पुणे : परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या आंतरराष्ट्रीय ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग २०२५’ (एईडी) या वार्षिक भू-अर्थशास्त्र परिषदेचे २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला ९ देशांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान या संकल्पनेवर केंद्रित ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग’मध्ये ९ देशांतील ४० वक्ते तीन दिवसांच्या १२ सत्रांमध्ये सहभागी होतील. यामध्ये ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इंडोनेशिया, जपान, नेपाळ, नेदरलँडस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या देशांतील धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगतज्ज्ञ सहभागी होतील. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात गुरुवारी (ता.२०) परिषदेचे संयोजक व माजी राजदूत गौतम बंबावाले हे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर बायोकॉन ग्रुपच्या अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ यांच्याशी भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेतील तज्ज्ञ रमा बिजापूरकर या संवाद साधतील. परिषदेच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय रेल्वे व माहिती तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव हे समारोपीय सत्रात सहभागी होतील. या परिषदेला उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
या तीन दिवसीय परिषदेत आर्थिक विखंडनाच्या गुंतागुंतीच्या काळात लवचिकता आणि पुनरुत्थानासाठी कृतीयोग्य दिशा यावर चर्चासत्रे होतील. परिषदेत चर्चा करण्यात येणाऱ्या काही महत्त्वाच्या भू-आर्थिक विषयांमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता, सायबर सुरक्षा, आफ्रिकेमधील परिवर्तन, नील अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था, हवामान बदल आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग यांचा समावेश आहे. या परिषदेत कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि ऑटोमेशनच्या युगात नेतृत्वाची पुनर्कल्पना, आफ्रिकेतील परिवर्तन – मदतीपासून गुंतवणुकीपर्यंत, सायबर विषयांवर सहकार्य – एक आर्थिक आवश्यकता, आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था – आव्हाने आणि नील अर्थव्यवस्था या विषयांवर सत्रांचा समावेश आहे.
पुणे हे लघु व मध्यम उद्योगांचे केंद्र आहे. त्यामुळे पुण्यातील या उद्योगांच्या दृष्टिकोनातून या परिषदेत काही चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पुण्याभोवतालच्या लघु व मध्यम उद्योगांना निश्चितच यातून चालना मिळेल. याचबरोबर मुंबईसाठी महत्त्वाच्या असलेल्या नील अर्थव्यस्थेवरही विचारमंथन होणार आहे. – गौतम बंबावाले, संयोजक, एशिया इकॉनॉमिक डायलॉग