पिंपरी : ‘महापालिकेच्या नागरी सेवा सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम व नागरिककेंद्रित होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता हे संकट नसून, स्मार्ट सहकारी असेल. या माध्यमातून महापालिका डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या शंभर दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुयोग्य माहिती-तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर’ या विषयावर आधारित प्रशिक्षण वर्गात आयुक्त सिंह बोलत होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळचे मुख्य महाव्यवस्थापक समीर पांडे व पुणे आणि उत्तर महाराष्ट्र विभागाचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदीप खोत, सचिन पवार या वेळी उपस्थित होते.
आयुक्त सिंह म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील प्रशासनाचे बळ आहे. यामुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ, जलद आणि अचूक होणार आहे. प्रत्येकाने तंत्रस्नेही होणे ही काळाची गरज आहे. हे कौशल्य भविष्यातील पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी उपयोगी ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या योग्य वापराने कामाची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढवू शकतो. तंत्रज्ञानाबद्दलचे गैरसमज दूर करून अचूक समज घेतल्यास ते अधिक सक्षम बनवू शकते.’
महापालिका अव्वल
राज्यातील प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणण्यासाठी राज्यभरातील महापालिकांचे आणि अन्य क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने शंभर दिवसांचा उपक्रम हाती घेतला आहे. महापालिकेने या अंतर्गत डिजिटल प्रशासन आणि पारदर्शकता, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता सुधारणा, जनता तक्रार निवारण प्रणालीत सुधारणा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता सुधारणा, स्मार्ट शहर सुरक्षा आणि सार्वजनिक जागा सुधारणे, तंत्रज्ञानाधारित सुधारणा आणि महसूल वाढ या सर्व कामांच्या सुधारणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्याबद्दल महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.