चिन्मय पाटणकर

शाहीर अमर शेख यांच्या मातोश्री मुनेरबी यांच्या ओव्यांवर आधारित नाटय़प्रयोग मधुरा पानसे ही विद्यार्थिनी सादर करत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आधुनिक स्त्रीची ही कहाणी महत्त्वाची आहे.

दरवर्षी महिला दिन आला, की स्त्रीच्या शक्तीचे, महत्तेचे, आधुनिकतेचे गोडवे गायले जातात. बाकी वर्षभर आनंदच असतो.. पण स्त्रीची आधुनिकता, प्रागतिक विचार केवळ आजच्याच काळात झाले नाहीत. तर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या स्त्रियाही प्रागतिक होत्या. अगदी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासूनची परंपरा आहे. महाराष्ट्राचे शाहीर अमर शेख यांच्या मातोश्री मुनेरबी यादेखील अशाच प्रागतिक विचारांच्या होत्या. जात्यावर दळण दळताना त्यांनी रचलेल्या ओव्यांवर आधारित ‘मुनेरबी..’ ही एकपात्री नाटय़कृती महिला दिनाच्या औचित्याने गुरुवारी (७ मार्च) अनुभवायला मिळणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील अक्षरनंदन शाळेत सायंकाळी ४ वाजता हा नाटय़प्रयोग सादर होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील नाटय़शास्त्र अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी मधुरा पानसे ही नाटय़कृती सादर करणार आहे. सोलापूर जिल्ह्य़ातल्या बार्शी तालुक्यात मुनेरबींचा जन्म झाला. लग्नानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. नवऱ्याची गुलामगिरी झुगारून त्यांनी घटस्फोट दिला. स्वतंत्र आणि स्वाभिमानी आयुष्य जगण्याचा त्यांचा तो निर्णय त्या काळाचा विचार करता खूपच धाडसी होता. पुढे पोटासाठी जात्यावर दळण दळताना त्यांनी ओव्या रचल्या. या ओव्यांमधून त्यांनी स्वतचं अनुभवविश्वच मांडलं. लग्नव्यवस्था, जात-धर्म, रूढी, समाज या सगळ्यावर कोरडे ओढले. आईकडून मिळालेला आधुनिक विचारांचा, काव्याचा वारसा अमर शेख यांनी पुढे चालवला. मुनेरबी यांची ही कहाणी मधुरानं अध्र्या तासाच्या नाटय़प्रयोगातून मांडली आहे.

नाटकाच्या सादरीकरणासह लेखन आणि दिग्दर्शनही मधुरानंच केलं आहे. ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी त्यासाठी तिला मार्गदर्शन केलं आहे. हा प्रयोग करण्याविषयी मधुरा म्हणाली, ‘ललित कला केंद्रात आम्हाला अभ्यासक्रमाचा भाग म्हणून एक एकपात्री प्रयोग सादर करावा लागतो. मी मूळची बार्शीची असल्यानं शाहीर अमर शेख यांच्यावर, त्यांच्या साहित्यावर आधारित प्रयोग करावा असा विचार होता. मात्र, अमर शेख यांच्या एका पुस्तकात मुनेरबी यांच्याविषयीचा संदर्भ वाचल्यावर कुतूहल निर्माण झालं, त्यांच्या संघर्षांनं प्रेरित केलं. मुनेरबी यांचं साहित्य जमवण्यातही अनेक अडचणी होत्या.

पुण्यातल्या माधव पोतदार यांनी त्यासाठी मदत केली. त्यांच्याकडून मुनेरबींच्या काही ओव्या मिळाल्या. त्यावरून मी नाटक लिहून सादर केलं. काही काळानं मल्लिका अमर शेख यांना या प्रयोगाविषयी कळलं. त्यांनी स्वतहून संपर्क साधला, संहिता वाचली आणि कौतुक केलं. या प्रयोगातून एक वेगळी व्यक्तिरेखा, विचार मांडण्याचा प्रयत्न आहे.’

Story img Loader