‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हटले की महाकवी कालिदासाची आठवण होते. त्या निमित्ताने पुण्यात कवितांचे अभिवाचन, चित्रप्रदर्शन, व्याख्यान आणि नृत्य सादरीकरण या माध्यमातून महाकवी कालिदास आणि पाऊस रसिकांसमोर उलगडणार आहे.
नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात शनिवारी (१८ जुलै) सायंकाळी सहा वाजता ‘शब्दांचा पाऊस’ हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. डॉ. माधव आणि डॉ. मैत्रेयी मुतालिक हे दोघे कवी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यामध्ये लहानपणी आपण ऐकलेल्या, शिकलेल्या आणि म्हटलेल्या मराठीतल्या गाजलेल्या पावसावरच्या कविता सादर करण्यात येणार आहेत. पावसाचे विविध मूड्स उलगडून दाखवण्याचा प्रयत्न यातून करणार असल्याचे डॉ. मुतालिक यांनी सांगितले. डॉ. मुतालिक हे या कार्यक्रमाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे.
कलाछाया संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून चित्रप्रदर्शन, व्याख्यान आणि नृत्य सादरीकरण अशा त्रिवेणी माध्यमातून महाकवी कालिदास रसिकांसमोर उलगडणार आहे. पत्रकारनगर रस्त्यावरील दर्पण कलादालन येथे शनिवारी (१८ जुलै) ‘महाकवी कालिदास’ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि आनंद जोग यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यामध्ये वामन करंजकर, दिनकर थोपटे, जयप्रकाश जगताप, वासुदेव कामत, जगदीश चाफेकर, अनिल उपळेकर, पंकज भांबुरकर, सचिन जोशी आणि रवी देव यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. त्यानंतर ‘कालिदासाच्या वाङ्मयातील नायिका’ या विषयावर डॉ. सुचेता परांजपे यांचे तर, गुरुवारी (२३ जुलै) ‘कालिदासाचा भारत’ या विषयावर श्रीनंद बापट यांचे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू प्रभा मराठे यांनी दिली.
‘नृत्यरंग’ कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी (२४ जुलै) कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’ आणि ‘कुमारसंभवम’ या काव्यावर आधारित नृत्याविष्कार सादर होणार आहे. ऋतुसंहार या नृत्याची संकल्पना-संरचना आणि दिग्दर्शन डॉ. संध्या पुरेचा यांचे आहे. कुमारसंभवम या नृत्याची संकल्पना प्रभा मराठे यांची असून कलाछाया संस्थेनेच निर्मिती केली आहे. रश्मी जंगम आणि विद्यार्थिनी हे नृत्य सादर करणार आहेत. घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा