पुण्यातील टेकड्या वैभव आहे. हिरवाईने नटलेल्या टेकड्या शहराच्या सौंदर्यात भर घालतात. वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, कोंडी, प्रदूषणामुळे त्रासलेले नागरिक नियमितपणे शहरातील टेकड्यांवर फिरायला जातात. टेकड्यांवरील फेरफटक्यामुळे दिवसभराचा थकवा दूर तर होतोच, पण त्रासलेल्या नागरिकांना ऊर्जाही मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून टेकड्यांवर लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. ‘बोपदेव घाट’ प्रकरण, तसेच टेकड्यांवरील लूटमारीच्या घटनांमुळे नियमित फिरायला जाणारे नागरिक दहशतीखाली आहेत. चोरट्यांच्या दहशतीमुळे टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांचा श्वास घुसमटतोय…

पुणे शहरातील पर्वती, तळजाई, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडी, बाणेर टेकडीचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या पुण्यातील टेकड्या म्हणजे हिरवाईने नटलेली बेटे आहेत. या टेकड्यांवरील स्वच्छ हवा, निसर्गरम्य वातावरणातील फेरफटका हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा कप्पा आहे. धकाधकीच्या आयुष्यातील टेकड्यांवरील फेरफटका कामाचा ताण तर दूर करतो. कामाचा ताण, कौटुंबिक समस्या, आरोग्य, मानसिक तणावावर सर्वोत्तम उपाय म्हणजे पुण्यातील टेकड्या आहेत. बोपदेव घाट, कात्रज घाटात अनेकजण नियमित जातात. बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला आलेल्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे पुण्यातील सुरक्षेला गालबोट लागले. महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे पुणेकर हादरलेले असताना एकापाठोपाठ शहरातील टेकड्यांवर लूटमारीचे सत्र सुरू झाले. बलात्कार, लूटमारीच्या घटनांमुळे नागरिकही घाबरले. टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांना धोक्याची जाणीव झाली. निसर्गरम्य टेकड्यांवर नियमित फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी टेकड्यांवर जाणे थांबविले. टेकड्यांवरील लूट आणि बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणामुळे पुण्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.

हेही वाचा >>> चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणारा आरोपी गजाआड, दोन दिवस पोलिसांकडून आरोपीचा शोध

शांत, सुरक्षित शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक एकेकाळी होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वाढत्या नागरीकरणामुळे पुण्यातील शांतता वाहनांच्या कर्णकर्कश आवाजात हरवून गेली. शहरातील महत्त्वाचे रस्ते, गल्लीबोळांतून चालणे अवघड झाले. सगळीकडे गजबज, कोलाहल दिसू लागला. गेल्या वीस वर्षांत पुणे शहर बदलून गेले. शहराचा विस्तार वाढला. शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील नोकरीची संधी, रोजगाराच्या संधीमुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक स्थायिक झाले. शहराचा विस्तार झपाट्याने वाढला. मुंबईपेक्षा जास्त मोठे क्षेत्रफळ आणि विस्तार असलेल्या पुण्यातील शांतता हरवून गेली आणि बघता बघता पुण्याचे रूपांतर महानगरात झाले. महानगरातील बकालपणा जाणवू लागला. वाढती गुन्हेगारी, धोकादायक वाहतूक, वाढत्या अपघातांमुळे शहरातील नावलौकिकाला धक्का पोहोचला. पादचाऱ्यांचे हक्काचे पदपथ अतिक्रमणांनी व्यापले गेले. वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर अपघात वाढले. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे असुरक्षित वाटू लागले. पुण्यात पादचाऱ्यांची सुरक्षा तर वाऱ्यावर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कधी एखादा वाहनचालक धडक देईल, याचा नेम नाही. चालताना काळजीपूर्वक चालावे लागते. खड्डे, गटारांची झाकणे, अतिक्रमणांच्या विळख्यातून नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. चालताना मोबाइलकडे लक्ष द्यावे लागते. दुचाकीस्वार चोरटे काही क्षणात मोबाइल चोरून पसार होतात. अशा परिस्थितीत नागरिकांच्या हक्काच्या टेकड्यांवरील सुरक्षा धोक्यात आली आहे.

हेही वाचा >>> ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील आरोपींकडून मद्य, अमली पदार्थांचे सेवन

बाणेर टेकडीवर इशान्येकडील राज्यातून आलेल्या महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या मित्राला लूटण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणात पोलिसांनी चोरट्यांना अटकही केली. त्यानंतर पुन्हा बाणेर टेकडीवर इशान्येकडील राज्यातील तीन तरुणींना लूटण्यात आल्याची घटना घडली. सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्याकडील सोनसाखळी चोरण्यात आली. कात्रज घाटात नियमित फिरायला जाणाऱ्या दोन तरुणांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे मोबाइल संच चोरून नेण्यात आले. ‘बोपदेव घाट’ प्रकरणानंतर पोलिसांनी शहरातील टेकड्यांच्या परिसरात गस्त घालण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेकड्यांच्या परिसरात गस्त घालण्याचे आदेश देऊन गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी टेकड्यांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, प्रखर प्रकाशझोत (फ्लड लाईट्स) बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केली. गृहमंत्र्यांनी लूटमारीच्या घटनांची गंभीर दखल घेतली. हक्काच्या टेकड्या फिरण्यासाठी असुरक्षित झाल्याने नियमित फिरायला जाणारे नागरिकही धास्तावले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टेकड्यांवर नियमित गस्त घालण्याचे आदेश दिले. प्रदूषण, वाहतूक कोंडी, तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात, गुन्हे अशा घटनांमुळे पुणेकर चिंतेत असताना त्यांना आता आश्वस्त करण्याची वेळ आली आहे… rahul.khaladkar@expressindia.com