चिंचवड विधानसभेसाठी भाजपमधून इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. विद्यमान अश्विनी लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप, चंद्रकांत नखातेपाठोपाठ आता स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी चिंचवड विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत.
दोन वेळा नगरसेवक राहिलेले शत्रुघ्न काटे यांनी चिंचवड विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. आज पिंपळे सौदागरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांनी शत्रुघ्न काटे यांना आमदारकी लढवण्यासाठी आग्रह केला. शत्रुघ्न काटे यांनीही भाजपमधील नेत्यांवर नाराजी व्यक्त करत चिंचवड विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. भाजप श्रेष्ठीने दोन वेळेस महापौर पद, विरोधी पक्षनेते पद आणि स्थायी समितीचे चेअरम पद देऊ असं म्हटलं. मात्र, ऐनवेळी पक्षाने काटे यांना डावलले. पक्षावर नाराज असलेले शत्रुघ्न काटे यांनी आता मात्र माघार घेणार नसल्याचे सांगत चिंचवड विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.
हेही वाचा – पाऊस वाढल्याने फळभाज्या, पालेभाज्या स्वस्त… दर काय?
हेही वाचा – पुणे : पद्मावतीत अचानक मोटारीला आग; कारण काय?
लोकशाहीत सर्वांना आपली मतं आणि उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, असेही काटे म्हणाले. भाजपकडून विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप, चंद्रकांत नखाते यांच्या पाठोपाठ भाजपमधून शत्रुघ्न काटे इच्छुक असल्याने भाजपची डोकेदुखी वाढू शकते. भाजपने मला संधी दिली नाहीतर बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं म्हणत भाजप श्रेष्ठीला इशारा दिला आहे. ऐनवेळी शत्रुघ्न काटे हे बंडखोरी करू शकतात, असेही बोललं जातं आहे.