पेटी म्हणजेच हार्मोनियम आणि अगदी शुद्ध मराठीमध्ये सांगायचे तर संवादिनी हे संगीत मैफलीतील महत्त्वाचे वाद्य. या संवादिनी वादनाला आपल्या अलौकिक प्रतिभेने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कलाकार म्हणजे पं. आप्पासाहेब जळगावकर. संवादिनी वादन सुसंवादी असणे म्हणजे काय याचे आप्पासाहेब हे मूर्तिमंत उदाहरण होते. एका अर्थाने पेटीला सोनेरी पंख देणारा गंधर्व’ असेच त्यांचे समर्पक वर्णन करता येईल आणि याच नावाने त्यांच्यावरील माहितीपूर्ण लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पं. आप्पासाहेब जळगावकर यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त शुक्रवारी (४ एप्रिल) या लघुपट रसिकांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

हार्मोनियम हे मुळातच भारतीय वाद्य नव्हे. तर परक्या देशातून ते इथे आले आणि हिंदुस्थानी संगीताने त्याला आपलेसे केले. स्वर कसे आहेत हे क्षणभर बाजूला ठेवले तर ते वाद्य भारतीय जनमानसात रुजले. एवढेच नव्हे तर कायमचे घर करुन बसले. या वाद्यावर प्रभुत्व मिळवणाऱ्या कलाकारांमध्ये आप्पासाहेब जळगावकर हे प्रमुख नांव. गायकाच्या स्वराशी लडिवाळपणे खेळत बरोबर जाण्यात आप्पांचा हातखंडा होता.

आप्पांच्या वादनातून निघणारे सूर हे जादूगाराच्या पेटीतून निघणार्‍या वस्तूंप्रमाणे आश्चर्यजनक पण आनंददायी, सुखावणारे आणि मन प्रसन्न करणारे असायचे. प्रत्यक्षात अत्यंत अवघड असलेले स्वरसमूह, सुरावटी आप्पांच्या जादुई बोटातून इतक्या सहजतेने निघत की संवादिनी वाजवण्यास फारच सोपे वाद्य आहे, असे ऐकणाऱ्या व्यक्तीला वाटायचे. प्रत्यक्ष तसे नाही हे आप्पांचे वादन ऐकल्यावर समजायचे. गायकाच्या सुराशी लीलया खेळत खेळत त्या सुरावटीचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या आप्पांचे वादन हे गाण्यावर मात करणारे कधीच वाटलं नाही किंवा गायकानेही आप्पांवर कुरघोडी करायचा कधीच प्रयत्न केला नाही.

हार्मोनियमचे स्वर, त्याची स्वरस्थाने ही भारतीय संगीताशी जुळणारी, जुळवून घेणारी नाहीत. आणि म्हणून अभिजात नाहीत. सामान्य भाषेत पेटीचे स्वर शुद्ध नाहीत. या कारणास्तव आकाशवाणी कार्यक्रमात संवादिनी वाद्यावर बंदी होती.

चार दशकांपूर्वी आप्पांच्या साठीचा सोहळा करण्याचे पं. जसराज यांनी ठरविले होते. त्यावेळी नभोवाणीमंत्री असलेल्या बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे आणि त्यानिमित्ताने त्या वेळचे आकाशवाणीचे संचालक केसकर यांनी हार्मोनियमवर घातलेली बंदी काढावी अशी विनंती करावी असं ठरलं. कार्यक्रमापूर्वी बॅ. गाडगीळ यांचे मंत्रीपद पंतप्रधानांनी  काढून घेतले होते. मंत्री नसतानाही गाडगीळ आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यानंतर हार्मोनियमवरची बंदी रद्द झाली, अशी आठवण संगीतप्रेमी राम कोल्हटकर यांनी सांगितली.

आप्पांच्या वादनशैलीने हार्मोनियमला एक नवे परिमाण प्राप्त झाले, नवे आयाम लाभले. त्यांच्या मनस्वी साधनेमुळे संवादिनीने केवळ साथीचे वाद्य नाही तर, स्वतंत्र वाद्य म्हणून आपले स्थान प्रस्थापित केले. त्यामध्ये आप्पांचा खूप मोलाचा सहभाग आहे. संगीत आणि वाद्य यांची अभेद्य एकता साधणारे आप्पा जळगावकर हे अभिजात भारतीय संगीतासाठी एक अमूल्य ठेवा ठेवून गेले. त्यांचे शिष्य हा समृद्ध वारसा पुढे घेऊन जात आहेत. अप्पांच्या जन्मशताब्दीनिमित्त भरत नाट्य मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आप्पांचे शिष्य उपेंद्र सहस्रबुद्धे यांचे संवादिनी वादन आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य व प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांचे गायन होणार आहे. ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर, व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये आणि राम कोल्हटकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.