‘नाटकघर’ आणि ‘सिद्धिविनायक’ या संस्थांची निर्मिती असलेल्या ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकाची कोलकता येथील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ३२ व्या ‘नांदीकार’ आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव आणि ‘गोबोरडांगा’ या राष्ट्रीय महोत्सवासाठी निवड झाली आहे. हे दोन्ही महोत्सव पुढील महिन्यात होत असून तेथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
भारतीय रंगभूमीवरील अभिजात नाटक मानले गेलेल्या ‘आषाढ का एक दिन’ या मोहन राकेश लिखित नाटकाचा अनुवाद म्हणजे ‘आषाढातील एक दिवस’ हे नाटक. या नाटकात उपस्थित केलेले सत्ता आणि कलेबाबतचे प्रश्न आजही महत्त्वपूर्ण आहेत. महाकवी कालिदास आणि त्याची प्रेयसी मल्लिका या दोघांच्या आयुष्यावर आधारित हे नाटक तरल नाटय़ानुभवाची प्रचिती देते. या नाटकाचा मराठी अनुवाद ज्योती सुभाष यांनी केला असून अतुल पेठे यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध ध्रुपदगायक पं. उदय भवाळकर यांचे गायन हे या नाटकाचे वैशिष्टय़ असून नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. प्रकाशयोजना प्रदीप वैद्य यांनी केली असून नेपथ्य श्याम भूतकर यांचे आहे. या नाटकामध्ये ज्योती सुभाष, पर्ण पेठे, आलोक राडवाडे, गजानन परांजपे, ऋचा आपटे, नचिकेत देवस्थळी, रणजित मोहिते, अधीश पायगुडे, कृतार्थ शेवगावकर आणि ऋतुराज शिंदे यांच्या भूमिका आहेत. लवकरच या नाटकाचा अमृतमहोत्सवी प्रयोग होणार असल्याची माहिती अतुल पेठे यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा