प्रथमेश गोडबोले

सिंहगड रस्त्यावरील सनसिटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडून वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक, महिला सक्षमीकरण असे विविध उपक्रम राबवले जातात. त्यात लहान मुलांचा, तरुणांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचाही सक्रिय सहभाग असतो. राष्ट्रीय सणांसह सर्व उत्सव केवळ साजरे न करता त्यांचे औचित्य साधून विविध उपक्रमही सनसिटीमध्ये राबवण्यात येतात. रद्दी संकलन करून ती सामाजिक, शैक्षणिक संस्थांना देणे, खत प्रकल्पातून खतनिर्मिती, वृक्षारोपण या आणि अशा सोसायटीत होणाऱ्या विविध उपक्रमांची दखल घेऊन पुणे महापालिकेकडून विविध पुरस्कारांनी सनसिटीला गौरविण्यात आले आहे. ‘वाडासंस्कृती जपणारी सोसायटी’ अशी या सोसायटीची ओळख आहे.

Three and a half thousand seats reserved in 153 schools for RTE admission in Vasai news
वसईत आरटीई  प्रवेशासाठी १५३ शाळांत साडेतीन हजार जागा राखीव; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
ISKCON temple kharghar history
नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन… इस्कॉनचा इतिहास काय? ही संस्था कशी चालविली जाते?
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
305 winners of mhadas 2016 postal lottery finally received their houses
३०५ विजेत्यांची आठ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात, पत्राचाळ योजनेतील घरांना निवासी दाखला
1161 birds of 105 species recorded in Kalamba Lake in Kolhapur
कोल्हापुरातील कळंबा तलावात १०५ प्रजातींच्या ११६१ पक्ष्यांची नोंद

सनसिटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सिंहगड रस्त्यावरील ४२३ सदनिकांची सोसायटी आहे. वाडासंस्कृती जोपासणारी अशी ही सोसायटी आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट आणि प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. या दोन्ही दिवशी सोसायटीमध्ये झेंडावंदन केले जाते. तसेच सोसायटीमधील लहान मुले देशभक्तिपर गीतांवर नृत्य बसवतात आणि सादर करतात. या बरोबरच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांतही सोसायटीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो. गणेशोत्सव, नवरात्र महोत्सवात महिलांसाठी दांडियाचे आयोजन केले जाते. सामाजिक संदेश देणारी होळी साजरी केली जाते. गुढीपाडव्याला सोसायटीच्या आवारात आकर्षक रांगोळी काढून नववर्षांचे स्वागत केले जाते. महिलांकडून फोडली जाणारी दहीहंडी साजरी केली जाते. दिवाळीमध्ये सोसायटीचा मिळून एकच मोठा किल्ला तयार केला जातो. किल्ला तयार करण्यात सोसायटीचे सर्व आबालवृद्ध आणि दीडशेपेक्षा अधिक तरुण मंडळी सहभागी होतात. किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याआधी प्रत्यक्ष किल्ल्याला भेट देऊन त्याचे बारकावे सोसायटीचे सदस्य समजून घेतात आणि मगच किल्ला तयार केला जातो. त्याचा उद्घाटन समारंभही आयोजित केला जातो. या बरोबरच रामनवमी, कृष्ण जन्मोत्सवही साजरे केले जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय सहभाग असतो.

सोसायटीच्या सदस्यांनी सामाजिक भानही जपले आहे. दरवर्षी सोसायटीकडून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सोसायटीमधील बहुतांश सदस्य रक्तदाते म्हणून सहभागी होतात. तसेच सोसायटीतील सदस्यांकडून दर महिन्याला रद्दी संकलन करून आळंदी येथील विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेला देण्यात येते. या बरोबरच धान्यदान, ई-कचरा संकलन यामध्येही सोसायटीचा पुढाकार असतो. सोसायटीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येते. त्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात येतो. सोसायटीच्या सदस्यांकडून सामाजिक संदेश दिले जातात.

सिंहगड रस्त्यावरून सनसिटीकडे जाणाऱ्या आनंदनगर येथील चौकात नेहमीच वाहतूककोंडी होते. वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना मदत म्हणून वाहतूक नियमन करण्यासाठी सोसायटीचे सभासद वाहतूक नियंत्रणासाठी स्वत:हून जातात. सोसायटीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात येते. तसेच पाणी वाचवा मोहिमेंतर्गत जनजागृतीही केली जाते. या सर्व उपक्रमांची दखल घेऊन सोसायटीला पुणे महानगरपालिकेचे आदर्श सोसायटीचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक सलोखा, आदर्श गणेशोत्सव, जनजागृती यांचा समावेश आहे.

सोसायटीचा स्वत:चा कम्युनिटी हॉल असून अद्ययावत जलतरण तलाव आणि व्यायामशाळा आहे. तर मैदानी खेळांचे महत्त्व अबाधित राहण्यासाठी सोसायटीअंतर्गत लहान मुलांसाठी क्रीडाविषयक उपक्रम राबवण्यात येतात. सोसायटीमध्ये वीजबचतीसाठी एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. सोसायटीचा स्वत:चा खत प्रकल्प आहे. त्या माध्यमातून खत तयार केले जाते. या बरोबरच सामाजिक विषयांवर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येते.  सोसायटीतील शंभरपेक्षा अधिक तरुण-तरुणी सामाजिक कार्यात सहभागी असून, सोसायटीची समितीदेखील कार्यरत आहे. सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे आहेत. समीर रूपदे, अनुराधा कुंभार, सुधीर कुलकर्णी, सज्जन देशमुख, प्रकाश कोतमिरे, सुरेंद्र टिळेकर, गिरीश कुलकर्णी, शीतल साखरे, नितीन दरेकर हे सर्व सदस्य सोसायटीचा कारभार पाहतात. तर, चेतन कुलकर्णी, पीयूष चव्हाण, संदेश भट, रोहित कडू, रेणुका कारंडे, नीरजा सहस्रबुद्धे, नेहा भट, संकेत भागवत, तन्वी पराड, प्रिया कुलकर्णी, अथर्व ठाकूर हे सोसायटीतील सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करतात. शहराच्या विविध भागांतून, परगावहून आलेली कुटुंबे सोसायटीमध्ये गुण्यागोविंदाने वास्तव्य करत आहेत. त्यामुळे इथे प्रत्येकाच्या वेगवेगळय़ा कल्पना असतात. नवीन विचार-आचार यामुळे सोसायटीने राबवलेल्या विविध चांगल्या उपक्रमांसाठी सनसिटी सोसायटी ओळखली जाते. अनेक वर्षे एकाच सोसायटीत राहात असल्याने सर्व कुटुंबांचे परस्पर जिव्हाळय़ाचे संबंध निर्माण झाले असून, सर्व सभासद एका कुटुंबाप्रमाणे कार्यरत आहेत. त्याचा फायदा सोसायटीला नेहमीच एखादा उपक्रम, मोहीम राबवण्यासाठी होतो.

Story img Loader