पुणे : नाट्यगृहांच्या तारखांचे ऑनलाइन आरक्षण करण्यासंदर्भात महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने विकसित केलेल्या ‘रंगयात्रा ॲप’ची अंमबजावणी रद्द करण्याच्या मागणीसाठी कलाकार, नाट्यनिर्माते, व्यवस्थापक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी रविवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराशी आंदोलन केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि रंगकर्मी प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

रंगयात्रा ॲपद्वारे नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांच्या तारखांचे वाटप योग्य प्रकारे होऊ शकणार नाही यासह विविध गोष्टींकडे लक्ष वेधत कलाकार, नाट्यनिर्माते, व्यवस्थापक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे. प्रशांत दामले, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, नाट्यनिर्मात्या भाग्यश्री देसाई, सुरेखा पुणेकर, राष्ट्रवादी सांस्कृतिक आघाडीचे बाबासाहेब पाटील, संवाद संस्थेचे सुनील महाजन, मोहन कुलकर्णी, समीर हंपी, जतीन पांडे, शिरीष कुलकर्णी, प्रवीण बर्वे, सत्यजित धांडेकर, योगेश सुपेकर या आंदोलनात सहभागी झाले होते.

ऑनलाइन प्रक्रियेद्वारे कलाकार, नाट्यनिर्मात्यांना तारखा मिळाल्या नाहीत तर काय? असा प्रश्न सुरेखा पुणेकर यांनी उपस्थित केला. या प्रक्रियेद्वारे नाट्यगृहांमध्ये इतर खासगी कंपन्यांच्या कार्यक्रमांची संख्या वाढेल. त्यामुळे पुण्यातील नाट्य व्यवसाय टिकवण्यासाठी महापालिकेने ही प्रक्रिया रद्द करून तारखांच्या वाटपाची सध्याची पद्धतच सुरू ठेवावी, अशी मागणी राजेभोसले यांनी केली. ‘मराठी व्यावसायिक नाट्य व्यवस्थापक संघाने काही दिवसांपूर्वीच आपला विरोध दर्शवून याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना दिले होते. पण, त्यावर काहीच पावले उचलली गेली नाहीत, याकडे मोहन कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

नाट्यगृह हे प्रथम नाटकांसाठीच असले पाहिजे. रंगयात्रा ॲपद्वारे सर्वांना तारखांसाठी अर्ज करता येणार आहे. एखाद्या संस्थेने संपूर्ण दिवसभरासाठी नाट्यगृह आरक्षित केले तर आम्ही नाटकवाल्यांनी जायचे कुठे? त्यामुळे ही प्रक्रिया थांबवावी आणि आमच्या अडचणी समजून घ्याव्यात. प्रशांत दामले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

रंगयात्रा ॲपचा कलाकार, नाट्यनिर्माते, व्यवस्थापकांना फायदा होणार आहे. कलाकारांच्या सूचना जाणून घेतल्या असून, त्याबाबत सोमवारी (१७ मार्च) महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यावर चर्चा करण्यात येणार आहे.राजेश कामठे, प्रमुख व्यवस्थापक, महापालिका नाट्यगृह विभाग

Story img Loader