पाण्यासाठी तहानलेल्यांना मदत करणे हे माणुसकीचे काम आहे, याबद्दल सभ्य पुणेकरांच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. सगळे मोजूनमापून करणाऱ्या पुणेकरांनी कोणास मदत करून पुण्य मिळवले, तर त्यामुळे कोणास पोटदुखी होण्याचेही कारण नाही. दौंड गावास पाणी देण्यासाठी पुणेकरांनी आणखी थोडी तोशीस सहन करावी, एवढेच तर पालकमंत्री गिरीश बापट यांचे म्हणणे आहे. त्यास आक्षेप घेणारे सारे पुणेकर कोत्या मनाचे आहेत. दौंड, इंदापूर आणि बारामती या गावांना पुण्याजवळ असलेल्या धरणांमधून पाणी दिले जाते. सध्या दौंड गावी पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून, पुणे शहराने पाणीकपात करून वाचवलेले पाणी तेथे द्यावे, असा पवित्र विचार बापट यांनी केला, तर त्याबद्दल एवढा कांगावा तरी कशासाठी?
दौंडला १५ मे पर्यंत पुरेल, एवढे पाणी यापूर्वीच दिले होते. दौंडकरांचे म्हणणे असे, की ते पाणी तेथे पोहोचण्यापूर्वीच कोठेतरी मुरले. कोठे मुरले, याची माहिती तेथील फारच थोडय़ांना आहे. ती जाहीरपणे सांगण्याएवढी धिटाई तेथील कोणाकडेही नाही. पिण्यास पाणी नसलेल्या दौंडजवळील शेते मात्र हिरवीगार कशी, असा प्रश्न त्यामुळे कुणी विचारता कामा नये. उसाच्या शिवारात पाण्याचे शिरणे ही चुकूनमाकून झालेली घटना असेल, तर त्याचा एवढा बाऊ करण्याचे कारण नाही. ऊस नाही तर तेथील साखर कारखाने कसे चालणार? कारखाने बंद पडले, तर तेथील शेतकऱ्यांचे कसे होणार? कामगारांचे कसे होणार? अशा गहन प्रश्नांना पुणेकरांजवळ उत्तरे नाहीत.
पुणे शहराला पाणी पुरवण्यासाठी तीन धरणे आहेत. पानशेत, वरसगाव आणि टेमघर. या तीन धरणांतील पाणी यंदाच्या दुष्काळात आटले आहे. ते आटणार याची कल्पना असतानाही, पालकमंत्र्यांनी पुणे शहरात पाणीकपात करण्यास विनाकारण विलंब लावला. त्या विलंबामुळे पुणेकरांची मात्र नाहक बदनामी झाली. पुणेकर पाण्याची नासाडी करतात, या अजितदादा पवार यांच्या आरोपाला त्यामुळे बळकटीच मिळाली. ही कपात आधीपासूनच लागू केली असती, तर अधिक पाणी वाचले असते आणि आत्ता दौंडला ते देता आले असते. एवढी दूरदृष्टी असती तर सगळेच प्रश्न सुटले असते. सध्या धरणांमध्ये असलेले पाणी कसेबसे जुलैअखेरीपर्यंत पुरेल एवढेच आहे. यंदा पाऊस उत्तम पडेल, असे गृहीत धरून केलेले हे नियोजन किती चुकीचे होते, हे आतातरी कळून आले आहे.
पुण्यात पाणीकपात करून वाचवलेल्या पाण्यात गल्लीबोळ सिमेंटचे करण्यात दंग असलेल्या पालिका प्रशासनाला जाब विचारण्यास पालकमंत्र्यांनी कुचराई का केली? हा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे, तसाच दौंडकरांना दिलेल्या पाण्याचे काय झाले, हे विचारण्याची हिंमत त्यांनी का दाखवली नाही? हाही प्रश्न गंभीर आहे. दौंडला पाणी देण्यास सभ्य पुणेकरांचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र मिळालेले पाणी भलतीकडेच वापरून पाणी संपले, अशी ओरड होत असेल, तर त्याची शहानिशा न करता पाणी देण्याची घाई कशासाठी? गिरीश बापट जिल्हय़ाचे पालकमंत्री असल्याने त्यांना जिल्हय़ाचे हित पाहावे लागते, हे खरे. पण या जिल्हय़ातच पुणे हेही शहर आहे, याचा त्यांना विसर पडला काय? आता दौंडला एक टीएमसी पाणी देण्यात येईल. ते किती काळासाठी पुरेल, याची माहिती आताच जाहीर व्हायला हवी. हे पाणी दिल्याने येत्या महिन्याभरात पुण्यास आणखी पाणी कपात लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्या वेळी सभ्य पुणेकरांच्या समस्या सोडवण्यास बापट यांच्याकडे काही नियोजन आहे काय?
ऑगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी साठवण्याची गरज असताना, पाटबंधारे खाते राजकीय दबावास बळी पडून कालव्यांची आवर्तने सोडत राहतात. त्यात उसाचे भले होते, पण त्या उसाला कोल्हा लागल्यानंतर होणारी अवस्था जेव्हा मे महिन्यातच येते, तेव्हा तोंडचे पाणी पळाल्याशिवाय राहात नाही. तरीही दौंड गावास पाणी हे द्यायलाच हवे. फक्त ते देण्यापूर्वी काही प्रश्नांची उत्तरे पालकमंत्र्यांनी आडपडदा न ठेवता जाहीरपणे देण्याची आवश्यकता आहे.

१) दौंडला यापूर्वी दिलेल्या पाण्याचा हिशोब आहे का?
२) दौंडला कालव्यानेच पाणी पुरवण्याचा हट्ट कशासाठी?
३) पुण्याच्या पाण्याचे नियोजन का फसले?
४) पाण्याची मागणी राजकीय आहे की सामाजिक?
५) पुण्याचे पाणी पळवून ते पिण्यासाठीच वापरले जाईल का?

 

मुकुंद संगोराम
mukund.sangoram@expressindia.com

Story img Loader