टीव्ही पाहण्याची चंगळ गेल्या दोन-तीन दशकांत जगभर फोफावली, कारण बातम्या, खेळ, चित्रपट, गाणी, विज्ञान, कार्टून, शैक्षणिक कार्यक्रम, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन अशा प्रत्येकाला हवे ते, हव्या त्या स्वरूपात देण्यासाठी स्वतंत्र दूरचित्रवाहिन्या सरसावल्या. आजतागायत जगात १५ हजार टीव्ही वाहिन्या दर्शकांची चोवीस तास दृश्यभूक भागवत आहेत. जगभरच्या वाहिन्यांची भारत ही मोठी बाजारपेठ आहे. डिस्कव्हरीची ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’ सारखी पूर्ण वेळ प्राणिजगताची इत्थंभूत माहिती देणारी वाहिनी प्रेक्षकांचा अदमास घेण्यासाठी सुरू झाली. भारतात या वाहिनीला मिळालेला उदंड प्रतिसाद इथल्या प्राणिप्रेमी जगताचे चित्र स्पष्ट करणाराच होता. दीड दशकात प्राण्यांविषयी नवनव्या वैश्वानिक शोधांमुळे अ‍ॅनिमल प्लॅनेटने जागतिक यश कमावले. प्राणिप्रेमींचे माहितीपर मनोरंजन या वाहिनीने केले. पण या दरम्यान, प्राण्यांसाठीही मनोरंजन वाहिनी का उभारली जाऊ नये, याबाबत वेगवेगळ्या अचाट कल्पना मांडण्यात आल्या. या कल्पनांचा परिपाक म्हणजे दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत सुरू झालेली ‘डॉग टीव्ही’ ही संपूर्णपणे श्वानांसाठी तयार करण्यात आलेली वाहिनी. श्वानप्रेमींना श्वानांवरील कार्यक्रम दाखवणारी ही वाहिनी नाही, तर याचे प्रेक्षकच श्वान आहेत. सध्या श्वानपालकांनी या वाहिनीला स्वीकारले आहे. जगातील तेरा देशांत ही वाहिनी दिसते; आणि येत्या काळात भारतातही तिचे प्रक्षेपण सुरू करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

डॉग टीव्हीची संकल्पना

आवाज, दृश्य हे श्वानांना आकर्षित करतात. त्या आधारे श्वानांसाठी स्वतंत्र वाहिनी तयार करण्याची संकल्पना पुढे आली. कोणत्या प्रकारचे आवाज-दृश्य श्वानांना आकर्षित करतील यावर संशोधन सुरू झाले आणि २०१२ मध्ये कॅलिफोर्निया येथे श्वानांसाठी काही कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली. विविध पातळ्यांवर चाचणी घेतल्यानंतर श्वानांसाठी पूर्ण वेळ स्वतंत्र वाहिनीची निर्मिती करण्यात आली. ‘रॉन लेवी’ हे या वाहिनीचे संस्थापक निर्माते आहेत. ‘अ‍ॅनिमल बिहेविअर’ या विषयातील ५० हून अधिक तज्ज्ञांनी मिळून या वाहिनीसाठी कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. सध्या अमेरिकेबरोबरच जपान, जर्मनी, फ्रान्स, साऊथ कोरिया, चीन, इंग्लंड, आर्यलड, नेदरलँड्स, पोर्तुगाल, इस्राईल, लक्झंबर्ग या देशांमध्ये डॉग टीव्हीचे प्रक्षेपण होते. सध्या ही वाहिनी भारतात प्रक्षेपित होत नसली, तरी येत्या काळात भारतातही त्याचे प्रक्षेपण सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे लेवी यांनी ई-मेलद्वारे घेण्यात आलेल्या मुलाखतीत सांगितले. या वाहिनीमध्ये विज्ञान, पर्यटन, प्राणिजगतातील वाहिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स’ या माध्यम समूहाचेही समभाग आहेत. गेल्या वर्षीपासून डॉग टीव्हीवर प्रक्षेपित होणारे काही कार्यक्रम ‘डॉग टीव्ही अवर’ म्हणून अ‍ॅनिमल प्लॅनेट या वाहिनीवरही दाखवण्यात येतात. ‘डॉग टीव्ही’वरील कार्यक्रमांच्या यूटय़ूबवर उपलब्ध असणारे व्हिडिओज श्वानप्रेमींमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. भारतात प्रक्षेपण सुरू झाले नसले तरी ही वाहिनी ऑनलाइन पाहता येऊ शकते किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून यावरील कार्यक्रम पाहता येऊ शकतात. ‘डॉग टीव्ही एनीव्हेअर’ हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.

काय असते यात?

डॉग टीव्हीने श्वानांसाठी साधारण २ हजार कार्यक्रमांची रचना केली आहे. श्वानांना रंग कळत असले तरी माणसापेक्षा ते त्यांना थोडे वेगळे दिसतात. त्यामुळे कोणते दृश्य श्वानांना कसे दिसेल, कोणते आवाज त्यांच्यात कोणत्या भावना निर्माण करू शकतात याचा अभ्यास करून या कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. ‘रिलॅक्सेशन’ म्हणजे श्वानासाठी विरंगुळा देणारे किंवा त्यांचा तणाव कमी करणारे कार्यक्रम, ‘स्टिम्युलेशन’ म्हणजे त्यांना खेळण्यासाठी उद्युक्त करणारे, त्यांचा आळस घालवणारे कार्यक्रम त्याचबरोबर बरोबर कुणीतरी असण्याची गरज भागवणारे कार्यक्रम आणि ‘एक्सोजर’ म्हणजे श्वानांना नव्या गोष्टींची ओळख करून देणारे, नव्या गोष्टी शिकवणारे कार्यक्रम असे तीन प्रकारांत वर्गीकरण करून कार्यक्रमांची निर्मिती होते. प्रत्येक कार्यक्रम हा साधारण तीन ते सहा मिनिटांचा असतो. त्याचप्रमाणे श्वानपालकांसाठीही आणि श्वान आणि त्याचे पालक एकत्र खेळू शकतील अशा कार्यक्रमांचेही प्रक्षेपण होते. ‘श्वानांची स्वभाववैशिष्टय़े, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या क्षमता लक्षात घेऊन या कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे,’ असे लेवी यांनी सांगितले.

भारतातील वाढते श्वानप्रेम आणि बाजारपेठ पाहता विविधांगी टीव्ही वाहिन्यांच्या प्रेक्षक पसाऱ्यात घरातील श्वानांनाही स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘डॉग टीव्ही’च्या निमित्ताने श्वानप्रेमाला पुढील काळात नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader