पुणे: दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मंगळवारी पुण्यातील बँकांमध्ये तुरळक गर्दी दिसून आली. नागरिकांनी नोटा बदलून घेण्याऐवजी त्या आपल्या खात्यात जमा करण्यास प्राधान्य दिले. नोटा बदलून घेण्यासाठी अर्ज करावा लागत नसल्याने ही प्रक्रिया कमी वेळेत पूर्ण होत असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, काही खासगी बँकांनी नोटा बदलून देण्यास नकार दिल्याच्या तक्रारी नागरिकांनी समाजमाध्यमांवर केल्या.
रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बदलण्यास आजपासून सुरुवात झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका आणि सहकारी बँकांमध्ये आज सकाळपासून या नोटा बदलण्यासाठी तुरळक गर्दी दिसून आली. रिझर्व्ह बँकेने एका वेळी दोन हजारांच्या दहा नोटा बदलून मिळतील, असा नियम केला आहे. तसेच, नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही अर्जाची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. याच वेळी काही सहकारी बँकांनी नोटा बदलण्यासाठी अर्ज लिहून घेतल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
आणखी वाचा- पुणे : बनावट इमेलद्वारे बांधकाम कंपनीतील अधिकाऱ्यांची १४ लाखांची फसवणूक
पुण्यातील बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसले नाही. अनेक बँकांमध्ये खातेदार नोटा बदलून घेण्याऐवजी आपल्या खात्यात जमा करताना दिसत होते. बँकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेमुळे कामकाजावर फारसा परिणाम झाला नाही, असे स्पष्ट केले. परंतु, दोन हजारांच्या किती नोटा जमा झाल्या याचा दैनंदिन अहवाल बँकांना तयार करावा लागणार असल्याने कामाचा बोजा वाढणार असल्याचे काहींनी सांगितले.
दोन हजारांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सर्व बँकांमध्ये आज सुरळीतपणे पार पडली. रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरनंतरही दोन हजारांचे चलन वैध असेल, असे जाहीर केल्याने नागरिकांनी बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी गर्दी केली नाही. -विद्याधर अनास्कर, बँकिंग तज्ज्ञ
नागरी सहकारी बँकांमध्ये दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी फारशी गर्दी आज नव्हती. बहुतांश खातेदारांनी खात्यावर नोटा जमा करणे पसंत केले. नोटा बदलणाऱ्या खातेदारांचे प्रमाण सुमारे एका टक्का तर खात्यावर जमा करणाऱ्यांचे प्रमाण ९९ टक्के दिसून आले. -ॲड. सुभाष मोहिते, अध्यक्ष, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन