खासदार असदुद्दीन ओवेसी यांची टिप्पणी
उच्चवर्णीयांच्या तुलनेत देशामध्ये किती मुस्लीम, दलित आणि आदिवासींना ‘पद्म’ किताब मिळाले? नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांची भेट घेतली आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘भारतरत्न’ झाले, अशा शब्दांत मजलिस ए इत्तेहदुल (एमआयएम) पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी टिप्पणी केली. हिंदूमुळे नव्हे, तर केवळ भारतीय राज्यघटनेमुळे भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे असा दावा करतानाच ओवेसी यांनी राज्ययंत्रणेने धार्मिक मुद्दय़ांवर तटस्थ असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
‘वर्डस् काउंट’ या वर्षां चोरडिया आणि सबिना संघवी यांच्यातर्फे आयोजित शब्दोत्सवात ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी ओवेसी यांची आणि पटकथाकार-स्तंभलेखिका अद्वैता कला यांनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांची मुलाखत घेतली.
शबरीमाला प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. तेथे विश्वास आणि तिहेरी तलाकच्या मुद्दय़ावर लिंगभेद हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका त्यांनी केली. बहुविध धर्म आणि संस्कृती असलेल्या देशात समान नागरी कायदा आणणे शक्य नाही, असेही ते म्हणाले.
स्वत:ला सच्चा हिंदू सिद्ध नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही पक्षांमध्ये काही फरक नाही, असेही ओवेसी म्हणाले. माझा मतदार असलेले बहुसंख्य मुस्लीम, दलित आदिवासी सध्या कारागृहात आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.