श्रीराम ओक

आपण सर्वच जण कोणते ना कोणते कर्म (काम) करतच असतो. प्रत्येक जण त्याच्या-त्याच्या कौशल्यांनुसार किंवा त्यांचा विकास करीत विविध प्रकारची कर्म करतो, अर्थातच ती स्वउन्नतीसाठी असतात. पण स्वविकास, स्वउन्नतीच्याही पलिकडे जाऊन सामाजिक जाणिवा विकसित करण्याचा विचार उराशी बाळगत सुरू झालेली एक चळवळ म्हणजे ‘देणे समाजाचे’. चळवळीने  समाजोन्नतीच्या प्रवासालाही सुरुवात झाली. यासाठी तन-मन-धनाने सेवाकार्य करणाऱ्याबरोबरच वीणा गोखले यांनी स्वत:चे दु:ख, वेदनांना कवटाळून न बसता, त्यातून बाहेर पडत गरुडझेप घेतली.

online rummy, High Court, State Govt,
ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
dene samajache, Artistry organization, Artistry,
देणे समाजाचे
Atishi Singh Corruption Mass movement politician Assembly Elections
आतिशी सिंग स्वतःचा ठसा उमटवतील की वरिष्ठांच्या चौकटीत राहतील?
sharad pawar wrote letter to cm eknath shinde
Sharad Pawar : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; भेटीची वेळ मागत म्हणाले…
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!

‘भूतकाळात घडलेल्या घटनांमधून शिकत, भविष्याचा वेध घेत, वर्तमानात जगण्याची कला साध्य करावी’ हे वाक्य बोलायला सोपे, पण आचरणात आणण्यास मात्र काहीसे अवघड. विविध मानवी प्रवृत्ती, भावभावना यांचे संतुलन राखत येणाऱ्या परिस्थितीबरोबर जुळवून घेत किंवा तिच्याशी दोन हात करीत उज्ज्वल भविष्याची कास धरण्यासाठी सर्व जण धडपडत असतात. या धडपडीत स्वउन्नतीला महत्त्वाचे स्थान असते आणि ते असावे देखील. जर अशी स्वउन्नती झाली, तरच समाजोन्नती साध्य करता येऊ शकते. यामध्ये देखील अनेक अडचणी येतात, त्या दूर करता-करता, वेदनांवर फुंकर घालता-घालता समाजोन्नतीचाही मार्ग दिसू शकतो आणि हेच वीणा आणि दिलीप गोखले या दांम्पत्यांच्याही बाबतीत झाले.

सामाजिक आणि व्यावसायिक या दोन्हीही क्षेत्रात वीणा यांनी आपल्या कार्यातून वेगळेपण जपले आहे. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना जुळ्या मुली झाल्या, त्यानंतर वीणा यांचे आयुष्य बदलले. पुरवी आणि सावनी यांच्या जन्मानंतर आठच दिवसांत पुरवीला मॅनेनजायटिसचा अ‍ॅटॅक आला आणि ती मतिमंदत्व घेऊनच वाढू लागली. ती आहे तोपर्यंत योग्यप्रकारे कसे वाढवता येईल यातून पुरवीच्या आईबाबांचा विविध पातळ्यांवरचा कष्टदायी तसेच वेदनादायी प्रवास सुरू झाला. या वेदनेमुळे या दांम्पत्याची सामाजिक क्षेत्रातील वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली. पुरवीसारख्या शारीरिक, मानसिकदृष्टय़ा अपंग मुलीला वाढवत असतानाच, सावनीसारख्या अत्यंत हुशार मुलीचे आयुष्य उत्तमप्रकारे घडावे यासाठी प्रयत्न करायचे. हे सगळे संतुलन राखताना काही मार्गदर्शन मिळावे म्हणून गोखले दांम्पत्याने विविध संस्थांना भेटी दिल्या. त्या वेळी असे जाणवले, की यापैकी कितीतरी संस्था समाजापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. विविध सामाजिक संस्थांच्या कार्याची आपल्यापैकी अनेकांना जाणीवच नाही. यातूनच या संस्थांचे कार्य समाजापर्यंत कसे पोहोचवायचे हा विचार या दांम्पत्याच्या मनात घोळू लागला. एक दिवस एका प्रदर्शनाला भेट देण्याच्या निमित्ताने गेलेल्या दिलीप यांच्या मनात सामाजिक संस्थांच्या कार्याचे अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करता येईल का? ही कल्पना मनात आली आणि त्यांनी तातडीने ती वीणा यांना बोलून दाखवली. दिलीप यांची कल्पना वीणा यांना वेगळी वाटली आणि ती प्रत्यक्षात येण्यासाठी काय करायचे, यावर बराच विचारविनिमय झाला आणि ‘देणे समाजाचे’ या नावाने २००५ साली पहिले सामाजिक संस्थांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री नसलेले संस्थांचे कार्यप्रदर्शन असे याचे स्वरूप होते. या प्रदर्शनासाठी होणारा खर्च कोथरूडमधील ‘सागर’ अपार्टमेंटमधील रहिवाशांनी आर्थिक साहाय्य करीत आणि उर्वरित पैसे गोखले दांम्पत्याने आपल्या खिशातून घालत एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाला प्रारंभ झाला. या उपक्रमाद्वारे मागील चौदा वर्षांत दीडशेहून अधिक संस्था समाजापुढे आल्या असून कित्येक कोटी रुपयांबरोबरच या संस्थांना मदत करणारे श्रमदान करणारे देखील पुढे आले आहेत. या उपक्रमाने आजपर्यंत अनेक खडतर वाटांवरून प्रवास केला आहे. हा प्रवास, हा उपक्रम कोठेही न डगमगता सुरू आहे, त्यामागे आहे वीणा यांचे धैर्य, चिकाटी याशिवाय पतीने दाखवून दिलेल्या वाटेवरून अढळपणे चालण्याची पतिनिष्ठा. हा प्रवास सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच वर्षी म्हणजे २००८ साली ‘देणे समाजाचे’ प्रदर्शन सुरू होण्यास केवळ पंधरा दिवसांचा कालावधी उरलेला असताना दिलीप गोखले यांचे झोपेतच निधन झाले. पण या वेदनादायी घटनेतून बाहेर पडून त्यांनी प्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या वेळी कुटुंबातील सदस्यांनी मोलाची साथ दिली. पती निधनाची तीव्रता तर कमी होईलच आणि पतीनेच घालून दिलेला सेवाकार्याचा पायंडा खंडित होऊ नये म्हणून वीणा पुन्हा खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या या कार्यात पतीनेच दाखवून दिलेली ‘गिरीसागर टूर्स’ ही व्यवसायाची वाट, जी आज वीणा यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याबरोबरच सेवाकार्याच्या वाटेवर चालण्याचे धैर्य देत आहे. ज्या मुलीच्या निमित्ताने सामाजिक संस्थांची आणि वीणा यांची नाळ जोडली गेली होती, त्या पुरवीनेही २०१० साली अखेरचा श्वास घेतला. त्या वेळी देखील तेवढय़ाच धैर्याने घेत पतिनिधनानंतरची पहिलीच सहल वीणा यांनी यशस्वी केली. त्यानंतरही त्यांनी आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक कार्याकडे मागे वळून कधी पाहिलेच नाही. वीणा गोखले यांच्या कार्याला दाद द्यायची असेल, विविध सामाजिक प्रश्न समजून घ्यायचे असतील तर ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हर्षल हॉल, कर्वे रोड, पुणे येथे आयोजित प्रदर्शन तुमच्या-आमच्यासाठी नव्या जाणिवा देणारे ठरू शकेल. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन पाहण्याबरोबरच वीणा यांच्या कार्यात सहभागी होण्याची ही संधी उपलब्ध होत आहे.