पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने केलेल्या विकासकामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन करून उपमुख्यमंत्री अजित पवार आयते श्रेय लाटत आहेत. प्रशासक राजेश पाटील यांना हाताशी धरून अजित पवारांनीच शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे राजकारण सुरू आहे, अशा शब्दांत भाजपाने अजित पवारांवर टीका केली आहे.

अजित पवार शुक्रवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ठिकठिकाणी भाजपावर टीका केली. दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयश आल्याचे सांगत त्यांनी भाजपा नेत्यांची खिल्ली उडवली, त्यास भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रवक्ते एकनाथ पवार यांनी यासंदर्भात निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे.

एकनाथ पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने २४ तास पाणी देण्याचे गाजर दाखवून पालिकेची सत्ता १५ वर्षे भोगली. मात्र, पाण्याचं आश्वासन पाळलं नाही. सद्यस्थितीत पालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांच्या आडून शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असून याचं खापर भाजपावर फोडलं जात आहे. भाजपाने पाच वर्षात आंद्राचे पाणी आणलं. हे पाणी उपलब्ध झाल्यास संपूर्ण शहराचा पाणी प्रश्न मिटणार आहे. निवडणुका येताच अजित पवारांना पिंपरी-चिंचवडचे प्रश्न दिसू लागले आहेत. त्यांनी नागरिकांना दररोज पाणी देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, आधी पालिकेची सत्ता द्या, असा अप्रत्यक्ष दमही भरला आहे.

एकनाथ पवार पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात भाजपाने शहराचा कायापालट केला. भाजपाने विकासाची कामं केलेली असताना, त्या विकासकामांची भूमीपूजने आणि उद्घाटने मात्र अजित पवार करत आहेत. मुळात अजित पवारांना शहराचा पाणीप्रश्न सोडवता आलेला नाही. महापालिकेची पंधरा वर्ष सत्ता असताना पवना धरणातून थेट बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी प्रश्न मार्गी लावता आला असता. त्यांनी तो प्रकल्पच गुंडाळून ठेवला, अशी टीकाही एकनाथ पवारांनी केली आहे.

Story img Loader