महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदावर अखेर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस आता सत्तेत आणि विरोधात अशी परिस्थिती महापालिकेत निर्माण झाली असून या नियुक्तीबाबत मनसेने जोरदार आक्षेप घेत महापालिका सभेचे कामकाज गुरुवारी अर्धा तास रोखून धरले.
मनसेच्या एका नगरसेविकेचे पद न्यायालयाने रद्द केल्यामुळे काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता पदाची मागणी करण्यात आली होती. दोन्ही पक्षाच्या सदस्यांची संख्या २८-२८ अशी झाल्यामुळे हे पद राष्ट्रीय पक्षाला मिळावे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता. अखेर नियोजन समिती निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला कोंडीत पकडले आणि हे पद मिळवले.
महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सुरू होताच विरोधी पक्षनेता पदाचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस समर्थकांनी विजयाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. शिंदे यांची नियुक्ती केली आहे का, अशी विचारणा मनसेचे गटनेता वसंत मोरे यांनी महापौरांकडे केली आणि सभेचे कामकाजच मनसेच्या नगरसेवकांनी रोखून धरले. त्यानंतर महापौर वैशाली बनकर यांनी शिंदे यांना पत्र दिल्याचे जाहीर केले.
या गोंधळात महापौरांनी कार्यपत्रिका सुरू करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे मनसेचे सदस्य महापौरांच्या आसनासमोर धावत गेले. विरोधी पक्षनेता पदाची व्याख्या सांगा, अशी मागणी ते करत होते. महापौर खुलासा द्या, अशा घोषणा मनसेचे नगरसेवक देत होते. मोठय़ा गोंधळानंतर अखेर हे पत्र मी माझ्या अधिकारात दिले, असा खुलासा महापौरांनी केला.
महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेस सत्तेत सहभागी आहे आणि त्याच काँग्रेसला आता विरोधी पक्षनेता पदही देण्यात आले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पुण्याचे वाटोळे करणार आणि अर्धे-अर्धे वाटून खाणार, अशी टीका वसंत मोरे यांनी यावेळी बोलताना केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा