बंगल्याच्या आवारात शिरताच समोर कावेने रंगवलेले मोठे देखणे वृंदावन. त्या भोवती फुलझाडांच्या कुंडय़ा, दरवाजासमोरच्या पडदीस लटकवलेली सावली, आवडणारी हिरवी झुंबरे, डाव्या बाजूला फरशांची पायवाट अन् त्याच्या दोन्ही बाजूला फुलांचे ताटवे. अनुजा आपटेच्या परसबागेचे असे आखीव रेखीव नियोजन परसबागेची आवड फार पूर्वीची. घरात जुनी आंबा, चिकूची झाडेही आहेत. चार वर्षांपूर्वी माझी बाग पाहिली अन् हिला ‘कंपोस्ट किडा’ चावला. बंगल्याच्या मागे असलेला कंपोस्टचा हौद पुन्हा सजीव झाला. मी मोठय़ा प्रणामात पालापाचोळा गोळा करते, त्याची माती वापरते. या मातीच्या कार्बन नायट्रोजन रेशो योग्य राहण्यासाठी भाजीवाल्याकडून वाया गेलेली भाजी आणते, हे अनुजाने पाहिले. लगेच भाजीवाल्याकडून कोबी पाला आणून खड्डय़ात घातला. दोन दिवसांनी फोन आला ‘अगं वास येतोय’. विचारलं, ‘किती कोबी पाला आणलास?’ ‘चार पोती भरून आणला’. ‘कोबी पाल्यात खूप ओलं असते तो पटकन् सडायला लागतो. आता त्यात तीन पट कोरडा पाला मिसळ’ असे मी सांगितले. बाई बहाद्दर तिने पाला गोळा करून घातला व पाला व वाया गेलेली भाजी यापासून एकवीस पोती हिरवी माती तयार केली. त्यावर हिची बाग बहरत आहे. घरच्या घरी माती बनवण्याचे तंत्र गवसले आहे. जैविक कचऱ्यावर झाडे बहरतात हे पक्क ठाऊक आहे. गेल्या वर्षी दर्शनी भागात झेंडूची रोपं लावली होती. तो तरारलेला, फुलांच्या वजनाने लवलेला झेंडू पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटत होतं. या वेळी त्या जागी बालसम फुलला आहे. जास्वंदीचे खूप रंग जमवले आहेत. एका कोपऱ्यात निळी, गुलाबी वॉटर लिली सदा फुललेली असते. त्यात गुलाबी कमळाची भर पडली आहे. जुने टायर रंगवून त्यात फुलझाडे लावली आहेत. कुंपणावर कृष्णकमळ सुगंधी फुलांचे वेल आहेत. भाजीपाला फारसा नाही. घरची कमळे, कवठी चाफ्याचे हार करायचे. दारात फुलांच्या रांगोळ्या घालायच्या याची हिला फार हौस. बँकेतली नोकरी करून हे करायचे तसे अवघड पण सुट्टीच्या दिवशी झाडांवर हात फिरवायला, बहरलेली बाग पाहून मिळालेला आनंद इतरांना वाटायला हिला आवडतं.
हिरवा कोपरा : हिरव्या मातीचे मैत्र
फुलांच्या वजनाने लवलेला झेंडू पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटत होतं.
Written by प्रिया भिडे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-11-2017 at 02:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on tree plantation in home garden