‘सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी असहिष्णू हा शब्दही अपुरा ठरावा. सर्व प्रशासकीय व्यवस्थांमध्ये हिंदुत्वाचे भाट असून दलित, आदिवासी, मुस्लिम यांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे,’ असा आरोप प्रसिद्ध लेखिका अरूंधती रॉय यांनी शनिवारी केला.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे देण्यात येणारा यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार रॉय यांना देण्यात आला. यावेळी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार पंकज भुजबळ, जयदेव गायकवाड, दीप्ती चवधरी, विचारवंत हरी नरके, माजी महापौर चंचला कोद्रे, समीर भुजबळ, कृष्णकांत कुदळे, राजू घाटोळे आदी उपस्थित होते. पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम आणि पुस्तकांच्या मानधनातून मिळालेले दोन लाख रुपये असा तीन लाख रुपयांचा निधी रमाबाई मिशनला देण्याचे रॉय यांनी जाहीर केले.
यावेळी रॉय म्हणाल्या, ‘संपूर्ण उपखंडात रसातळाला जाण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे आणि त्यात भारताचा उत्स्फूर्त सहभाग आहे. सगळ्या शिक्षणसंस्था, महत्त्वाच्या संस्थांमध्ये सरकारच्या मर्जीतील माणसे भरली जात आहेत. देशाचा इतिहासच बदलण्याचे प्रयत्न केले जात आहेत. धर्मातून बाहेर गेलेल्यांना आरक्षणाची लालूच दाखवून चालणारा ‘घर वापसी’चा प्रकार क्रूर आहे. डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वांचा त्यांच्याच विरोधात वापर करण्यात येत आहे. बाजीराव-मस्तानी चित्रपटावरून मोठा वाद होतो. मात्र पेशव्यांच्या काळात दलितांवर झालेल्या अन्यायाची चर्चाही होत नाही.’
यावेळी भुजबळ म्हणाले, ‘एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभारायची आणि त्यांच्या विचाराने चालणाऱ्यांना विरोध करायचा, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालायचा. ‘मूँह मे राम, बगल में छुरी’ असा शासनाचा प्रकार आहे. समोरच्याचे म्हणणे पटत नसले, तरीही ते ऐकून घेणे ही सहिष्णुता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्याबाबत काहीच बोलत नाहीत. म्हणजे त्यांचा या प्रकारांना पाठिंबा आहे असे समजायचे का? असा प्रश्न पडतो’
अभाविपचा कार्यक्रमांत गोंधळ
अरुंधती रॉय यांना पुरस्कार देण्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमामध्ये गोंधळ केला. रॉय यांना पुरस्कार देण्याच्या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढले. याबाबत ‘आमचा पुरस्काराला विरोध नाही, तर देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या अरूंधती रॉय यांना विरोध आहे,’ असे स्पष्टीकरण संघटनेतर्फे देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा