एमबीएचे शिक्षण घेत असतानाच प्रशांत सोंडकर या तरुणाने कंपनीचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली. अवघ्या सहा वर्षांत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्ये आणि इजिप्त, युगांडा यांसारख्या देशांमध्येही त्यांची उत्पादने पोहोचली आहेत. शेतीविषयक उत्पादने विकत घेताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कंपनीकडून किसान डायल नावाचे कॉल सेंटरही सुरू करण्यात आले आहे.

जी. एम. बायोसाइड्स प्रा. लि. कंपनीची स्थापना २०११ मध्ये कात्रजमध्ये झाली. घरगुती कीटकनाशक (माश्या, उंदीर, ढेकूण, पाली), घरातून झुरळे व डास घालविण्याचे जेल, शेतीमधील सूक्ष्म कीटक व रोगजंतू नाशक, लॉन्समधील मुंग्या घालविणारे औषध, रोपांची वाढ होणारे, धान्य रक्षण करणारे, उंदीर पकडायचे रॅट ग्लू ट्रॅप अशी विविध उत्पादने कंपनीकडून उत्पादित केली जातात. याबरोबरच शेतीमध्ये उत्पादन घेतल्यानंतर पिकांवर विविध रोगजंतू, किडे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ते घालविण्यासाठीची उत्पादने देखील तयार केली जातात.

प्रशांत सोंडकर हे मूळचे भोर तालुक्यामधील नसरापूरचे. शिक्षणाच्या निमित्ताने २००८ मध्ये ते पुण्यात आले. शिक्षण घेत असतानाच चरितार्थ चालविण्यासाठी कॉम्प्युटर हार्डवेअरची कामे प्रशांत करायचे. ही कामे करत असतानाच विपणन शास्त्र व कला या विषयातून एमबीए करण्यासाठी त्यांनी पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश घेतला. एमबीएच्या पहिल्या वर्षांत असतानाच प्रशांत यांना त्यांचे काका विश्वास सोंडकर यांनी पेस्ट कन्ट्रोलच्या उत्पादनांबाबत माहिती दिली. विश्वास यांचा कीटकनाशक औषधांचा व्यवसाय आहे. तसेच जी. एम. बायोसाइड्स कंपनी विश्वास यांच्या नावावर नोंद असून त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि सहकार्याच्या जोरावर प्रशांत कंपनीचे कामकाज पाहतात. एमबीएची पदवी प्राप्त केल्यानंतर प्रशांत पूर्ण वेळ हाच व्यवसाय पाहतात.

सुरुवातीला औषध दुकाने, सुपर मार्केटमध्ये उत्पादने ठेवण्यास सुरुवात केली. ग्राहकांकडून उत्पादनांना चांगला प्रतिसाद येत गेला. त्यानंतर वितरक शोधून त्यांच्याकडे उत्पादने देण्यास सुरुवात केली. कंपनीच्या वितरकांची संख्या आता पन्नासपेक्षा जास्त आहे. २०१२-१३ मध्ये कंपनीची नोंदणी ऑनलाइन संकेतस्थळांवर करण्यात आली आहे. त्या माध्यमातून विविध राज्यांमधून उत्पादनांना मागणी सुरू झाली. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, मुंबई, महाड अशा विविध जिल्ह्य़ांसह आसाम, झारखंड, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमधील विविध शहरांमध्येही बायोसाइड्सची उत्पादने पोहोचली आहेत. तसेच इजिप्त आणि युगांडा यांसारख्या देशांत मध्यस्थ कंपनीच्या माध्यमातून उत्पादने पाठविण्यात येतात.

प्रशांत आणि त्यांचे काका विश्वास कंपनीचे काम पाहतात. विपणन, जमाखर्च विभाग, कारखाना, पेस्ट कन्ट्रोल सेवा पुरविण्यासाठी असे एकूण २२ कर्मचारी काम करतात. पेपर पॅम्प्लेट, फ्लेक्स यांच्या माध्यमातून कंपनीची जाहिरात केली जाते. मात्र, अशा जाहिरातींचे प्रमाण कमी आहे. एकूण नफ्याच्या दहा टक्के रक्कम जाहिरातींसाठी खर्च केली जाते. कंपनी चालवत असताना प्रशांत यांनी सामाजिक भानही जपले आहे. विश्वास यांच्या प्रेरणेने कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी किसान डायल म्हणून कॉल सेंटर सुरू केले आहे. विश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली कॉल सेंटरचे काम पाहण्यासाठी कंपनीचा एक चमु कार्यरत आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सजग केले जाते. अनेकदा शेतीविषयक उत्पादने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. पीक घेतलेल्या प्रमाणात कीटकनाशक फवारणी वापराबाबत मार्गदर्शन केले जाते. कॉल सेंटरसाठी नऊ लोकांची टीम नेमली आहे.

‘नवा व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीची परिस्थिती संघर्ष आणि हलाखीची होती. कंपनीची उत्पादने दुकानांमध्ये विक्रीला ठेवण्यासाठी स्वत: फिरले. बारा ते सोळा तासांपेक्षा जास्त काम करायचे. पेस्ट कन्ट्रोल व्यवसायातील प्रस्थापित लोकांकडून उत्पादनांबद्दल गैरसमज पसरवले जायचे. पहिले वर्ष-दीड वर्षे अशा पद्धतीने संघर्ष केल्यानंतर हळूहळू व्यवसाय स्थिर होत गेला. विपणन शास्त्र व कला या विषयातून एमबीए केले असल्याने त्याचा फायदा व्यवसायात झाला,’ असे प्रशांत सांगतात. विशेष म्हणजे बायोसाइड्सची सर्व उत्पादने वनौषधींशी संबंधित आहेत. पेस्ट कन्ट्रोलची सर्व उत्पादने विविध तेलांपासून बनविली जातात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक घटक वापरले जात नाहीत. कोणत्याही उत्पादनांची अ‍ॅलर्जी, साइड इफेक्ट्स माणसांना होत नाहीत. उत्पादने तेलापासून बनवत असल्याने त्यांना एक प्रकारचा वास असतो. हा वास घालविण्यासाठी विविध फुलांपासून तयार केलेले मिश्रण त्यामध्ये मिसळले जाते. जेणेकरून उत्पादने वापरताना उग्र वासाचा त्रास होऊ नये, असेही ते सांगतात.

आगामी काळात पेस्ट कन्ट्रोल व्यवसायाबरोबरच फार्मासिटीकल, पेस्टिसाइड्स, हाउस कीपिंग, सुरक्षारक्षक पुरविण्याच्या क्षेत्रात यायचे आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार कसा उत्पन्न होईल, याकडे आगामी काळात कटाक्ष असणार आहे. परदेशात निर्यातीचा प्रयत्न करण्यात येणार आहे. किमान पाचशे लोकांना रोजगार देणारी कंपनी बनविण्याचा प्रशांत यांचा मानस आहे.

prathamesh.godbole@expressindia.com

Story img Loader