पुणे : असियान देशांशी व्यापार वाढविण्यासाठी असियान व्यापार परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या निमित्ताने पुण्यातील भारतीय असियान व्यापार परिषदेच्या कार्यालयाचे उद्धाटन करण्यात आले असून, व्यापार आयुक्तपदी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक डॉ. सचिन मधुकर काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय असियान व्यापार परिषद पुणेच्या वतीने ही असियान व्यापार परिषद आयोजित करण्यात आली. ही परिषद म्यानमारचे मोई क्याव आंग आणि लाओसचे राजदूत बाउंमी वॅनमनी यांच्या सहकार्यातून झाली. या वेळी म्यानमारचे उच्चाधिकारी डॉ. रंगनाथन, पुष्कराज एंटरप्रायजेसचे शैलेंद्र गोस्वामी हे उपस्थित होते. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, इंडियन इकॉनॉमिक ट्रेड ऑर्गनायझेशनचे जागतिक अध्यक्ष डॉ. आसिफ इक्बाल आणि इतर प्रतिनिधीही हजर होते. या वेळी भारत आणि असियान देशांतील व्यापारी संबंध वाढविण्यासाठी डॉ. सचिन मधुकर काटे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा – काळजी घ्या! लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले
या वेळी बोलताना डॉ. सचिन काटे म्हणाले की, पुणे शहर हे तरुण लोकसंख्येचे आणि मोठ्या उद्योजकांचे शहर आहे. येथे असियान देशांमधील व्यवसायांना मोठा वाव आहे आणि आमचे कार्यालय असियान प्रदेशात संधी शोधत असलेल्या लोकांना मदत करेल. सोबतच व्यवसाय वाढीला आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन येथे शिक्षित आणि अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण करू.