विरोधकांनी प्रतिष्ठेची केलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार व कारखान्याचे अध्यक्ष ॲड अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. विरोधातील घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील फराटे हे एकमेव उमेदवार विजयी झाले. प्रमुख विजयी उमेदवारामध्ये आमदार ॲड अशोक पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे, आबासाहेब पाचुंदकर यांचा समावेश आहे. तर, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग थोरात, पांडुरंग दुर्गे, महेश ढमढेरे, आबासाहेब गव्हाणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलचा उमेदवारानी आघाडी घेतली होती. गेल्या २० वर्षाहून अधिक काळ कारखान्यावर पवार यांची एकहाती सत्ता आहे. कारखानावर बिनविरोध संचालक म्हणून पुत्र ऋषिराज पवार याला निवडून आणत राजकारण प्रवेश करून घेतला.