कुटुंबव्यवस्था लहान होत जाण्याच्या काळातच कुटुंबात हक्काचे स्थान मिळवलेल्या पाळीव प्राण्यांमध्ये माणसाची गुंतवणूक वाढत गेली. घरातील मानव सदस्यांसाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार प्राण्यांच्या बाबतही होऊ लागला. प्राण्याच्या खाण्या-पिण्याच्या गरजा भागवण्यापासून ते एकत्र भटकंतीची मजा अनुभवण्याचा हा प्रवास बाजारपेठेने सुकर केला. प्राणी पालकांना नव्या गरजेची जाणीव होण्याचा अवकाश त्यावरचे उत्तर व्यावसायिकांकडे तयार असते. तातडीच्या प्रवासाच्या गरजांसाठी माणसांसाठी उपकारक ठरणारी ‘टॅक्सी सेवा’ आता प्राण्यांसाठीही सुरू झाली आहे. पशुवैद्यांकडे जायचे असो किंवा बाहेरगावी जायचे असो वातानुकूलित, आलिशान ‘पेटक्सी’ने प्राण्यांना घेऊन कसे जायचे हा प्रश्न पुणेकरांसाठी तरी सोडवला आहे.
तातडीच्या प्रसंगात बाहेरगावी प्रवास करण्याची वेळ आली किंवा अगदी भटकंतीची हौस भागवण्यासाठी प्राण्यांना प्रवासाला बरोबर कसे न्यायचे, हा प्राणी पालकांना नेहमीच सतावणारा प्रश्न. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी करावी लागणारी कागदपत्रांची पूर्तता, परवानगी यासाठी वेळ द्यावा लागतो. त्याचबरोबर शहरांतर्गत वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय बहुतेक वेळा गैरलागूच ठरतो. गर्दी, प्रवासातले धक्के, बाहेरची उष्णता यांमुळे प्राणी अनेकदा बिथरतात आणि हा प्रवास प्राणी, पालक आणि आजूबाजूची माणसे सगळ्यांसाठीच त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. त्यावर आता ‘पेटक्सी’ने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्याप्रमाणे ओला, उबर सारख्या ‘कॅब’ एका कॉलवर दारात उभ्या राहतात, त्याचप्रमाणे पेटक्सीची सेवाही मिळणार आहे. प्राण्यांना घेऊन प्रवास करण्याची मानसिक तयारी असणारे आणि प्राणी हाताळण्याचे प्रशिक्षण असणारे चालक हे या सेवेचे वैशिष्टय़. प्रवासात प्राण्याला धक्का बसू नये, प्राणी घाबरल्यामुळे किंवा उष्णतेमुळे काही वैद्यकीय अडचणी तयार झाल्यास प्राण्याला प्रथमोपचार देण्याचीही सुविधा या टॅक्सीमध्ये आहे.
‘पेटक्सी’ची संकल्पना
पुण्यातील प्रिया आणि आदित्य माखरिया या प्राणिप्रेमी जोडप्याचा प्रवासासाठी वाहने पुरवण्याचा व्यवसाय. त्यांनी अनाथ कुत्र्यांची बारा पिल्ले गेल्या वर्षी दत्तक घेतली. त्या वेळी त्यांना घरी आणेपर्यंत झालेल्या त्रासातून ‘पेटक्सी’ची कल्पना समोर आली. त्यामुळे दोन कार प्राण्यांच्या प्रवासासाठी राखून ही सेवा शहरात सुरू झाली. यासाठी कारमध्येही काही बदल करण्यात आले. कारच्या मागील भागाची रचना प्राण्यांना योग्य अशी करण्यात आली.
मागील सीट काढून टाकून तेथे धुता येतील अशा गाद्या टाकण्यात आल्या आहेत. प्रत्येक फेरीनंतर टॅक्सी स्वच्छ कशी ठेवायची, प्राण्यांची काळजी कशी घ्यायची याचे प्रशिक्षण चालकांना देण्यात आले. घरात पाळलेल्या प्राण्यांबरोबर मोकाट किंवा अनाथ प्राण्यांचे स्थलांतर करण्याचे कामही ‘पेटक्सी’ करते. तास, अंतर यांचा ताळमेळ घालून त्याचे पॅकेज निश्चित करण्यात आले आहे. ‘दत्तक घेतलेली कुत्र्याची पिले घरी आणताना आम्हाला त्रास झाला होता. त्यातून ही कल्पना सुचली. अनाथ प्राण्यांसाठी आम्ही स्वस्तात सेवा देतो. वेगवेगळी पॅकेजेस तयार करण्यात आली आहेत. शहरातील सर्व भागांत ही सुविधा आहेच, त्याबरोबरच बाहेरगावच्या प्रवासासाठीही टॅक्सी पुरवली जाते.
मात्र पाच ते सहा तासांपेक्षा अधिक कालावधीचा प्रवास टॅक्सीतून न करण्याचा सल्ला मी प्राणिपालकांना देत असतो. व्हॉट्स अॅप, फेसबुक पेज किंवा फोनच्या माध्यमातून टॅक्सीसाठी नोंदणी करता येऊ शकते. प्रथम येणाऱ्यासाठी प्राधान्य या तत्त्वावर टॅक्सी उपलब्ध करून देण्यात येते,’ असे आदित्य माखरिया यांनी सांगितले.
पुण्याप्रमाणेच देशात अशाप्रकारची सेवा मुंबई, बंगळुरू, दिल्ली येथेही सुरू आहेत. मुंबई येथेही प्राण्यांसाठी टॅक्सी सेवा आहेत. मुंबई येथील ‘फ्लरी फ्लायर्स’, बंगळुरु आणि दिल्ली येथील पेट व्हेकेशन्स, पेट कॅब या नावाने ही सेवा या शहरांमध्ये सुरू आहे.