श्रीराम ओक
‘जगणे’ हा शब्द छोटासा, पण महत्त्वाचा. जिवंत राहणे आणि जीवन जगणे या दोन्ही गोष्टी भिन्न पातळीवर जाणाऱ्या. ‘किती आले, किती गेले’ या शब्दांप्रमाणे अनेक जण येतात आणि जातात. या अनेक जणांपैकी काही जण कोणताही ध्यास न ठेवता कीर्तिवंत होतात. त्यांना जीवन जगण्याची कला अवगत असल्यामुळे हे घडते. काही जण मात्र छोटय़ाशा त्रासाने, नैराश्याच्या गर्तेत जातात. हे नैराश्य अनेकदा त्यांना आत्महत्येच्या विचारांपर्यंत देखील घेऊन जाते. मानवी देहाची दुर्लभता विसरून चुकीचे पाऊल उचलण्याच्या बेतात असणाऱ्यांच्या जीवनाला प्रकाशवाट दाखवणारे वीरेन रजपूत. त्यांचे कार्य जगण्याचा आनंद घेण्यासाठी जसे प्रेरित करते तसेच मानवी मनाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मार्गदर्शक देखील ठरते.
‘या जन्मावर, या जगण्यावर’ या मंगेश पाडगांवकर यांच्या भावगीताला यशवंत देव आणि अरुण दाते यांनी अजरामर केले. हे गीत गुणगुणताना देखील चैतन्याची लहर सळसळते. केवळ जीवन जगणे नाही, तर त्यावर प्रेम करणे आवश्यक असल्याचे नकळत सांगणारे हे गीत. या गीताप्रमाणेच आपल्या बाजूला अशा अनंत गोष्टी आहेत, ज्या आपले जीवन उल्हसित करतात. पण हे सगळे जाणवते ते सुखाचे क्षण आपल्याभोवती रुंजी घालत असतील तेव्हा. सुख आणि दु:ख या नाण्याच्या दोन बाजू. टॉस करताना जसा कधी छापा तर कधी काटा येतो, तसेच सुख आणि दु:ख ‘टर्न बाय टर्न’ येतच असते. पण याचा विचार न करता दु:खांना गोंजरत निराशेच्या गर्तेत जाणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही. अशावेळी या मंडळींना संवादसाठी कोणी मिळाले, त्यांच्या दु:खावर कोणी फुंकर घातली तर.. ही फुंकर घालण्याचेच कार्य करतात वीरेन चंदनसिंग रजपूत.
मानवी मनाचे विविध कंगोरे आहेत. या कंगोऱ्यांबरोबर प्रवास करताना अनेकांची तारांबळ उडते, विचार स्तंभित होतात. आजूबाजूच्या वातावरणातील पोषकता संपून गेलेली असते. अशा वेळी आवश्यकता असते ती संवादाची, प्रेमाच्या आणि आपुलकीच्या शब्दांची. त्या वेळी त्यांना ऐकून घेणारे असे कोणीतरी हवे असते. असे कार्य करणारी काही मंडळी असतात देखील, पण कळत-नकळत ती ऐकण्याचेही पैसे घेऊ लागतात. पण अशी ऐकण्याबाबत कोणतीही आर्थिक देवघेव न करता पारदर्शकतेने हे कार्य करणारी संस्था म्हणजे ‘कनेक्टिंग’.
दु:खी, चिंताग्रस्त, निराश, उदास, तणावग्रस्त व्यक्तींचे ऐकून घेण्याचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या या संस्थेची माहिती जनमानसात पोहोचविण्याचे आणि अशा मंडळींशी संवाद साधण्याचे महत्तम कार्य वीरेन दहा वर्षांहून अधिक काळ करीत आहेत. २००७ मध्ये एका प्रदर्शनात फेरफटका मारताना त्यांना ‘कनेक्टिंग’ आणि ‘प्राजित स्व मदत गट’ या दोन्ही संस्थांची माहिती देणारे स्टॉल्स शेजारी-शेजारी दिसले. आजोबा, वडिलांकडून सामाजिक कार्याचा वारसा घेतलेल्या वीरेन यांनाही समाजोपयोगी कार्य करण्याची इच्छा होतीच, पण योग्य कार्य सापडत नव्हते. सुयोग्य नियोजनामुळे वडिलोपार्जित व्यवसाय सुरू असल्यामुळे वीरेन यांच्या हाती खूप वेळ असायचा.
प्रदर्शनात जेव्हा मनाशी संबंधित काम करणाऱ्या या दोन्ही संस्थांच्या कामाची माहिती वीरेन यांनी घेतली, त्या वेळी त्यांना ते बारावीत असतानाचा एका प्रसंग आठवला. त्यांच्या नातेवाइकांपैकी एकाने आत्महत्या केली होती, ज्यामुळे वीरेन हळहळले होते. त्या वेळी जर कनेक्टिंग संस्था असती आणि आपल्याला ती माहिती असती, तर ही आत्महत्या आपण रोखू शकलो असतो असे त्यांना वाटले. अशा विविध भावभावांना वाट मोकळी करून देत त्यांनी आपला वेळ या संस्थांसाठी देण्याचा मनोमन निश्चय केला. पत्नी मीना यांनाही त्यांना आपला निर्धार बोलून दाखवला. त्यांनीही लगेचच वीरेन यांच्या कार्याला शुभेच्छा देत पाठिंबा दर्शविला. वीरेन यांनी लगोलग आपण या कार्यात सहभागी होण्यास इच्छुक असल्यास सांगत स्वत:ची माहिती या संस्थांकडे सुपूर्द केली आणि त्यायोगे आजोबा दत्तुसिंग परदेशी, वडील चंदनसिंग तसेच बंधू राजेंद्र यांच्याकडून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यास समर्थ झाले. प्राजित स्व मदत गटाचे संयोजक डॉ. उल्हास लुकतुके हे त्यांचे गुरू आणि मार्गदर्शक तर कनेक्टिंगच्या संस्थापक अर्नवाझ दमानिया या वीरेन यांच्यासाठी आदर्श तसेच प्रेरणास्थान आहेत.
ऐकण्यास कान मिळाला तर एक जीव वाचू शकतो हे लक्षात घेऊन आत्महत्या रोखण्यासाठी २००५ पासून कार्य करणारी कनेक्टिंग ही सामाजिक संस्था. त्यांच्या १८००-८४३-४३५३ या टोल फ्री क्रमांकाद्वारे गरजू मंडळी संस्थेबरोबर संवाद साधू शकतात. कनेक्टिंगच्या या कार्यात १३३ स्वयंसेवक आणि आठ मार्गदर्शक कार्यरत आहेत. कोणीतरी ऐकून घेते आहे, या भावनेतून बोलणाऱ्यांच्या दिवसभरात येणाऱ्या दूरध्वनींची संख्या डझनाच्या आसपास असते.आत्मघातकी विचारांपासून परावृत्त करण्याचे आणि त्यांना सकारात्मक जगण्याकडे वळवण्याचे मोलाचे कार्य कनेक्टिंग ही संस्था करते. शाळा-महाविद्यालयांबरोबर देखील या संस्थेचे कार्य चालते.
विरेन यांनी कनेक्टिंग तसेच प्राजितसाठी आठवडय़ातील काही दिवस आणि काही तास विभागून दिले आहेत. दोन मुले आणि एका मुलीबरोबरच पत्नीचा पाठिंबा तसेच सहकार्य असल्यामुळे निवृत्तीनंतर आता काय हा प्रश्न आपल्यापुढे नसल्याचे आवर्जून वीरेन सांगतात.
वीरेन यांच्यासारखे स्वयंसेवक होण्यासाठी, कनेक्टिंगसंबधी माहिती घेण्यासाठी, कनेक्टिंगची कार्यशाळा सोसायटी, कार्यालयात आयोजित करण्यासाठी त्यांच्याशी ९६३७५२६५३७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व लाभलेले वीरेन प्राजितच्या निमित्ताने दासबोध अभ्यासायला मिळाला, त्यातून आपली उन्नती झाल्याचे आवर्जून सांगतात.
दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य । याचा करुं नये नास ।
दास म्हणजे सावकास । विवेक पहावा ।।
समर्थानी सांगितलेल्या या ओवीचा आणि दासबोधाचे केवळ वाचनच नाही तर अभ्यास केला तर मनाशी संबंधित विविध आजारांना दूर ठेवता येईल, हा विश्वास वीरेन यांना मिळाला आहे. मातेच्या उदरात काही महिने, काही दिवस पोसला गेलेला जीव माता-पित्यांचे स्वप्न, आशा, आकांक्षा, त्यांनी घेतलेले कष्ट, सोसलेल्या यातना याशिवाय आपल्याच आयुष्यातील दु:खाबरोबरच सुखाचे, आनंदाचे क्षण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ अविचाराने हा देह नाहीसा करायचा हे करंटेपणाचे लक्षण आहे. जीवनाकडे गांभीर्याने बघत असतानाच आनंदी वृत्तीचा अंगीकार आवश्यक आहे, हेच अशा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जाणवत राहते.
shriram.oak@expressindia.com