महिलांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य आत्मसात केले, तर तंत्रज्ञान क्षेत्रातही प्रगती करता येईल आणि पारंपरिक व्यवसायही विस्तारता येऊ शकेल. येत्या शनिवारी साजऱ्या होत असलेल्या महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला सक्षमीकरण या विषयावर ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी तुषार सूर्यवंशी यांच्याशी साधलेला संवाद…

कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. अनेक नव्या संधी आणि आव्हाने त्यातून समोर येत आहेत. अशा काळात महिलांसाठी कोणत्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत?

प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर विस्तारतो आहे. ते केवळ उद्योगांपुरते मर्यादित राहिलेले नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठाही विस्तारल्या आहेत. व्यवसाय विस्तारण्यासाठी लागणारी साधने पूर्वी मर्यादित होती. आता पापड-लोणची बनवणाऱ्या खेडेगावातील महिलेलाही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने अमेरिकेतले गिऱ्हाईक मिळवता येऊ शकते. आज खाद्यपदार्थांचा व्यवसाय असो, की शिक्षण प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवतात. महिलांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य आत्मसात केले, तर तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करता येईलच, पण पारंपरिक व्यवसायही विस्तारणे शक्य आहे. ‘एआय’मुळे मोठ्या प्रमाणातील माहितीचे लगेच विश्लेषण करता येते. मानवी निरीक्षणांतून काही गोष्टी सुटू शकतात. अशा वेळी ‘एआय’ने दिलेल्या माहितीमुळे लवकर निर्णय घेता येतात. उदाहरणच द्यायचे, तर माध्यमांत काम करताना कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आवश्यक माहिती लगेच मिळू शकते. रोज नव्याने मिळणाऱ्या या माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारेच प्रभावी विश्लेषणही करता येते. त्यामुळे अक्षरश: रोज नव्या संधी, नव्या नोकऱ्या निर्माण होत आहेत. महिलांनी जर कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य आत्मसात केले, तर त्यांना नोकरी किंवा व्यवसाय करताना येणाऱ्या सर्व मर्यादा ओलांडता येतील.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर महिला सक्षमीकरणासाठी कशा पद्धतीने करायला हवा?

महिला सक्षमीकरणाबाबत केवळ बोलले जाते. मात्र, महिलांना सक्षम व्हायचे असेल, तर कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे कौशल्य त्यांच्याकडे असायलाच हवे. राज्याच्या कौशल्य विद्यापीठात त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मायक्रोसॉफ्टसारख्या नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून एआय वापराचे प्रशिक्षण महिलांना दिले जात आहे. एकूण लोकसंख्येच्या ४९ टक्के महिला आहेत. त्यातील केवळ आठ ते दहा टक्के महिला औपचारिक क्षेत्रांत काम करतात. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या अजूनही फार कमी दिसते. अनेकदा महिलांना घरातून काम करावे लागते. त्यासाठी आरोग्याच्या अडचणीही कारणीभूत असतात. वयाच्या एका टप्प्यानंतर घरातून काम करणे भागही पडू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका अशा वेळी महत्त्वाची ठरते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने महिलांना घरातूनही चांगल्या दर्जाचे काम करता येणे शक्य आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या कुणावरही विसंबून राहावे लागत नाही. महिलांचा विकास साधायचा असेल, तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हव्यात आणि आर्थिक विकासाचा पाया शिक्षण आणि तंत्रज्ञान आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सगळ्यात मोठे पाऊल आहे. त्यामुळे शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच कृत्रिम बुद्धिमत्तेची गोडी लागली, तर महिलांना खऱ्या अर्थाने प्रगती करता येऊ शकेल.

तंत्रज्ञानाच्या, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात महिलांचा टक्का वाढावा म्हणून कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?

इतर अनेक कौशल्यांप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेचाही कौशल्य म्हणून विचार करायला हवा. वयाच्या योग्य टप्प्यावर सर्वांनीच कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य आत्मसात करून घ्यायला हवे. नव्या बाजारपेठांतील संधी मिळवायच्या असतील, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात महिलांनी प्रावीण्य मिळवायला हवे. त्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे. ‘एआय’विषयीची अनेक नवी पुस्तके येत आहेत, साधने उपलब्ध आहेत, त्यांचा आधार महिलांनी घ्यायला हवा. काहीही करून कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण घ्यायलाच हवे. त्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही. वयाला फक्त आकडा समजून व्यवसाय करणाऱ्या, काम करणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक महिलेने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या पायऱ्या चढणे गरजेचे आहे.

Story img Loader