चिन्मय पाटणकर

हिंदी भाषा पंधरवडय़ानिमित्त स्वतंत्र थिएटर्सतर्फे २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान हिंदी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात हिंदी कविता, साहित्यासह नाटय़कृतीही सादर केल्या जाणार आहेत.

पुण्यात मराठी नाटकाला मोठी परंपरा आहेच; मात्र गेल्या काही वर्षांत स्वतंत्र थिएटर्स या नाटय़संस्थेने हिंदी नाटकाची संस्कृती चांगल्या पद्धतीने रूजवली आहे. त्यामुळेच हिंदी साहित्यकृती, हिंदी नाटकांचे विविध प्रयोग पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होते. हिंदी भाषा पंधरवडय़ानिमित्ताने स्वतंत्र थिएटर्सतर्फे २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान हिंदी महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्यात कविता, नाटय़कृती पाहण्याची संधी हिंदीप्रेमींसह पुणेकरांना मिळणार आहे. दररोज सायंकाळी साडेसात वाजता घोले रस्ता येथील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे महोत्सव रंगणार आहे.

महोत्सवामध्ये चार कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. गुरुवारी (२७ सप्टेंबर) काव्य कलश या कविसंमेलनाने महोत्सवाचा पडदा उघडेल. आशिष शुक्ला, निरंजन पेडणेकर यांच्यासह आठ कवी संमेलनात हिंदी-उर्दू कवितांची पेशकश करणार आहेत. ज्येष्ठ हिंदी कवी वाय. के. सिंह या वेळी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी (२८ सप्टेंबरला) अ‍ॅन इव्हिनिंग विथ चेकॉव्ह ही नाटय़कृती सादर होणार आहे. त्यात स्वत चेकॉव्ह त्याच्या कथांचा जन्म कसा झाला हे सांगतानाच, सोबत ती कथा नाटय़रुपात रंगमंचावर उलगडणार आहे.

मुंबई आणि दिल्लीच्या नाटय़वर्तुळात गाजलेल्या ताज महल का टेंडर हे नाटक २९ सप्टेंबरला सादर केलं जाणार आहे. शाहजहानने आजच्या काळात ताज महाल बांधायचं ठरवलं असतं, तर त्याला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं असतं याचं चित्रण या नाटकात करण्यात आलं आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असा आशयविषय असलेल्या नाटकातून आजच्या परिस्थितीवर मार्मिक पद्धतीनं भाष्य करण्यात आलं आहे. अजय शुक्ला यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. तर मुझे अमृता चाहिये या नाटकानं महोत्सवाचा ३० सप्टेंबरला समारोप होईल. योगेश त्रिपाठी यांनी नाटकाचं लेखन केलं असून, या नाटकातील भूमिकेसाठी धनश्री हेबळीकरनं राज्य हिंदी नाटय़ स्पर्धेत पारितोषिक पटकावलं होतं.

‘यंदा महोत्सवाचं बारावे वर्ष आहे. गेल्या काही काळात पुण्यात हिंदी नाटकाचा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळेच पुणेकरांनी आजपर्यंत महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या वेळीही उत्तम प्रतिसाद नक्कीच मिळेल,’ असं स्वतंत्र थिएटर्सच्या धनश्री हेबळीकरनं सांगितलं.

तरुण रंगकर्मीच्या ‘झाब्रिको’चा आज प्रयोग

पुण्यातील काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘आज कल’ ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेची पहिली निर्मिती असलेल्या झाब्रिको या नाटकाचा पहिला प्रयोग गुरुवारी (२७ सप्टेंबर) रात्री नऊ वाजता मुकुंदनगर येथील सकळ ललित कलाघर येथे होणार आहे. या नाटकात आपल्या भवताली घटनांना, वातावरणाला कंटाळलेल्या तरुणाची गोष्ट मांडण्यात आली आहे. त्या वातावरणातून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या आयुष्यात काय घडतं याचं चित्रण या नाटकात करण्यात आलं आहे. नाटकाचं लेखन चिन्मय देवनं केलं असून, ऋषी मनोहरनं दिग्दर्शन केलं आहे. नाटकात तुषार टेंगळे, देवेंद्र शरणकर, रितेश तिवारी, नाथ पुरंदरे, चिन्मय देव, प्रतीक्षा भारती, श्रद्धा भाटवडेकर आदींच्या भूमिका आहेत. नाटकाला प्रवेशमूल्य आहे.

chinmay.reporter@gmail.com