पुणे : ‘मतदार ज्यांना निवडून देत नाहीत किंवा जे निवडून येत नाहीत. अशा व्यक्ती विधानसभेत जाण्याऐवजी विधाने करणाऱ्या कार्यक्रमात दिसतात,’ अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. श्रीमंत मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक फाऊंडेशन निर्मित ‘पुण्यश्लोक’ या ऐतिहासिक महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाच्या उद्घाटनासाठी शेलार आले होते.

‘खोके घेणारे सगळे विधानसभेत आणि विधानपरिषदेत बसले आहेत,’ अशी टीका काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केली होती. हा धागा पकडून शेलार म्हणाले, ‘अस्तित्व दाखवून देण्यासाठी या पद्धतीने विधाने करून घेण्याचा हा प्रकार आहे. राज्यातील जनतेला ते सर्व कळाले आहे. राज्यातील जनतेेने निवडून दिलेले विधानसभेत किंवा विधानपरिषदेत बसले आहेत. ते सर्वच पक्षांचे आहेत. मात्र, ज्यांना लोक निवडून देत नाही ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात,’ असे शेलार यांनी सांगितले.

कलाकेंद्राच्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याची खंत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केली होती. त्यावर ते म्हणाले, ‘त्यांनी माझ्याकडेही तक्रार केली आहे. यासंदर्भात समोर आलेली माहिती खूप धक्कादायक आहे. त्यामुळे लोकनाट्य, लोकसंगीत सोडून अन्य काही प्रकार होत असतील तर कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.’

‘आदर्श वाटचालीचे तेजस्वी दर्शन’

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्रतस्थ, स्वाभिमानी आणि आदर्श वाटचालीचे तेजस्वी दर्शन पुण्यश्लोक या ऐतिहासिक महानाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर येईल, असे आशिष शेलार यांनी सांगितले. त्यांनी केलेले कार्य हे जगात राहणारे आणि हिंदुस्थानावर प्रेम करणाऱ्या कोणालाही विसरता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. माजी आमदार रामहरी रुपनवर, विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या पत्नी आशा, अहिल्याबाई होळकर यांचे वंशज स्वप्नील राजे होळकर, अमरजित राजे बारगळ, नितीन वाघमोडे या वेळी उपस्थित होते.