राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात डाव्या विचारसरणीच्या लोकांवर कडाडून टीका केली. लहान मुलांना त्यांच्या गुप्त अवयवांविषयी विचारलं जाणं हा डाव्या विचारसरणीचा परिणाम आहे असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे. पुण्यात अभिजित जोग यांच्या ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचं प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हटलं आहे मोहन भागवत यांनी?
“मी असं म्हणतो की आपल्यापुढे एक नवी लढाई उपस्थित झाली आहे. खरंतर ही लढाई खूप प्राचीन आहे. त्यातली पात्रं बदलली, चेहरे बदलले आहेत. नवे चेहेरे आले तरी प्रवृत्ती एकच आहे ती असुरी प्रवृत्ती. आजकाल परसेप्शन असा एक शब्द ऐकू येतो. जे आहे ते तसं नाही असा एक भ्रम उत्पन्न केला की त्याला परसेप्शन म्हटलं जातं. परसेप्शन चांगलं असलं पाहिजे. त्याच्यामागे जे चित्र आहे ते वेगळं असलं तरी चालेल. तुम्ही सत्य बोलता की नाही याला महत्व नाही तुम्ही राजकीयदृष्ट्या योग्य आहात याला महत्व आलं आहे. या लढाईत आपल्याला उतरलंच पाहिजे. या लढाईला इंग्रजी शब्द वापरला जातो तो म्हणजे नॅरेटिव्ह म्हणजेच उभा केलेला भ्रम. कारण आता बाकी कशाचीही मात्रा चालत नाही. त्यामुळे भ्रम उभा केला जातो.”
मी डावे आणि उजवे असं काहीही मानत नाही
“आपण डावी वाळवी म्हणतो. पण डावे उजवेही आपलं नाही, हे सगळं तिकडून (पाश्चिमात्य देशांतून) आलेलं आहे. आजच्या घडीला लेफ्ट म्हणजेच डाव्यांनाही त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली आहे. मी का त्यांना डावं म्हणावं? डावं आणि उजवं काही नाही, हे सगळे अहंकारी लोक आहे. अमेरिकेच्या संस्कृतीला दुर्गंधी आणण्याचं काम त्यांनीच केलं. हे फक्त हिंदूंचे विरोधी नाहीत, तर जगातल्या सगळ्या मंगल विचार करणाऱ्यांचे विरोधी लोक आहेत.”
लहान मुलांशी चर्चा करा तुम्हाला समजेल संकट किती गहिरं आहे
“डाव्यांचं संकट किती गहिरं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या घरातल्या लहान मुलांशी चर्चा करा. त्यांना १ ते १० संख्या म्हणून दाखवायला सांगा. त्यांना विचारा तुम्हाला राम, कृष्ण यांच्याबाबत माहित आहे का? एकदा शेषाद्रीजी एका घरी गेले होते. संध्याकाळी त्या घरातून बाहेर पडत असताना त्या घरातल्या आजीने कृष्णाच्या मूर्तीपुढे उदबत्ती लावली. शेषाद्री थांबले, त्यांनीही मूर्तीला नमस्कार केला. त्यावेळी त्या घरातली लहान मुलगी बसून राहिली होती. तिने नमस्कार केला नाही, उठून उभीही राहिली नाही, त्यावर शेषाद्री तिला म्हणाले काय गं? कृष्णाच्या मूर्तीला नमस्कार नाही केलास? त्यावर त्या मुलीने उत्तर दिलं तो आजीचा देव आहे. तुझा देव कोणता? तर तिचा देव तिला जो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवला जातो तो. तुम्हीच अंदाज करा मी करत नाही. हे आपल्या मुलांपर्यंत आलं. मी गुजरातमध्ये गेलो होतो, एका शाळेचं सर्क्युलर मला एका संताने दाखवलं, त्यात लिहिलं होतं ‘केजी २ च्या मुलांना गुप्त अवयवांविषयीची नावं माहित आहेत का? याची खात्री करुन घ्या.’ हे वर्गशिक्षकांना सांगण्यात आलं होतं. मला आणखी एकाने सांगितलं की आपल्या आई वडिलांनी केलेल्या चुका लिहून काढा. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आक्रमण कुठपर्यंत आलं आहे ते कळतं.” असंही मोहन भागवत म्हणाले.
दिलपराज प्रकाशनाच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘जगभराला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडीत, प्रकाशक राजीव बर्वे, अभिजीत जोग यावेळी उपस्थित होते. डाव्या विचारांचे चेहरे वेगळे आहेत, मात्र आसुरी प्रवृत्ती कायम आहे. त्यामुळे प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि योग्य आचारण या मार्गाने ही विखारी, विषारी प्रवृत्ती रोखता येईल, असे भागवत यांनी सांगितले.