लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: रामुभैय्या दाते स्मृती प्रतिष्ठान आणि पी. एन. गाडगीळ एक्सक्लुझिव्ह यांच्या वतीने प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अनुराधा मराठे यांना अरुण दाते कला सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ज्येष्ठ भावगीतगायक अरुण दाते यांच्या ८९ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून ११ मे रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अनुराधा पौडवाल आणि अनुराधा मराठे या दोन्ही गायिकांनी अरुण दाते यांच्यासमवेत अनेक वर्षे सहगायन केले आहे. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षी संगीतकार अशोक पत्की आणि कवी प्रवीण दवणे यांना मुंबईत झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, असे अरुण दाते यांचे पुत्र अतुल दाते यांनी सांगितले.