पुणे : पर्वती मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून, त्यावरील वर्चस्व कायम राखण्याची यंदा भाजपसमोर कसोटी आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ या येथून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम यांनी आव्हान निर्माण केले. येथे महायुती विरोधात महाविकास आघाडी असा थेट सामना होण्याऐवजी काँग्रेसचे आबा बागुल यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली.

मागील विधानसभा निवडणुकीत मिसाळ आणि कदम यांच्यात लढत झाली होती. यंदा दोघी पुन्हा आमनेसामने आहेत. गेल्या वेळी मिसाळ यांना ९७ हजार १२ तर कदम यांना ६० हजार २४५ मते मिळाली होती. गेल्या वेळी वंचित बहुजन आघाडीला ७ हजार ७३४ मते तर नोटाला ३ हजार ६६८ मते मिळाली होती. यावेळी बागुल यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीची मते फुटण्याची शक्यता आहे. बागुल हे केवळ महाविकास आघाडीची मते फोडतात की भाजपची मते आपल्याकडे वळवितात हे पाहावे लागणार आहे. त्यांनी भाजपची मते आपल्याकडे वळविल्यास बागुल यांचा वाढलेला मतटक्का निकालावर परिणाम करणारा ठरेल. गेल्या वेळी या मतदारसंघात ४९.०५ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.२६ टक्के मतदान झाले. यंदा मतदानाच्या टक्क्यात सुमारे सहा टक्के वाढ झालेली आहे. हा वाढलेला मतटक्काही महत्त्वाचा ठरणार आहे.

आणखी वाचा-ऐन निवडणूकीच्या धामधूमीत तीन बोकड, शेळी चोरीला… ज्येष्ठ महिलेची पोलीस ठाण्यात धाव

या मतदारसंघात कचरा, खराब रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था हे मुद्दे प्रामुख्याने आहेत. आंबिल ओढ्याला आलेला भीषण पुराचा मुद्दा मागील निवडणुकीत केंद्रस्थानी राहिला होता. या पुरात १३ जणांना जीव गमवावा लागला होता. आंबिल ओढ्याच्या परिसरात झालेली अतिक्रमणे हा कळीचा मुद्दा आहे. यामुळे ओढ्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही उपस्थित होतो. या मतदारसंघात झोपडपट्टीचा भागही मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यासाठी कचरा आणि सांडपाण्याची समस्या अतिशय मोठी आहे. त्यामुळे हे निवडणुकीत चर्चेचे विषय ठरले.

आणखी वाचा-शुश्रूषेसाठी ठेवलेल्या एकाकडून पाच लाखांची खंडणी, पोलिसांकडून गुन्हा दाखल

भाजप आणि माधुरी मिसाळ यांच्यासमोर हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान आहे. याच वेळी मागील वेळचा पराभव विजयात परिवर्तित करण्याचे आव्हान अश्विनी कदम यांच्यासमोर आहे. या मतदारसंघात सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीचे वारे होते. महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले. मात्र, महाविकास आघाडीला आबा बागुल यांची बंडखोरी रोखता आली नाही. त्यामुळे बागुल यांची निवडणुकीतील कामगिरी मिसाळ आणि कदम यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे.