पुणे : राज्य सरकार मुंबईतील दहा एकर जागेत मनोरंजन क्षेत्राताच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी सांगितले.‘राज्यातील युवकांना मनोरंजन क्षेत्रात मार्गदर्शन मिळावे, म्हणून ॲनिमेशन, व्हिज्युअल, गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रातील शैक्षणिक (सेंटर ऑफ एक्सलंस) संस्था उभारणार असून, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांद्वारे उच्च शिक्षण देण्यात येणार आहे,’ असे शेलार यांनी स्पष्ट केले.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, चित्रपट दिग्दर्शक आणि केरळ चित्रपट महोत्सवाचे संचालक शाजी करुण, पुणे फिल्म फाउंडेशनचे सरचिटणीस रवी गुप्ता, विश्वस्त सतीश आळेकर, मोहन आगाशे आदी उपस्थित होते.

या वेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेत्री शुभा खोटे यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड् ॲवॉर्ड’, पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देण्यात आले. तसेच, महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्युरींचे सत्कार करण्यात आले. दिग्दर्शिका मार्गरिटा व्हिसारिओ यांचा ‘ग्लोरिया’ हा उद्घाटनाचा चित्रपट दाखवण्यात आला.

‘चित्रपट महोत्सवामध्ये अनेक लोक एकत्र येतात. त्यामुळे सरकारही अशा महोत्सवाला प्रोत्साहन देते. राज्यातील तरुणांनी चित्रपट क्षेत्रात यायला हवे, यासाठी सरकारकडून मदत करण्यात येेईल. महाराष्ट्र हे चित्रपट चित्रिकरणासाठीचे उत्तम ठिकाण असून, परदेशी चित्रपट निर्मात्यांनी राज्यात यावे,’ असे आवाहन खारगे यांनी केले. ‘पिफ’तर्फे लवकरच आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव घेण्यात येणार असल्याचे डॉ. पटेल यांनी प्रास्ताविकातून सांगितले. क्षितीज दाते आणि श्रेया बुगडे यांनी सूत्रसंचालन केले.