पुणे: यंदाच्या पावसाळ्यातील अपुरा पाऊस आणि मागील वर्षभरात अपेक्षित दर न मिळाल्याचा परिणाम म्हणून यंदाच्या हंगामात हळद लागवडीत मोठी घट झाली आहे. देशभरातील लागवडीत सुमारे दीड लाख हेक्टरने घट झाल्याचा अंदाज सांगलीच्या हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात हळदीची लागवड मे महिन्यापासून (अक्षय्य तृतीयेपासून) जून अखेरपर्यंत होत असते. पश्चिम महाराष्ट्रात ऐन मे महिन्यात तर मराठवाड्यात जूनअखेर हळदीची लागवड होते. यंदा लागणीच्या वेळेस पाण्याची टंचाई जाणवत होती. शिवाय मागील वर्षभर हळदीचे दर घसरलेलेच होते. यंदा सरासरी चार हजार ते सात हजार रुपयांपर्यंत दर आहे.

हेही वाचा… आज मुंबईतून पुण्याला जाण्याचा विचार करत असाल तर हे वाचाच….

मागील दोन वर्षे हळदीचे दर प्रति क्विंटल दहा हजार रुपयांवर गेले होते. कमी दराचा फटका यंदा शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाड्यात ऐन हळद काढणीच्या हंगामात पाऊस पडल्यामुळे हळदीचा दर्जा घसरला होता. कमी दर्जाच्या हळदीची सुमारे २० हजार पोती मागणीअभावी पडून होती. त्याचा थेट परिणाम यंदाच्या लागवडीवर दिसून येत आहे. मागील वर्षी देशात सुमारे ३.५० लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा त्यात सुमारे १.५० लाख हेक्टरने घट होऊन लागवड २.१० लाख हेक्टरवर स्थिरावली आहे.

हळद लागवडीच्या काळात पाण्याची टंचाई होती. त्यानंतर पावसाळ्यातही कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे सध्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या हळद पिकाला पुरेसे पाणी मिळत नाही. हळदीची काढणी फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. आताच टंचाईची स्थिती असल्यामुळे फेब्रुवारीपर्यंत पिकाला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न हळद उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे. पिकांना अपेक्षित पाणी न मिळाल्याचा परिणाम म्हणून राज्यात हळद उत्पादनात सुमारे दहा टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

राज्यात ५० हजार हेक्टरने लागवडीत घट

महाराष्ट्र हळद उत्पादनातील आघाडीवरील राज्य आहे. मागील सलग चार वर्षे लागवड क्षेत्रात वाढ होत होती. मागील वर्षी १.१० लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा अपुरा पाऊस, सिंचनासाठी पाण्याचा तुटवडा, दरातील अस्थिरता आणि लागवडीच्या काळात बियाणांचा निर्माण झालेला तुटवडा आदी कारणांमुळे यंदा राज्यातील हळद लागवड ६० ते ६५ हजार हेक्टरवर स्थिरावली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हळद लागवडी खालील क्षेत्रात ४५ ते ५० हजार हेक्टरने घट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यनिहाय संकलन सुरू

अपुरा पाऊस आणि मागील वर्षी मिळालेल्या कमी दरामुळे यंदा देशभरातील हळद लागवडीत घट झाली आहे. हळदीचे दर दहा रुपये क्विंटलवरून सात हजार क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. त्यात पाणी टंचाईची भर पडल्यामुळे लागवडीत घट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्यनिहाय लागवड क्षेत्राच्या माहितीचे संकलन सुरू आहे, अशी माहिती सांगली येथील हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As a result of inadequate rains and failure to get the expected rates in the previous year a huge decline in turmeric cultivation this season pune print news dbj 20 dvr
Show comments