त माहितीही मिळू शकेल.
शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक तसेच सामाजिक या सर्वच स्तरांमधून मुलांची जडणघडण होते हे आपण सर्वच जण जाणतो. या जडणघडणीमध्ये पालकांच्या बरोबरीनेच शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाचा मोलाचा वाटा असतो. सगळ्याच मुलांचा विकास एकसारखा होत नाही, हे खरे. गतिमंद (स्लो लर्नर) मुलांची दैनंदिन जीवनातील आणि शिक्षणातील गतीही इतर मुलांपेक्षा तुलनेने कमी असते. या मुलांच्या पालकांची ‘नॉर्मल’ मुलांपेक्षा या मुलांना वाढविण्यामध्ये अधिक ऊर्जा, वेळ आणि अनेकदा पैसाही खर्च होतो. अशा मुलांच्या शिक्षणाची वेगळी व्यवस्था असते, जी ‘पंचकोश फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.
धायरी येथे असलेल्या संस्थेच्या शाळेत सध्या अकरा गतिमंद मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. ही संस्था प्रामुख्याने अध्ययन अक्षम, गतिमंद, वर्तन समस्या असलेल्या मुलांसाठी कार्य करते. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक पद्धतीने या मुलांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडविणे तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे कार्य संस्थेमार्फत केले जाते. या मुलांसाठी वेगवेगळी व्यवसाय कौशल्य, जीवनमूल्ये यांची सांगड घालत त्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचे कार्य संस्थेमार्फत सुरू आहे. या संस्थेच्या संचालिका अपर्णा अत्रे यांनी या मुलांसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्थांसाठी समुपदेशक म्हणून यापूर्वी कार्य केले असून या अनुभवांचा उपयोग त्या आता स्वत:च्या संस्थेसाठी करीत आहेत.
विशेष मुलांनी आपल्या बुद्धीचा वापर वेगळेपणाने करून सर्व कृती, विचार अमलात आणावेत, विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, राग व ताण यांचे व्यवस्थापन करावे, स्वत:ची मते प्रभावीपणे, योग्य पद्धतीने व्यक्त करावीत, स्वत:च्या भावना नियंत्रित ठेवून दुसऱ्याच्या भावना देखील समजून घ्याव्यात यासाठी प्रशिक्षित करण्याचे कार्य फाउंडेशनमार्फत करण्यात येते. या मुलांना आपली आंतरिक शक्ती व गुणवैशिष्टय़े ओळखण्याची संधी मिळावी तसेच त्यावर लक्ष देऊन उत्तम यश मिळविण्यास मदत व्हावी, गरजेनुसार स्वत:मध्ये योग्य बदल घडविण्याची मानसिकता निर्माण व्हावी हे कार्य देखील येथे केले जाते.
संस्थेमार्फत इतर उपक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आनंदशाळा’ तसेच मुलांसाठी, कौटुंबिक, वैवाहिक, शैक्षणिक समुपदेशन तसेच शिक्षणप्रवाहात परत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘मी साक्षर’ हा उपक्रम देखील चालविला जातो. यामध्ये दहावी, बारावी ते पदवीसाठी मार्गदर्शन तसेच मदत केली जाते.
पंचकोश फाउंडेशनच्या अत्रे यांच्याशी तुम्ही ९८९०६९०५९७ या क्रमांकावर संपर्क साधून गतिमंद मुले, पालक यांना आवश्यक असलेले समुपदेशन, मार्गदर्शन मिळवू शकता. या मुलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ देण्याबरोबरच संस्थेतील मुलांना तुमच्याकडील कौशल्य शिकवू शकता. संस्थेमार्फत भविष्यात ताणातून आत्महत्येला प्रवृत्त होणाऱ्या मानसिकतेला दूर करता यावे म्हणून हेल्पलाइन योजना, महिलांचे सक्षमीकरण, लघुउद्योजक घडविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, कौशल्यविकास या क्षेत्रांमध्ये कार्य करण्यात येणार आहे.