पुणे : राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्र यांच्या सहयोगाने कला क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक-विचारवंत आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कला विमर्शक अरुण खोपकर यांना यंदाचा ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार जाहीर झाला आहे. ४० हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्रीगमा यांच्या स्मृतीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका विचारवंताला अथवा ज्ञानोपासकाला श्री. ग. माजगावकर पुरस्काराने सन्मानित केले जाते. श्री. ग. माजगावकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १ ऑगस्ट रोजी खोपकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, महाराष्ट्राचे विचारविश्व समृद्ध करणारे लेखक प्रा. शेषराव मोरे आणि बौद्ध धर्म व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या सचिव वर्षां गजेंद्रगडकर यांनी दिली.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्राबद्दल सजग असणाऱ्या श्री. ग. माजगावकर यांनी जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक निर्माण करण्यासाठी १९६१ साली माणूस साप्ताहिक सुरू केले. आत्मनिर्भर राष्ट्रवाद आणि सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक समतावाद या दोन प्रेरणांचा समन्वय साधण्यासाठी विविध विचारधारांना श्रीगमा खुल्या मनाने सामोरे गेले. महाराष्ट्राच्या वैचारिक समृद्धीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले विचारवंत, ज्ञानोपासक अथवा अभ्यासक यांना दरवर्षी सन्मानित करावे, अशी या पुरस्कारामागची भावना आहे. २०१९ ते २०२९ अशी ११ वर्षे हा पुरस्कार देण्यात येणार असून श्रीगमा यांच्या जन्मशताब्दी वर्षांत म्हणजे २०२९ मध्ये या पुरस्काराची सांगता होईल, असे ढेरे यांनी सांगितले.