लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: गुरुवार पेठेतील एका सराफी पेढीतील सव्वा कोटी रुपयांचे दागिने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कारागिराच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

प्रशांत सुनील सासमल (वय ४०, रा. गणेश पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारागिराचे नाव आहे. याबाबत सिद्धेश ज्वेलर्सचे मालक कीर्ती चंदूलाल ओसवाल यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सासमलने गुरुवार पेठेतील सराफी व्यावसायिक मनोज रमेश ओसवाल यांच्या कुबेर गोल्ड ज्वेलर्समधील दागिन्यांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. सासमल सोन्याचे दागिने घडवून देणारा कारागीर आहे. गेल्या काही वर्षांपासून तो गुरुवार पेठ, रविवार पेठेतील सराफ व्यावसायिकांचे दागिने घडवून देत आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांचा त्याच्यावर विश्वास होता.

कीर्ती ओसवाल यांनी त्याच्याकडे एक कोटी सात लाख ५३ हजारांचे सोने तसेच मनोज ओसवाल यांनी १८ लाख ५४ हजारांचे सोने त्याला दागिने घडविण्यासाठी दिले होते. एक ते दीड महिन्यांपूर्वी त्याने सराफी व्यावसायिकांकडून सोने घेतले. त्यानंतर तो पसार झाला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सराफ व्यावसायिक कीर्ती ओसवाल आणि मनेज ओसवाल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artist run away with half crore of gold given to make jewellery pune print news rbk 25 mrj
Show comments