लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे पत्ते भारतीय जनता पक्षाने काटले आहेत. पर्वतीमधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले भाजपचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधील इच्छुक, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची अनुक्रमे राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाच्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील इच्छुकांच्या नावावर फुली मारण्यात आल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.

भाजपचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्याविरोधात दंड थोपटले होते. पर्वती विधानसभा मतदारसंघातून मिसाळ सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांना स्वपक्षाचे माजी नगरसेवक भिमाले यांनी आव्हान दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून भिमाले यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून, ते उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. लोकसभा निवडणुकीनंतर भिमाले यांनी समाजमाध्यमात ‘लढणार आणि जिंकणार’ अशी पोस्ट केली होती. निवडणुकीची उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यामुळे ते विद्यमान आमदार मिसाळ यांची धाकधूकही वाढली होती. मात्र त्यांची कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

आणखी वाचा-देशात प्रथमच जैवविघटनशील बायोप्लॅस्टिकची निर्मिती! पुणेस्थित प्राज इंडस्ट्रीजला यश; जेजुरीत प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे विद्यमान आमदार आहेत. मात्र दिलीप कांबळे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. त्यांनाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यामुळे ते निवडणुकीच्या स्पर्धेत नसतील, असे बोलले जात आहे.

आणखी वाचा-बैठ्या जीवनशैलीमुळे जडतेय कायमची पाठदुखी! अस्थिविकारतज्ज्ञांनी सांगितले उपाय…

राजेश पांडे यांच्याकडे वखार महामंडळाची जबाबदारी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर पांडे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे किंवा राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेचे आमदार होण्यासाठी ते आग्रही होते. मात्र, त्यांच्याकडे महामंडळाची जबाबदारी दिल्याने ही चर्चाही थांबली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aspirant rejects from parvati and pune cantonment constituencies srinath bhimale dilip kamble on board pune print news apk 13 mrj