मराठीमध्ये दिवाळी अंकाची समृद्ध परंपरा आहे. त्या धर्तीवर वाचन संस्कृतीच्या प्रचारासाठी कार्यरत ‘भावार्थ’ने वाचकांच्या हाती वर्षारंभ विशेषांकाची भेट सुपूर्द केली आहे… ‘शुक्रतारा’ या गीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे अरुण दाते यांच्या लोकप्रिय भावगीतांची नवी पालवी असलेल्या ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमाने शताब्दी प्रयोगाची वाटचाल केली आहे. तर, व्यसनापासून मुक्ती मिळवून व्यसनमुक्ती चळवळीचा कार्यकर्ता असे रूपांतर घडलेल्या सुभाष हगवणे यांची जीवनगाथा ‘व्यसनमुक्तीचे संघर्षयात्री’ वाचकांसमोर आली आहे…

वाचन चळवळीमध्ये कार्यरत असलेले ‘पाथफाइंडर’ हे पुस्तकाचे दालन बंद झाल्यानंतर अक्षरधारा बुक गॅलरीने ही धुरा सांभाळली होती. मात्र, शहराचा विस्तार झाल्यानंतर कर्वे रस्ता, कोथरूड परिसरातील साहित्यप्रेमींना पुस्तकांच्या खरेदीसाठी आणि त्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटण्यासाठी शहरात यावे लागत होते. ही कमतरता ‘पुस्तक पेठ’ आणि कर्वे पुतळ्याजवळील ‘भावार्थ’ या नव्या दालनांनी भरून काढली. ‘भावार्थ’मध्ये पुस्तकांच्या खरेदीबरोबरच साहित्य आस्वादनाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते.

या जोडीनेच दालनाच्या संचालक कीर्ती जोशी यांनी वर्षारंभ विशेषांकाची निर्मिती करून साहित्यप्रेमींना अनोखी भेट दिली आहे. लेख, आवडलेले-निवडलेले, पुस्तकांचे मित्र पै काका यांची मुलाखत, वैविध्यपूर्ण प्रयोग होत असलेल्या वाङ्मयीन उपक्रमांची माहिती, कथा, कविता, ‘माणसं’मध्ये पुस्तकवेडा आणि ग्रंथ प्रसारकाचा प्रवास उलगडणारे लेख याबरोबरच पुस्तकप्रेमींची शिफारस अशा विषयांनी हा अंक नटलेला आहे.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ सरांना मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार आणि ‘पुस्तकाचं हॉटेल’वाल्या जोंधळे आजी यांच्यावरील विशेष लेख अंकामध्ये समाविष्ट आहेत. मराठी नववर्षाचे स्वागत दर्जेदार मराठी साहित्याने व्हावे हा वर्षारंभ विशेषांक निर्मितीचे प्रयोजन असल्याचे या अंकाच्या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आले आहे.

‘शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी’ या मंगेश पाडगावकर यांच्या श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताने इतिहास तर घडविलाच; पण गाण्याच्या जन्माबरोबर रसिकाग्रणी रामूभैया दाते यांचा पुत्र असलेले अरविंद म्हणजेच ए. आर. दाते यांचे अरुण दाते हे नामकरण झाले, या अर्थाने या गीताने अरुण दाते या नव्या गायकाचाही जन्म झाला. त्यांच्या बरोबर सुधा मल्होत्रा या हिंदी पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील गायिकेने ‘शुक्रतारा’ हे युगुल गीत असे गायले आहे, की त्यांना मराठी येत नसेल असे कोणाला वाटणारदेखील नाही.

ही आठवण निघण्याचे कारण म्हणजे अरुण दाते यांनी लोकप्रिय केलेल्या ‘शुक्रतारा’ या नव्या पालवीच्या कार्यक्रमाचा शंभरावा प्रयोग नुकताच झाला. ‘हे गीत आले त्या वेळची तरुण पिढी, आमची आणि आता आमची मुले असलेली युवा पिढी अशा तीन पिढ्या अरुण दाते यांच्या भावगीतांच्या विश्वात रमल्या,’ अशी खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलेली भावना महत्त्वपूर्ण आहे. ‘अरुण दाते हे मेहेंदी हसन आणि मायकल जॅक्सन या दोघांचेही संगीत तितक्याच आवडीने ऐकायचे,’ अशी आठवण दाते यांचे पुत्र अतुल दाते यांनी सांगितली.

गायक-संगीतकार मंदार आपटे, पल्लवी पारगावकर, वर्षा जोशी यांनी ‘अविरत ओठी यावे नाम श्रीराम जय राम जय जय राम’, ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला…’, ‘सखी शेजारिणी तू हसत रहा…’, ‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे…’, ‘दिवस तुझे हे फुलायचे…’ ही गीते सादर केली. व्यसनापासून मुक्ती मिळवून व्यसनमुक्ती चळवळीचा कार्यकर्ता असे रूपांतर घडलेले सुभाष हगवणे यांची जीवनगाथा ‘व्यसनमुक्तीचे संघर्षयात्री’ या अनुभवकथनाद्वारे वाचकांसमोर आली आहे.

किरकटवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सुभाष हगवणे यांनी स्वत:च्या आत्मबळावर व्यसनमुक्त होऊन अनेक युवकांना व्यसनमुक्त केले आहे. शाळा, महाविद्यालय, सण-उत्सवांत त्याचप्रमाणे शिबिर, मेळाव्यांत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणारे संघर्षयात्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

वयाच्या विसाव्या वर्षी नकळतपणे दारूच्या व्यसनामध्ये बुडाले. यकृत खराब झाले आणि डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिला; तरी दारू सुटेना. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शेजारच्या खाटेवरील रुग्णाचे निधन झाले. लेकरांसमवेत आक्रोश करणाऱ्या त्या रुग्णाच्या पत्नीला पाहून, ‘मी दारू सोडणार’ असा निर्धार करणारे सुभाष यांनी त्या क्षणापासून व्यसनमुक्तीची संघर्षयात्रा सुरू केली. व्यसनमुक्ती हेच राष्ट्रीय कार्य, या ध्येयाने त्यांनी स्वत:ला व्यसनमुक्ती कार्यात एकरूप करून घेतले. त्यांचा जीवनप्रवास ‘व्यसनमुक्तीचे संघर्षयात्री’ या पुस्तकामध्ये उलगडला आहे.

vidyadhar.kulkarni@expressindia.com