पुणे : ‘काही देश प्रचंड करवाढ लागू करत आहेत. त्याचा फटका भारतालाही बसत आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होताना अशा आव्हानांवर नवउद्यमी, नवसंकल्पना हेच उत्तर आहे,’ अशी भूमिका राज्याचे सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञानमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मांडली. डेस्टिनेशन को वर्किंग, पुणे बिझनेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप, टीडीटीएल, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित ‘पुणे स्टार्टअप एक्स्पो’मध्ये ॲड. शेलार बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, एक्स्पोच्या आयोजक अमृता देवगावकर, मंदार देवगावकर, डेटा टेकचे संचालक अमित आंद्रे या वेळी उपस्थित होते. सर्वोत्तम ठरलेल्या २४ नवउद्यमींना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

ॲड. शेलार म्हणाले, ‘पूर्वीच्या काळात नवसंकल्पना केवळ सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कुटुंबांपुरत्या मर्यादित होत्या. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. नवसंकल्पना, नवउद्यमी तळागाळात पोहोचत आहेत. २०४७पर्यंत विकसित भारताचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आधी जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था व्हावी लागेल. काही देश कर वाढवत आहेत. भारताला ते सहन करावे लागत आहे. मात्र, या परिस्थितीला नवउद्यमी, नवसंकल्पना हेच उत्तर असणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील युवांच्या नवकल्पनांना व्यासपीठ आणि गुंतवणूकदार मिळाले पाहिजेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नवसंकल्पनेला चालना दिली. नवउद्यमींसाठी नवउद्यमी धोरण आणले. त्यामुळे भारत नवउद्यमींमध्ये जगात आघाडीवर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे शिक्षण व्यवस्था बदलत आहे. मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. नवउद्यमी बाजारपेठेत येत नाही, तोपर्यंत तो छंद राहतो. नवउद्यमींच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणे, मानसिकता बदलणे गरजेचे आहे,’ असे पाटील यांनी नमूद केले.

पुणे हे ‘पूर्वेकडील सिलिकॉन व्हॅली’

‘पुण्याची ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ अशी ओळख आहेच. मात्र, आता ‘पूर्वेकडील सिलिकॉन व्हॅली’ अशीही पुण्याची जागतिक स्तरावर ओळख झाली आहे. पुण्याची स्वतःची अशी क्षमता आहे. अनेक शिक्षण संस्था, शिक्षणतज्ज्ञ, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, एमएसएमएईज, नवउद्यमी परिसंस्था पुण्यात आहेत. पुण्याच्या विकासासाठी अधिक चांगली धोरणे सरकार करत आहे,’ असेही ॲड. शेलार यांनी नमूद केले.