प्रथमेश गोडबोले
सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात निर्मल टाउनशिप को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आहे. सोसायटीत वर्षभर सांस्कृतिक उपक्रम, सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. हे उपक्रम साजरे करताना सोसायटीने सामाजिक भानही जपले आहे. या उपक्रमात लहान मुले, तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही सक्रिय सहभाग असतो. सोसायटीमध्ये लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. सोसायटीच्या मध्यभागी असलेली मोठी बाग हे सोसायटीचे वैशिष्टय़ आहे. सोसायटीमधील सदस्यांशी कौटुंबिक नाते जपणारी सोसायटी अशी या सोसायटीची ओळख आहे.
सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात दहा इमारती आणि दोनशे तीस सदनिकांची निर्मल टाउनशिप को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आहे. एकोपा जोपासणारी आणि सोसायटीमधील प्रत्येक सदस्याचे एकमेकांशी कौटुंबिक नाते असणारी सोसायटी अशी या सोसायटीची ओळख आहे. सोसायटीमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. ९० मुले सोसायटीमध्ये आहेत. त्यामुळे साहजिकच लहान मुलांसाठी अधिक उपक्रम राबवले जातात. गणेशोत्सव, दहिहंडी, दिवाळी, कोजागरी पौर्णिमा असे पारंपरिक सण मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. मात्र, हे साजरे करत असतानाच त्यामध्ये सोसायटीने आपले वेगळेपण जपले आहे.
सोसायटीमध्ये कोजागरी पौर्णिमेला लागून येणाऱ्या शनिवारी दरवर्षी ‘फनफेअर’ हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमांतर्गत सोसायटीमधील सदस्यांना ज्या वस्तू, खाद्यपदार्थाची विक्री करायची आहे, ते नोंदणी करून आपले स्टॉल लावतात. या उपक्रमाच्या दिवशी सोसायटीच्या आवारातच एक छान मेळा भरवला जातो आणि सोसायटीमधील सदस्यांकडून त्या स्टॉलवर खरेदी केली जाते. पाणीपुरी, वडापाव, कचोरी, डोसा अशा खाद्यपदार्थाचे दहा-बारा स्टॉल असतात. उर्वरित स्टॉलमध्ये ड्रेस मटेरिअल, विविध वस्तू असे एकूण ३५ स्टॉल असतात. या उपक्रमात एक लाख रुपयांच्या वस्तूंची खरेदी होते. प्रत्येक जण दरवर्षी वेगळा स्टॉल लावण्याचा प्रयत्न करतो, यामधून कल्पकता वाढीला आपसुक चालना मिळते, प्रत्येक सभासदाचा त्यामध्ये सहभाग असतो. मसाला दुधाचे वाटप करून या उपक्रमाची सांगता केली जाते.
सोसायटीमध्ये पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. पाचही दिवस चित्रकला, मखर, पाककला, रांगोळी, फॅन्सी ड्रेस अशा विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. लहान मुलांसाठी दोन दिवस विविध गुणदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला जातो. हा कार्यक्रम स्पर्धा म्हणून ठेवला जात नाही, तर ज्यांना विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली कला सादर करायची आहे, असे सर्व वयोगटातील सदस्य त्यामध्ये भाग घेतात.
सोसायटीमध्ये गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करताना, ही मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची न आणता दरवर्षी शाडूची मूर्ती आणली जाते. गणेशोत्सवात ढोल ताशा पथकाला पाचारण केले जाते. परंतु, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रस्त्यावर ढोल ताशा पथकाचे सादरीकरण केले जात नाही. तर, सोसायटीच्या आवारातच पथकाचे स्थिरवादन केले जाते. चित्रकला स्पर्धेत सोसायटीमधील सर्व मुले सहभागी होतात. मखर स्पर्धेमध्ये घरोघरी जाऊन सभासदांच्या घरात विराजमान झालेल्या ‘श्रीं’साठी सजवण्यात आलेल्या मखराचे परीक्षण केले जाते. भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोसायटीमध्ये लहान मुलांचा एक कार्यक्रम गणेशोत्सवात आयोजित करण्यात आला होता. वय वर्षे पाच ते पंधरा या वयोगटातील सोसायटीमधील मुलांना एकत्र करून सव्वा तासांचा नृत्य कार्यक्रम केला होता. हा नृत्य कार्यक्रम असला, तरी त्यामध्ये धांगडधिंगा किंवा कर्णकर्कश गीतांवर नृत्य असा कार्यक्रम न करता जुनी परंतु, अर्थपूर्ण गीतांवर साधे नृत्य सादर करून हा कार्यक्रम सादर केला गेला. दिवाळीत सोसायटीमध्ये लहान मुलांकडून किल्ला बनवला जातो.
सोसायटीमध्ये दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. त्याकरिता मुख्यत्वे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पुढाकार असतो. सोसायटीने सामाजिक भानही जपले आहे. दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने स्वर्गीय राजा मंत्री रस्त्यावरील मातोश्री वृद्धाश्रमाला गेल्या वर्षी ३० खाटांचे वाटप करण्यात आले होते. त्याकरिता सोसायटीच्या सदस्यांकडून ऐच्छिक वर्गणी गोळा करण्यात आली होती. तसेच काही सदस्यांनी स्वत:च्या खर्चातून एखादी खाट घेऊन दिली होती. शहरातील विविध अनाथाश्रम आणि विविध सामाजिक संस्थांना उपयुक्त साहित्याचे वाटप, धान्य वाटपही सोसायटीकडून केले जाते. दरवर्षी गणेश जयंतीला गणेश याग केला जातो. नवरात्र उत्सवात महिलांचा दांडिया आयोजित केला जातो. महिलांना दांडिया शिकवण्यासाठी व्यावसायिक कोरिओग्राफरना प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले जाते. सोसायटीच्या आवारात मध्यभागी प्रशस्त बाग असून बागेच्या आवारातच गणेशाचे मंदिर आहे. बागेच्या आणि संपूर्ण सोसायटीच्या आवारात मोठय़ा प्रमाणात झाडे आहेत. सिंहगड रस्त्यावरील कोणत्याही सोसायटीला एवढी मोठी बाग आणि सोसायटीच्या आवारात एवढी झाडे नाहीत. हे सोसायटीचे वैशिष्टय़ आहे. लहान मुलांबरोबरच महिलांचेही उपक्रम सोसायटीमध्ये सातत्याने होतात. महिलांकडून सहलींचे आयोजनही केले जाते. एकूणातच उपक्रमशील सोसायटी असे या सोसायटीचे वर्णन करता येईल