डॉ. श्रुती पानसे
लहान असताना मूल संपूर्णपणे आपल्या पालकांवर अवलंबून असतं. पालक त्याची सर्वतोपरी काळजी घेतात. त्यांच्यात मायेचे बंध तयार होतात. छोटंसं मूल पालकांचा शब्दन्शब्द आज्ञाधारकपणे आणि अतिशय प्रेमाने मानतं. हे नसíगकच आहे. पालक आणि मूल या नात्यात प्रेम असतं. आस्था, जिव्हाळा, काळजी, कौतुक, रागावणं, रुसणं ही सर्व प्रेमाचीच रूपं व्यक्त होत असतात. या प्रेमाच्या अधिकारातून पालक मुलांना शिकवतात. कधी पालक, कधी शिक्षक असा प्रवास त्यांना अनेकदा करावा लागतो.
काही वर्षांतच मुलांच्या आयुष्यात दुसरे पालक येतात. ते म्हणजे शिक्षक. औपचारिक शिक्षणाची जबाबदारी ज्याच्यावर सोपवलेली आहे असे हे शिक्षक. बालवाडी-प्राथमिक शाळेपर्यंत मुलांचं आपल्या शिक्षकांवर खरंखुरं प्रेम असतं. शिक्षकाचंही आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम असतं. पण त्यात जबाबदारीचा भाग जास्त असतो. जबाबदारी पूर्ण करण्याचा भाग जास्त असतो. जे शिक्षक मुलांच्या भावना समजून घेतात, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात, ते शिक्षक विद्यार्थिप्रिय ठरतात.
प्रोत्साहनाचे शब्द
मुलांना प्रोत्साहन हवं असतं. अशा शिक्षकांचं मुलं ऐकतात. शिक्षा करणारे शिक्षक नको असतात. एका चौथीच्या वर्गातल्या शिक्षिकेनं सांगितलेलं एक उदाहरण. दर वर्षी वर्गात काही शांत आणि काही खोडकर मुलं असतात. तशी या वर्षांत त्यांच्या वर्गात एक अतिखोडकर मुलगा होता. शिक्षक त्याच्या खूप तक्रारी करायचे. तो दंगेखोर तर होताच, पण तो इतर मुलांशी मारामाऱ्या करायचा. मुलींना त्रास द्यायचा. त्याच्यामुळे वर्गात अशांतता पसरायची. त्याच्याबद्दल एकच चांगली गोष्ट सांगता येण्यासारखी होती, तो अभ्यासात चांगला होता.
एक दिवस त्यांनी त्याला बोलावलं. त्याला वाटलं, नेहमीप्रमाणे या आता ओरडणार. म्हणून तो एक प्रकारच्या बेदरकार नजरेने त्यांच्याकडे बघत होता. हे त्यांना जाणवलं. पण ते जाणवू न देता त्या म्हणाल्या, की हे बघ आत्ता जून महिना आहे. आपल्या शाळेत डिसेंबरमध्ये स्नेहसंमेलन असतं. तुझ्यावर मी महत्त्वाची जबाबदारी सोपवणार आहे. तुझी तयारी आहे ना? हे सगळं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. त्याला खरंतर धक्काच बसला होता. पण तो ‘हो’ म्हणाला आणि निघून गेला. मात्र त्यानंतर त्याने वर्गात उगाच दुसऱ्यांना त्रास देण्यासारख्या गोष्टी एकदाही केल्या नाहीत. त्याला एकदाही शिक्षा करावी लागली नाही. चौथीतल्या मुलांच्या मानसिकतेचा योग्य विचार शिक्षिकेने केला होता.
एका चित्रकलेच्या शिक्षकाने त्यांचा अनुभव सांगितला होता. ते जेव्हा शाळेत होते तेव्हाचा. एखाद्याला जर त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि त्याला ते पटलं तर त्याचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं, असं ते म्हणाले. कारण मुलांना स्वत:तले गुण माहीत असतीलच असं नाही. कधीकधी त्यांच्या पालकांनाही कळत नाही, पण शिक्षकांना मुलांमधले सुप्त गुण बरोबर जाणवतात. हे शिक्षक तेव्हा सहावीच्या वर्गात होते. आपण चांगली चित्रं काढू शकत नाही, आपला अभ्यास चांगला नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. सतत मार्क कमी मिळाल्यामुळे आत्मविश्वास कमी होता. एक दिवस सर त्याला म्हणाले, या वर्षी चित्रकलेच्या परीक्षेला बसायचंस तू! आणि तुझं हे चित्र आपण एका स्पध्रेला पाठवूया. बक्षीस मिळेल किंवा नाही मिळणार, पण या चित्रात तू जी रंगसंगती केली आहेस, ती मला फार आवडली.
त्याच्यासाठी एवढंच पुरेसं होतं. आपण कोणीतरी महत्त्वाचे आहोत. असं प्रत्येकाला वाटणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. हेच त्या शिक्षकांनी केलं. त्यांच्या त्या चित्राला बक्षीस मिळालं नाही, पण त्यांचा कल चित्रकलेकडे आहे हे समजलं आणि आयुष्याची दिशा मिळाल्यासारखं झालं, असं आज लक्षात येतंय, अशी त्यांची भावना होती.
एका शिक्षकांच्या कार्यशाळेत एक तरुण शिक्षक म्हणतात, की ‘मी माझ्या अभ्यासक्रमात शिकलो, तेच आणि तसंच वर्गात शिकवण्यापेक्षा माझ्या वर्गातल्या मुलामुलींना मी अधिक बोलतं करायला हवं. त्यांना खूप प्रश्न पडले पाहिजेत. मी त्यांना उत्तरं शोधायला प्रवृत्त केलं पाहिजे. मी त्यांना उत्तरं कशी शोधायची, हे सांगितलं पाहिजे. त्यासाठी मी स्वत:ला बदलायला हवं.’
‘यासाठी काय उपाय करायला हवेत?’ यावर एकांनी असं उत्तर दिलं, की ‘तंत्रज्ञानात जे बदल होताहेत ते मी स्वीकारले पाहिजेत. पूर्वीच्या फळय़ावर शिकवण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. ई-लर्निग असलं तरी त्याच्याही पलीकडचं मुलांना द्यायला पाहिजे.’
एक खूप चांगली गोष्ट आहे की सर्व नाही, पण अनेक शिक्षक-शिक्षिका नव्या दृष्टिकोनातून स्वत:च्या व्यवसायाकडे बघताहेत. विशेषत: तरुण शिक्षक या पेशाकडे निव्वळ नोकरी म्हणून न बघता, मी माझ्या वर्गातल्या, माझ्या शाळेतल्या मुलांना नवीन काय देऊ शकतो याचा विचार करताहेत. अनेक शिक्षक-शिक्षिका आपापल्या वर्गात प्रयोग करताहेत. प्रयोग म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीत सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध मार्गानी प्रयत्न करणं.
नव्या मुलांची नवी मानसिकता
वर्गात अनेक समस्या असतात. त्या शाळेप्रमाणे बदलतात. मुलांची ही पिढी आधीच्या पिढीपेक्षा कितीतरी वेगळी आहे. पूर्वी दर दहा वर्षांनी पिढी बदलायची. आता ती दर दोन वर्षांतच बदलू लागली आहे. मुलांच्या आसपासचा समाज बदलतो आहे. तंत्रज्ञान बदलतं आहे. तसं शिक्षकांनीही ‘स्मार्ट’ होण्याची गरज आहे. जे शिक्षक मोबाइलवर आलेल्या एखाद्या गोष्टीचा, विनोदाचा, थोरामोठय़ांच्या उद्गाराचा किंवा एखाद्या व्हिडिओ क्लीपचा वापर करतात, ते शिक्षक मुलांना जवळचे वाटतात. आजचे शिक्षक हे पूर्वीच्या पंतोजीसारखे नसतात. ते वेगळय़ा पद्धतीने मुलांकडे बघतात. हल्लीच्या स्मार्ट, डिजिटल पिढीत जन्मलेल्या आणि घरात एकेकटे वाढणाऱ्या ‘राजकुमार आणि राजकुमारीं’ना सांभाळणं ही गोष्ट आजच्या शिक्षकांसमोर एक आव्हान आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातले शिक्षक आपल्या मुलांनी शिक्षणात पुढे असावं यासाठी प्रयत्न करतात.
कालच्या शिक्षकांपेक्षा आजच्या शिक्षकांसमोर विविध प्रश्न वाढलेले आहेत. अनेक र्वष काम करणाऱ्या शिक्षकांशी बोलल्यावर त्यांना मुलांच्या मानसिकतेतला फरक प्रकर्षांने जाणवतो आहे. काही मुलांना एखादी संकल्पना अनेकदा समजावून सांगावी लागते. कोणात स्थिरतेचा अभाव असतो, तर कोणाची आíथक परिस्थिती नसते. कुपोषण, मुलं ज्या वस्तीत राहतात तिथं शिक्षणयोग्य वातावरण नसतं. अतिश्रीमंत घरातही मुलांना वाईट सवयी असतात. मुलांसमोर कोवळय़ा वयात घरात आणि बाहेर अतिशय वाईट प्रकार घडतात. अशा वेळेला शिक्षकाला हे सर्व लक्षात घेऊन अभ्यास घ्यावा लागतो. अशा अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रश्नांवर प्रयोग करत मात करणं म्हणजेच प्रयोगशील असणं.
बुद्धीला चालना
उत्साही शिक्षक मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे सर्व प्रयत्न करतात. विविध शाळांमध्ये-मराठी-इंग्रजी माध्यम, म.न.पा. शाळा, व्यक्तिगत पातळीवर, छोटय़ा संस्थेच्या माध्यमातून अनेक शिक्षक, कार्यकत्रे प्रयोग करतात. मार्ग काढतात. थोडक्यात, मुलांचं शिक्षण आत्ता आहे त्यापेक्षा अधिक चांगलं कसं होईल, याचा विचार ज्या संबंधित शिक्षक आणि व्यवस्थापकांच्या मनात सतत चालू असतो तिथेच प्रयोग घडतात. ते कृतीत आणले जातात. शाळेतल्या अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत काळानुसार बदल व्हायला हवेत. आधुनिक पद्धतीने शाळा बांधली, शाळेत कार्टून्स रंगवले, शाळेत संगणक आणले की शाळा आधुनिक नाही होत. ती चांगल्या अर्थाने आधुनिक होते ते उत्साही आणि प्रेमळ शिक्षकांमुळे! शिक्षकांची पदवी हा एक भाग आहे आणि ती पदवी ते वर्गात कशी आचरणात आणतात, हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागाशी मुलांचा काहीच संबंध नसतो. मुलांच्या उपजत गुणांना शोधून वाव देणारी, त्यांच्यातल्या वैयक्तिकतेला समजावून घेणारी, त्यांचा कल बघून शिक्षणात गोडी निर्माण करणारी, मुलांच्या अडचणींचा विचार करणारी शाळा आणि शिक्षक हे खरे आधुनिक. प्रयोगशील. मुलांना एका पठडीत न कोंबता, त्यांना सर्व बाजूंनी विचार करायला लावणं हे खरं शिक्षण. तसं घडवण्यासाठी शिक्षक आणि व्यवस्थापनानं प्रयोगशील असायला हवं. कारण सतत प्रयोगशील राहणं म्हणजेच आपल्या कामाविषयी जास्तीतजास्त योग्य अशा निष्कर्षांच्या शोधात असणं. मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या सकारात्मक बाजूला प्रोत्साहन देणं, असा प्रयत्न शाळांनी आणि शिक्षकांनी करायला हवा. शाळांचे रोजचे तास, सहली, प्रकल्प, स्नेहसंमेलनं अशा सगळय़ाच गोष्टी यासाठी वापरायला हव्यात. बुद्धीला चालना मिळाली नाही तर वस्तू, व्यवस्था आणि विचारशक्ती स्थिर होऊन तिथंच राहते आणि मुलांना ‘वाढतं’ करणं हे एक सर्जनशील काम आहे. मुलंसुद्धा अत्यंत आशेनं शिक्षकांकडे बघत असतात. आईबाबा आणि शिक्षक हेच त्यांचं जग असतं. लहान मुलांना तर आईबाबांपेक्षाही शिक्षक आवडीचे असतात. ते जे काही म्हणतील ते ऐकण्याकडे त्यांचा कल असतो.
शिक्षक आणि मुलांचं नातं
मुलांचं भविष्य ठरवण्यात शिक्षकांची भूमिका मोठी आहे. मुलांचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही त्यांच्याच हातात आहे. अशा परिस्थितीत मुलांना काय शिकवायचं आणि कसं शिकवायचं याचे निर्णय गांभीर्याने घ्यायला हवेत! शिक्षणातलं मेंदूशास्त्रही आता तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे आपल्या लक्षात येतं आहे. शिक्षक वर्गात जे काही शिकवतात, तो प्रत्येक अनुभव हा शिकण्याचा अनुभव (लर्निग एक्स्पीरिएन्स) असतो. या प्रत्येक अनुभवामुळे मेंदूतल्या न्यूरॉन्सची जुळणी होत असते. मूल बालवाडीत गाणं म्हणायला शिकतं, तिसरी-चौथीतलं मूल गणिताच्या नव्या संकल्पना शिकतं, सातवी-आठवीतल्या मुलांकडे स्नेहसंमेलनात निवेदन करायची जबाबदारी येते आणि दहावीतली मुलं मान मोडून अभ्यास करतात, त्या सर्व वेळेला न्यूरॉन्सची जुळणी होत असते. प्रत्येक नव्या अनुभवाच्या वेळी आपल्या मेंदूत असे सिनॅप्स तयार होत असतात. अशा वेळी एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला विद्युत-रासायनिक संदेश देत असतो. हे काम अतिशय वेगात होतं. मेंदूत अशा न्यूरॉन्सची संख्या अब्जावधींच्या घरात असते. आपण जसजशी एकेक गोष्ट शिकत जातो, तसतसं मेंदूत सिनॅप्स तयार होतात. शिकणं म्हणजेच शास्त्रीय भाषेत सिनॅप्स तयार होणं. हे मेंदूशास्त्र शिक्षक लक्षात घेतील जेव्हा त्यांच्या कामाचं महत्त्व त्यांनाच पटेल. आपल्याकडे उत्साही आणि प्रयोगशील शिक्षकांची फार मोठी परंपरा आहे. जे. पी. नाईक- चित्रा नाईक यांनी अनौपचारिक शिक्षणपद्धतीबद्दल केलेले प्रयोग आणि लेखन हे बघायला हवं. ताराबाई मोडक-अनुताई वाघ यांनी केलेले प्रयोग, लीलाताई पाटील यांनी विकसित केलेली शिक्षणपद्धत यांची माहिती घेतली तरी मुलांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना शिकवायचं कसं, याची माहिती मिळते. खुद्द महाराष्ट्रात असे अनेक आपल्या मातीतले प्रयोग झाले आहेत, होत आहेत, ज्यातून ‘मुलांना शिकवायचं कसं?’ याचं उत्तर मिळू शकतं.